नीलिमा किराणे

“कुठल्या विचारांत हरवलीयेस स्मिता?” नेहाच्या प्रश्नावर ‘सांगू की नको?’ अशा संभ्रमात स्मिता पडली. पण नेहाशिवाय कोणाला सांगणार?

“जरा विचित्र प्रश्न वाटेल, पण समजा मी पुन्हा लग्न करायचं ठरवलं, तर ओंकारला कसं सांगू शकेन मी? त्याला झेपेल का?” तिच्या विलक्षण समस्येने नेहा बधिरच झाली.

दहा वर्षांपूर्वी स्मिताचा नवरा, ‘श्री’ अचानक अपघातात गेला. त्या धक्क्यातून हिमतीने बाहेर येऊन ओंकारला वाढवताना, इतक्या वर्षात कधीही पुन्हा लग्नाचा विचारसुद्धा तिच्या मनात आला नव्हता.

“आज हे काय नवीनच? कोणी आवडलंय का तुला?” नेहाने नवलाने विचारलं.

“नाही गं, असंच.”

“असंच कसं? काहीतरी घडलेलं असणारच. सांग.”

“अगं, मध्यंतरी आमच्या शाळेतल्या ग्रुपशी कनेक्ट झाले. खूप उत्साहाने स्वागत झालं. लोकांना माझ्या फारच गोष्टी आठवत होत्या. “केवढी धमाल दंगा करायचीस”, “अजूनही तशीच दिसतेस” अशा कमेन्ट आल्या. खूप भारी वाटलं. माझा लुक, फॉर्म अजूनही टिकून आहे हे नव्यानं जाणवलं. मग एकदम लक्षात आलं, की एवढी वर्ष ओंकार आणि नोकरीमध्ये बिझी होते, पण ओंकार आता बारावीनंतर जिथे ॲडमिशन मिळेल तिथे जाईल. पुढे नोकरी, लग्न… थोडक्यात मी हळूहळू कायमची एकटी होत जाणार. डोक्यात एकटेपणा, सोबत, जोडीदार आणि मग लग्न असं चक्र सुरू झालं…” सांगतानाही स्मिता अडखळली.

“मग एखादा एकटा झालेला क्लासमेट आवडलाय का?”

“नाही गं, तसं काहीच नाही, खरंच.”

“मग थेट ओंकारला कसं सांगू? पर्यंत कशी पोहोचलीस?”

“त्या विचारात एकदम मनात आलं, की ओंकार अजून लहान आहे. माझ्यावर इमोशनली डिपेंडंट आहे. त्याला कसं सांगू शकेन मी? धक्का बसेल का? अपराधी वाटलं, धडधडायलाच लागलं एकदम.” यावर मात्र नेहाने डोक्याला हात लावला.

“अगं, अपराधी काय वाटायचंय त्यात? तो ‘मि. अननोन’ तर अजून समोर आलेलासुद्धा नाही, उगीचच सुतावरून स्वर्ग?”

“होतंय खरं असं, पण माझ्या मनातले विचार, धाकधूक थांबत नाहीयेत. त्यांना लॉजिकल एंडिंगपर्यंत न्यायला पाहिजे.” नेहाला हसायला आलं. स्मिताचं गरगरतं विचारचक्र थांबवायची ‘लॉजिकल प्रोसेस’ तिच्या सवयीची होती.

“सांग मग. का लग्न करायचंय तुला? नवे नातलग, त्या ‘मि. अननोन’चं एखादं मूल.”

“नाही नाही. तरुणपणी सासर, प्रपंच निभावला, आता नाही जमायचं.” स्मिता घाईघाईने म्हणाली.

“मग… शरीरसुख?”

“नाही. तेही फार महत्त्वाचं नाही वाटतंय गं. इतकी वर्ष गेलीच की. खरं तर माझं आणि श्रीचं नातं इतकं सुंदर होतं, की मी कुणाच्या जवळ जाऊ शकेन का? याची शंकाच आहे.”

“बरं, मग नेमक्या कोणत्या वेळी सोबत हवीशी वाटते?”

“तसा ऑफिसच्या कामात आठवडा कधी उगवला आणि संपला कळत नाही. रिटायरमेंटला बारा वर्षं आहेत. तोपर्यंत फक्त वीकएंडला थोडा मोकळा वेळ असणारे. मात्र आठवडी कामांना, शॉपिंगला, ट्रीपसाठी सोबत असावीशी वाटते.”

“श्री किती मदत करायचा गं? शॉपिंगला जायचीस त्याच्यासोबत?”

“बापरे, त्याची मदत म्हणजे पसारा आणि शॉपिंग म्हणजे रनिंग रेस.”

“म्हणजे त्या ‘मि. अननोन’ची तरी तिथे सोबत मिळेल याची गॅरेंटी काय? तुला शॉपिंगसाठी माझीच कंपनी बरी. नवऱ्याच्या मागेमागे तुला करता येत नाही आणि लहानमोठे निर्णय घेण्यासाठी तुला नवरा लागत नाही. म्हणजे ‘मि. अननोन’चा सगळीकडेच अपेक्षाभंग.”

“मनातलं बोलायला कुणीतरी ‘आपलं’ हवंसं वाटतं गं. घरी आल्यानंतर अनेक गोष्टी बोलायच्या असतात. ओंकारला सगळ्याच सांगता येत नाहीत.” स्मिता म्हणाली.

“सोबतीची गरज असते हे खरंय ग, पण ॲट व्हॉट कॉस्ट? लग्नासोबत येणाऱ्या अपेक्षा आणि तडजोडी जमतील? शिवाय तुझ्या कल्पनेतल्यासारखी ‘कंडिशनल’ सोबत मिळेलच कशावरून?

“खरंच गं, हा विचारच नव्हता आला. त्या ‘अजूनही तशीच दिसतेस मुळे’ तरुण होऊन मी एकदम रमलेच मनातल्या काल्पनिक सोबतीत. आणि ओंकारच्या आठवणीने कचकन ब्रेक लागला. सगळा हा बावळट घोळ त्या ग्रुपमुळे झाला.”

“छान झालं की. आजपर्यंत तू कधी रडत राहिली नव्हतीस, पण जबाबदारीच्या नादात होतीस. स्वत:कडे फारसं लक्ष नव्हतं तुझं. आता कधी ‘मि. अननोन’ भेटलाच, तर तू त्याबद्दल विचार केलेला आहेस. तो तुला किती आवडतो, तुझ्या कुठल्या कंडिशन्समध्ये बसतो त्यानुसार तेव्हा योग्य वाटेल तसा निर्णय होईल. तोपर्यंत ओंकारही मॅच्युअर झालेला असेल. मात्र आत्ता या एपिसोडमुळे तुझ्याकडे एक चॉइस आलाय. ‘आपण लोकांना आवडू शकतो, ही जाणीव सोबत घेऊन पुन्हा शाळेतल्यासारखं धमाल राहायचं, की ‘ओंकारला काय वाटेल?’ च्या काल्पनिक ताणात राहायचं? की ‘मि. अननोन’ ला शोधायला सुरुवात करायची?”

“आता छळू नको गं, थांबलंय चक्र.” नेहाला चापट मारत स्मिता फ्रेश हसली, शाळेतल्यासारखी, चमकत्या डोळ्यांनी.

(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)

neelima.kirane1@gmail.com