आपल्याकडे बहुतेक सर्वांना परदेशाचं आणि तिथल्या सुबत्तेचं छुपं ( कधी असूयामिश्रित ) आकर्षण असतं. उच्च शिक्षणासाठी आणि उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी परदेशात जाणं आणि तिथेच सेटल होणं, यात आता फारशी नवलाई राहिलेली नाही. तसं करण्यात गैर काहीच नाही, मात्र असं करताना आपण आपल्याच मुलांमध्ये दुजाभाव करतो का हेही पाहायला हवं.
आणखी वाचा : गृहिणी असलेली आई की, कष्टकरी महिला? हायकोर्टाने स्पष्ट केले की…
काही पालक त्यांच्या आर्थिक शक्तीबाहेर जाऊन कर्ज काढून मुलांना परदेशी शिकवायला पाठवून अत्यंत कौतुकाने आपला मुलगा परदेशात असल्याचं सांगतात. त्याची तितकी कुवत आहे की नाही, किंवा हे प्रचंड मोठं शैक्षणिक कर्ज तो फेडू शकेल की नाही याचा फारसा विचार होत नाही. एक ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून ते तसं करत असतील तर ते चूक आहे. तसंच दोन अपत्यांपैकी एक जर परदेशात आणि एक भारतात असेल तर आपल्याजवळ भारतात असलेल्या मुलावर कुठल्याही प्रकारे अन्याय तर करत नाही ना, याची तपासणी करणं आवश्यक आहे. आजचा आपला विषय त्या संदर्भात आहे.
आणखी वाचा : गच्चीवरची बाग: घरचा कचरा घरीच वापरा!
‘आमचा छोटा ना, सुरुवातीपासूनच फार स्मार्ट बघा. तिथे अमेरिकेतही शिक्षण घेत मस्त आपलं आपलं कमावतो.’ हे म्हणताना इथे रोज या पालकांसोबत असणारा मुलगादेखील त्याच्या करिअर मध्ये पुढे जात आपल्याकडेही लक्ष देतोय हे विसरून कसं चालेल? म्हणजे आपल्या पाल्याच्या यशाचं आणि सर्वगुणसंपन्नतेचं प्रमाणपत्र म्हणून केवळ ‘परदेशात जाणे’ ही एकच बाब पुरेशी आहे असं वाटतं का त्यांना? भारतात राहून स्वतःला सिद्ध करणारा मुलगा दुय्यम यशाचा वाटेकरी का असतो ? कधी कधी एका मुलाला परदेशी पाठवल्यावर दुसऱ्या अपत्यास त्याच्या इच्छेविरुद्ध मुद्दाम इथे ठेवून घेतलं जातं. हा देखील एक प्रकारे अन्यायच आहे.
आणखी वाचा : झोपू आनंदे : स्वप्नांचा अर्थ
अजितचा मोठा भाऊ ऑस्ट्रेलियाला शिकून तिथेच नोकरी आणि कुटुंब असणारा. अजित भारतात नोकरी करतो. तो आणि त्याची पत्नी अनिता आई वडिलांची अत्यंत काळजी घेतात, सगळे सणवार, नातेवाईक, समारंभ… सगळं आवर्जून बघतात. मोठा भाऊ तिकडून अधून मधून पैसे पाठवतो याचं आई वडिलांना प्रचंड कौतुक. पण प्रत्यक्ष रोज त्यांच्या जगण्यातील अडचणी सोडवणारे, आपली कामं बाजूला ठेवून वेळ काढणारे अजित, अनिता यांना मात्र सरळ गृहीत धरलं जातं. “इथे जो मुलगा आहे, तोच करणार ना आमचं सगळं ?” असा त्यांचा आवेश असतो. पण अजित अनिताच्या वाट्याला कौतुकाचे चार शब्द येणं दुर्मीळ. परदेशी स्थायिक होणं हे चांगलं किंवा वाईट हा मुद्दाच नाहीये. तो प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. मुद्दा आहे, तो भारतात राहणाऱ्या अपत्याकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षांचा! इथली सून नोकरी सांभाळत ‘घराण्याची’ परंपरा जपत असते. ‘तिकडच्या’ सुनेला त्या काटेकोर नियमांची झळ बसतच नाही उलट चार पाच वर्षांनी भारतात आल्यावर त्यांची खास पाहुण्यासारखी आब राखली जाते. (यात खरंतर त्या सुनेचाही काही दोष नसतो) वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घातले जातात. पण ते सुख इथे राहणाऱ्या मुलगा-सुनेच्या वाट्याला जरा कमीच येतं.
श्वेता आणि सुधीर यांच्या बाबतीतही असंच काहीसं घडतं. सुधीर अमेरिकेला गेला, तिथेच नोकरी करत स्थायिक झाला. श्वेतानं मुद्दाम आपल्या आईवडिलांच्या जवळ घर घेतलं, जेणेकरून मुलगी- जावई त्यांची काळजी घेऊ शकतील. एक दिवस श्वेता ऑफिस मधून घरी जाताना आजारी आईला बघायला घरी गेली. खरंतर ती खूप थकली होती. डोकं दुखत होतं. पण आईचे रिपोर्ट्स घेऊन ती आली होती. आईचं फोनवरचं बोलणं ऐकून ती दारातच थबकली. “तुम्ही काळजी घ्या रे …बर्फ पडलाय म्हणे तिकडे. पैसे पाठवतो? नको नको. आहेत पैसे. आता माझ्या तब्बेतीचं म्हणशील तर करतो आम्ही जमेल तसं. श्वेता म्हणतोस? तिनेच नेलं दवाखान्यात, पण तिला कुठे वेळ असतो रे? तिच्या सोयीने ती येणार! नोकरी, घर, त्यांचं फिरणं… चालायचंच ! म्हाताऱ्या माणसांसाठी वेळ कुणाजवळ असतो ? तुम्ही मात्र तब्बेतीची काळजी घ्या बरं का!” आईचं बोलणं ऐकून श्वेता दुखावली. आपण स्वतःच्या प्राथमिकता बाजूला सारून आईचं करतोय तरीही ती फोनवर असं का बोलली? आपल्या कडून आई वडिलांची पुरेशी काळजी घेतल्या जात नाहीये का ? असा प्रश्न पडला तिला.
चूक श्वेताची नाही, तर तिच्या आई वडिलांची आहे. हजारो मैलावर असलेल्या मुलांची काळजी करताना आपल्या कुशीत शिरून आपली काळजी घेणाऱ्या अपत्यावर आपण नकळत अन्याय करतोय हे त्यांच्या लक्षात यायला हवं. नाहीतर उद्या सगळीच अपत्य म्हणतील कौतुकाचं धनी व्हायचं असेल तर परदेशातच जाऊ बाबा. इथे राहिलो तर ‘घर की मुर्गी दाल बराबर’ नको व्हायला!
adaparnadeshpande@gmail.com