भारताच्या इतिहासात असे अनेक सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले, ज्यांनी समाजकल्याणासाठी आपल्या जीवाची बाजी लावली. आजही समाजात असे अनेक कार्यकर्ते आहेत, जे लोककल्याणासाठी जीव धोक्यात घालायलाही मागे-पुढे बघत नाहीत. अशाच कार्यकर्त्यांपैकी एक म्हणजे सुनीता कृष्णन. लोककल्याणाची कामे करताना सुनीतावर १५ वेळा जीवघेणे हल्ले झाले, तरीही न डगमगता त्यांनी आपलं समाजिक कार्य चालूच ठेवलं. जाणून घेऊयात त्यांच्या या भारावून टाकणाऱ्या प्रवासाबद्दल…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनीता कृष्णन या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. सुनीता यांचा जन्म २३ मे १९६९ रोजी बंगळुरूमध्ये झाला. जन्मत: सुनीता यांना शारीरिक व्यंग होते. लहानपणीच त्यांच्या पायावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सुनीता यांना लहानपणापासूनच समाजसेवा करण्याची आवड होती. लहानपणापासूनच त्या घराजवळच्या गरीब मुलांना मदत करायच्या. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी सुनीता यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांसाठी शाळा चालवायला सुरुवात केली. सध्या त्या ‘प्रज्वाला’ या एनजीओच्या मुख्य अधिकारी आणि सह-संस्थापक पदावर कार्यरत आहेत. या एनजीओच्या माध्यमातून लैंगिक तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींचे संरक्षण व त्यांचे पुनर्वसन केले जाते. या एनजीओच्या अंतर्गत सुनीता कृष्णन यांनी आत्तापर्यंत २२ हजारांहून अधिक महिला आणि मुलींना लैंगिक तस्करीतून मुक्त केले आहे.

हेही वाचा- आईचे दागिने विकून घेतली पुस्तकं, NEET परीक्षा क्रॅक करणाऱ्या रितिका पालच्या संघर्षाची कहाणी वाचाच!

वयाच्या १५ व्या वर्षी सुनीता कृष्णन यांनी एक नवीन साक्षरता मोहीम राबवली होती. समाजातील काही घटकांकडून सुनीता यांच्या या मोहिमेला मोठा विरोध झाला. मात्र, या विरोधाला न जुमानता सुनीता यांनी आपलं काम चालूच ठेवलं. परिणामी सुनीता यांना बेदम मारहाणही करण्यात आली. या मारहाणीत त्यांच्या एका कानाला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर सुनीता यांना एका कानाने ऐकूही येत नाही. एवढेच नाही, तर सुनीता यांच्यावर आठ जणांनी बलात्कारही केला होता. या घटनेनंतरही सुनीता यांनी आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवले. अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती शोमध्ये सुनीता यांनी या घटनांचा खुलासा केला होता.

हेही वाचा- सोशल मीडियापासून अंतर, रोज सात तास अभ्यास अन्…; अशी केली सृष्टी देशमुखने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक

अनेक पुरस्काराने सन्मानित

समाजसेवेमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामासाठी सुनीता यांना २०१६ मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच त्यांना ‘मदर तेरेसा’ पुरस्कारही मिळाला आहे. यासोबतच लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social worker dr sunitha krishnans journey from surviving to thriving defying adversity and transforming lives dpj
Show comments