– सुचित्रा प्रभुणे
ओडिशाच्या राजकीय सत्तापटलावर भाजपची सत्ता येणे, विधान सभेत मोठ्या प्रमाणावर महिला उमेदवार असणे आणि प्रथमच त्या राज्याच्या इतिहासात मुस्लिम महिला आमदारची निवड होणे… या गोष्टी नव्याने होत आहेत. यात ठळकपणे नमूद होणारी बाब म्हणजे मुस्लिम महिला आमदार सोफिया फिरदोस यांचा विजय.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा नीट अभ्यास केला तर एक गोष्ट सहजपणे लक्षात येईल की, जिथे खूप अपेक्षा होती तिथे अपेक्षाभंगाच्या दु:खाला सामोरे जावे लागले. तर जिथे फारशी अपेक्षा नव्हती तिथे अचानकपणे परिवर्तनाची लाट आली आणि ते राज्य म्हणजे ओडिशा. या राज्यात प्रथमच भाजपाची सत्ता आली. त्याचबरोबर राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले. यात प्रथमच एका महिलेची निवड करण्यात आली. प्रवती परिदा या उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार बघणार आहेत, के.व्ही.सिंग यांच्या जोडीने. तर राज्याच्या इतिहासात विधानसभेत प्रथमच एका मुस्लिम तरुणीची आमदार म्हणून निवड झाली. या तरुणीचे नाव आहे सोफिया फिरदोस. त्या काँग्रेस पक्षाच्या सभासद आहेत.
बारबती-कटक येथून निवडून आलेल्या सोफिया अवघ्या ३२ वर्षांच्या आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेता मोहम्मद मोकिम यांच्या त्या कन्या. त्यांनी कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून सिव्हील इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर बंगलोर येथील आयआयएममधून मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले. पुढे रिअल इस्टेट क्षेत्रात काम करीत असताना शेख मिराज या उद्योगपतीशी लग्न केले.
चारचौघींप्रमाणे आयुष्याची गाडी सुरळीतपणे चालली असताना, अचानक राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय का घेतला, या प्रश्नावर एका मुलाखती दरम्यान दिलेल्या उत्तरात त्यांनी सांगितले की, माझ्या वडिलांना एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गोवण्यात आले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत निवडणूक लढविण्यास ते अपात्र ठरत होते. त्यामुळे त्यांच्या जागेवर स्वतंत्र उमेदवार म्हणून मी ती निवडणूक लढवावी अशी सूचना आली आणि अगदी सहजपणे राजकारणात प्रवेश झाला. लहानपणापासून राजकीय वातावरणात वाढले असल्यामुळे या क्षेत्रात काय काय चालते याची तिला पूर्ण जाणीव होती. परंतु पुढे जाऊन राजकारणातच आपले करिअर करावे ही महत्त्वाकांक्षा कधीच त्यांच्या मनात नव्हती. शिवाय, २०१९ च्या झालेल्या निवडणुकीत वडिलांच्या प्रचाराची सर्व धुरा त्यांनीच सांभाळली होती. याचा फायदा त्यांना यंदाच्या निवडणुकीत झाला.
मुळातच घरात सुधारणावादी विचारांचे वारे वहात असल्यामुळे या विचारांचा पगडा सोफिया यांच्यावर देखील होता. त्यांचे शालेय शिक्षण मिशनरी स्कूलमधून झाले आहे. त्यामुळे जात-पातीचा विचार न करता प्रत्येक माणसाकडे एक व्यक्ती म्हणूनच पाहावे हा दृष्टीकोन लहानपणापासूनच रूजला होता. त्यामुळेच जितक्या आनंदाने ईदचा सण साजरा व्हायचा, तितक्याच उत्साहाने त्या दुर्गा पूजेत देखील सामील व्हायच्या. शिवाय, मित्र परिवारात देखील वेगवेगळ्या जाती-धर्माची लोक असल्यामुळे आपण वेगळे ते वेगळे असे कधीच जाणवले नाही. उलट आपण सर्व कटकवासिय आहोत, हीच भावना नेहमी मनात असे.
याच विचारांची शिदोरी घेऊन त्या यंदाच्या प्रचार मोहिमेत उतरल्या. घरोघरी जाऊन लोकांच्या भेटी-गाठी घेतल्या. त्या कोणत्याही एका विशिष्ट जाती-धर्माच्या नसून बारबती-कटक ओडिशाची मुलगी आहे. आजवर या प्रांताने बंधूभाव जपला आहे आणि आपण देखील आपल्या कार्यकाळात हा भाव कायम ठेवू अशी साद घालून त्यांनी लोकांची मने जिंकून घेतली. याची परिणीती त्यांच्या विजयात झाली. भाजपाचे पूर्णचंद्र महापात्र यांच्या विरोधात ८,००१ मतांनी त्या जिंकून आल्या.
हेही वाचा – जुने भंगार, फर्निचर विकून कसा निर्माण केला मॉलीने लाखो रुपयांचा व्यवसाय? जाणून घ्या
ओडिशामधील ‘पहिली मुस्लिम स्त्री आमदार’ म्हणून जो इतिहास रचला गेला, याविषयी आपल्या भावना नम्रपणे व्यक्त करताना सोफिया म्हणतात की, प्रथमच ओडिशा विधानसभेत १४० महिला निवडून आल्या आणि त्यात प्रथमच मुस्लिम स्त्री आमदार म्हणून माझीपण निवड व्हावी, हा एक योगायोग आहे असे मला वाटते. हा सहजपणे घडून आलेला इतिहास म्हणजे ओडीशातील लोकांचा माझा आणि माझ्या कुटुंबियांवर असलेला विश्वास सार्थ करतो, याची झलक आहे.
या आगोदर ओडिशामध्ये १९७२ आणि १९७६ या काळात कॉंग्रेसच्या नंदिनी सत्पथी पहिल्या मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. यंदा कित्येक वर्षांनंतर ओडिशाच्या राजकीय पटलावर नवीन समीकरणे रुजत आहे. आणि त्यातही महिला आघाडी दिसत आहे. निव्वळ हिंदूच नव्हे तर इतर धर्मातील महिला देखील आपल्या स्व-कर्तृत्वावर पुढे येत आहे. यात धर्म, जात-पात या पलीकडे जाऊन राज्यात लोकोपयोगी सुधारणा कशा राबविता येतील, याला या महिला नेत्या प्राधान्य देत आहे, ही निश्चितच दखल घेण्याजोगी बाब आहे.