घराचं नाव ‘रामायणा’, वडिलांचं नाव शत्रुघ्न, भावांची नावं लव आणि कुश अशा या पौराणिक आणि परंपरा जपणाऱ्या घरात आता झहीर इक्बालची जावई म्हणून एंट्री झाली आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सात वर्ष झहीरला डेट केल्यानंतर आता २३ जून २०२४ रोजी त्याच्याशी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. गेल्या अनेक दिवसांपासून सोनाक्षीच्या या लग्नाची चर्चा सुरू होती. चर्चेपेक्षा अनेकांनी तिला ट्रोलच केलं असं म्हणायला काही हरकत नाही.
ट्रोल करण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ‘आंतरधर्मीय विवाह’. बॉलीवूडचा इतिहास पाहायचा झाला, तर सोनाक्षी ही काही पहिलीच अभिनेत्री नाही, जिने आंतरधर्मीय विवाह केला आहे. जेव्हा करीना कपूरने सैफ अली खानबरोबर लग्न केलं, तेव्हा तिलासुद्धा ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. तर शर्मिला टागोर, अमृता सिंह, संगीता बिजलानी, आयेशा टाकिया, ऊर्मिला मातोंडकर, रिचा चड्ढा अशा अनेक अभिनेत्रींनी मुस्लीम मुलाशी लग्न केलं म्हणून त्यांना वेळोवेळी ट्रोल केलं गेलंय.
परंतु, या गोष्टीकडेही दुर्लक्ष करता येणार नाही की, जर हीच गोष्ट कोणत्या अभिनेत्यानं केली, तर लोकांच्या तितक्याशा भावना दुखावल्या जात नाहीत. याचं उदाहरण म्हणजे शाहरुख खान आणि गौरी. शाहरुखची पत्नी गौरीदेखील हिंदू आहे; पण त्यांच्या नात्याला कधीच ट्रोल केलं गेलं नाही. उलट त्यांच्या जोडीला आदर्श जोडी, असंच म्हटलं गेलंय. तसंच आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव-हिंदू, हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुजैन खान-मुस्लीम; तर मनोज बाजपेयी, संजय दत्त व सुनील शेट्टी यांच्या पत्नीदेखील मुस्लिमच आहेत. पण, त्यांची लग्नं थाटामाटात झालीच की; मग या सगळ्याला नेहमी मुलींनाच का सामोरं जावं लागतं?
सोनाक्षीने हे लग्न करताना सप्तपदी घेतली नाही किंवा निकाह केला नाही. दोघांनी विशेष विवाह कायदा, १९५४ नुसार लग्न केलं. या कायद्यानुसार दोन भिन्न धर्मांतील व्यक्ती त्यांचा धर्म बदलल्याशिवाय नोंदणीकृत विवाह करू शकतात. हा कायदा संपूर्ण देशभरात लागू आहे. या लग्नामुळे सोनाक्षीला इतकं ट्रोल केलं गेलं की, तिने सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो शेअर करताना कमेंट सेक्शनचा पर्यायच बंद करून ठेवला. आयुष्यातल्या इतक्या महत्त्वाच्या आणि आनंदाच्या क्षणीदेखील लोकांचं वाईट साईट बोलण ऐकून घ्यावं लागत असेल तर कसलं हे व्यक्तिस्वातंत्र्य.
अनेक शतकांपासून चालत आलेल्या काही चुकीच्या रूढी-परंपरांना मागे टाकून, आता आपण पुढे आलो आहोत. त्यातही काही प्रथा हळूहळू समाजानं स्वीकारल्या; त्याचप्रमाणे चूक-बरोबर यातली धूसर रेषा ओळखून स्त्रियांना त्यांचं व्यक्तिस्वातंत्र्यदेखील दिलं. मग यात चूल आणि मूल सोडून स्त्रियांच्या शिक्षणाचं स्वातंत्र्य, त्यांच्या नोकरीचं स्वातंत्र्य हे आलंच. मग त्यांचं धार्मिक स्वातंत्र्य समाजाला अजूनही का मान्य नाही? आजही अनेक ठिकाणी बळजबरीनं लग्नं केली जातात, मनाविरुद्ध मुलींना संसार थाटावा लागतो.
समाजात अजूनही जातिवाद, धर्मवाद हा तितकाच ठळक आहे. वरवर जरी आपण स्त्रीला व्यक्तिस्वातंत्र्य दिलं असलं तरी अजूनही काही ठिकाणी त्यांना त्यांची मतं मांडण्याचीही सोय नसते. स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठीदेखील त्यांना धडपड करावी लागते. अजूनही काही ठिकाणी मनाविरुद्ध लग्नं केली जातात. ‘लोकं काय म्हणतील’ या एका भीतीने आजही जात-पात, धर्म या गोष्टींवर लोक अडून बसलेत.
सोनाक्षीच्या या आंतरधर्मीय विवाहाला अनेकांनी विरोध केला. तसंच बिहारच्या हिंदू शिवभवानी सेनेच्या एका कार्यकर्त्यानंदेखील या लग्नाला विरोध केला आणि त्यांच्या लग्नाचा संबंध ‘लव्ह जिहाद’शी जोडला. त्यांना धमकीही दिली की, “शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या मुलीच्या लग्नाचा पुनर्विचार केला नाही, तर सोनाक्षीला बिहारमध्ये येऊ देणार नाही.” तर अनेक लोकांनी मीडियासमोर प्रतिक्रिया देत, “सोनाक्षीचं नाव आता सोनाक्षी झहीरे बेगम आहे”, असंदेखील म्हटलं.
“आजकालची मुलं आई-वडिलांना विचारत नाहीत तर सांगतात”, हे सोनाक्षीच्या वडिलांचं वक्तव्य यादरम्यान लोकांनी उचलून धरलं. सोनाक्षीच्या या निर्णयामुळे तिचे वडील नाराज आहेत की काय अशी चर्चादेखील रंगली होती. पण, शत्रुघ्न सिन्हा अगदी खंबीरपणे आपल्या लेकीच्या पाठीशी उभे राहिले. या लग्नामुळे सोनाक्षीला केलेल्या ट्रोलिंगवर टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हांनी आपलं परखड मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, “आनंद बक्षीसाहेबांनी खूप चांगली गोष्ट लिहिली होती की, ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना।’ मी फक्त एवढं सांगू इच्छितो की, जर निरुपयोगी आणि काम नसलेली माणसं बोलत असतील, तर तसं बोलणं हे त्यांचं कामच आहे. माझ्या मुलीनं काहीही बेकायदा किंवा असंविधानिक गोष्ट केलेली नाही. लग्न हा दोन व्यक्तींमधील अत्यंत वैयक्तिक निर्णय आहे. त्यावर कोणालाही भाष्य किंवा हस्तक्षेप करण्याची परवानगी नाही. जे लोक या लग्नाला विरोध करीत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की, जा आणि आयुष्यात काहीतरी चांगलं करा.”