डॉ. शारदा महांडुळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वसामान्य वर्गापासून ते अगदी उच्च वर्गापर्यंत आहारातील मुख्य घटक म्हणून ज्वारीचा उपयोग केला जातो. भारतामध्ये ग्रामीण भागात ज्वारी हीच मुख्य दैनंदिन आहार म्हणून वापरली जाते. मराठीमध्ये ‘ज्वारी’, संस्कृतमध्ये ‘यवनाल’, इंग्रजीमध्ये ‘यलो मिलेट’, तर शास्त्रीय भाषेत ‘ सॉरघम’ (Sorghum) या नावाने ओळखली जाणारी ज्वारी हे धान्य ‘पोएसी’ कुळातील आहे. ज्वारीचे रंगानुसार, चवीनुसार व प्रदेशानुसार अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये पांढरी ज्वारी, लाल ज्वारी व अरगड हे प्रकार आहेत. तसेच ‘सोलापुरी’ व ‘खानदेशी ज्वारी’ असेही प्रदेशानुसार प्रकार पडतात.

ज्वारी प्रथम पश्चिम आफ्रिकेत निर्माण झाली. तेथून ती एकोणिसाव्या शतकात अमेरिकेत पोहोचली. आज आफ्रिका, आशिया या खंडांमध्ये पावसाळी पीक म्हणून ती पिकविली जाते. भारतामध्ये ज्वारी सर्वत्र पिकविली जाते. तिची रोपे तीन चार हात उंच वाढतात. ज्वारीच्या या रोपांना ताटे असे म्हणतात व यालाच ज्वारीची कणसे लागतात. या कणसांमध्ये दाणे तयार होतात. या दाण्यांनाच ज्वारी असे म्हणतात.

हेही वाचा >>>आहार वेद : बहुगुणकारी गहू

औषधी गुणधर्म :

  • आयुर्वेदानुसार : ज्वारी पित्तनाशक, मधुर, शीत गुणधर्माची, रूक्ष, वायुकारक व रक्तदोष दूर करणारी आहे.
  • आधुनिक शास्त्रानुसार : ज्वारीमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, कॅरोटीन, थायमिन, नायसिन, रिबोफ्लेविन, स्निग्धता, प्रथिने, खनिजे, मेद, तंतुमय व पिष्टमय पदार्थ हे सर्वच शरीरास उपयुक्त असणारे पोषक घटक असतात.

उपयोग :

१) शेतामध्ये ज्वारीची कोवळी कणसे भाजून त्याचा हुरडा बनविला जातो. हुरडा अतिशय मधुर व चविष्ट असून, आरोग्यास गुणकारी असतो. हिवाळ्यामध्ये प्रत्येकाने हुरड्याचा आस्वाद घेऊन आरोग्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करावा. ऋतुनुसार निर्माण झालेले धान्य प्रत्येकानेच खाऊन त्यातील शरीरास उपयुक्त पोषक घटकांचा लाभ घेणे आवश्यक आहे.

२) आजारपणात ज्वारीच्या पिठापासून पेज बनवून खावी. पेज पचण्यास अतिशय हलकी व उत्साहवर्धक असल्याने अशक्तपणा दूर होऊन तरतरी वाढते.

३) ज्वारीपासून लाह्या बनविल्या जातात. या लाह्यांचा उपयोग अपचन, अतिसार, उलटी, मळमळ या विकारांमध्ये हलके अन्न म्हणून करावा. वसंत ऋतूमध्ये शरीरात कफसंचय होऊन कफप्रकोप होतो. अशा वेळी कफ दूर करण्यासाठी ज्वारीच्या लाह्या व फुटाणे खावे. यामुळे शरीरात साचलेला कफ नाहीसा होतो. ज्वारीची कोवळी हिरवी ताटे ही उसासारखीच गोड लागतात. त्यामुळे ताटे तोडून उसाप्रमाणे चघळली असता यामध्ये असणारे ‘ब’ जीवनसत्त्व, कॅल्शिअम, लोह व प्रथिने यांचा मुबलक साठा शरीरास त्वरित मिळून आरोग्य अबाधित ठेवता येते.

हेही वाचा >>>आहारवेद : शेवगा

४) ज्वारी खाल्ल्याने त्यामध्ये असणाऱ्या विपुल लोहामुळे रक्ताचे प्रमाण वाढते, म्हणून पंडुरोग (ॲनिमिया) असणाऱ्या रुग्णांनी ज्वारीची भाकरी नियमित खावी. फक्त ही भाकरी रूक्ष असल्याने वातप्रकोप होण्याची शक्यता असते. वातप्रकोप टाळण्यासाठी ताज्या भाकरीवर गायीचे एक चमचा साजूक तूप टाकून ती खावी. तूप टाकून भाकरी खाल्ल्याने भाकरी अधिक चविष्ट, पौष्टिक, गुणकारी व बलदायी ठरते.

५) ज्वारीच्या पानांवर सकाळच्या वेळी पडलेले दवबिंदू हे नेत्रविकार, डोळ्यांची आग, मोतिबिंदू, डोळ्यांतून सतत पाणी येणे या विकारांवर डोळ्यात घातल्यास सर्व विकार दूर होतात.

६) मूळव्याधीतून जर रक्त पडत असेल, तर अशा वेळी ज्वारीच्या दाण्यांचा मऊ भात शिजवून खावा.
याने रक्त पडणे बंद होऊन अशक्तपणा दूर होतो.

७) तापामध्ये घाम येण्यासाठी ज्वारीच्या लाह्यांच्या पिठाचा काढा करून प्यावा. हा काढा घेतल्याने घाम येऊन ताप उतरतो.

८) ज्वारी सारक गुणधर्माची असल्याने मलावष्टंभाची तक्रार असणाऱ्या रुग्णांनी खाल्ल्यास शौचास साफ होऊन मलावरोधाची तक्रार दूर होते. यामध्ये असणाऱ्या सेल्युलोज, ‘ब’ जीवनसत्त्व व फायबर या घटकांमुळे शौचास साफ होते.

९) पांढरी ज्वारी मूळव्याध, अरुची, गुल्म, व्रण व ताप विकारांवर गुणकारी आहे. या विकारांमध्ये ती शक्ती देणारी असून पथ्यकारक आहे.

१०) लाल ज्वारी मधुर, शीतल, बलवर्धक, त्रिदोषनाशक, कफहारी, पौष्टिक असते.

११) ज्वारीपासून भाकरी, थालीपीठ, चकल्या, लाह्या, लाह्यांचा चिवडा, धिरडे, पापड्या असे शरीरास गुणकारी अनेक पदार्थ बनविता येतात.

हेही वाचा >>>आहारवेद : भाज्यांचा राजा बटाटा

सावधानता :

ज्वारी मधुर, शीत गुणात्मक, कफ व वातकारक असल्याने अति प्रमाणात खाल्ल्यास वातप्रकोप होऊन अपचन होऊ शकते. ती शरीरास गुणकारी ठरावी याकरिता तिच्यापासून पदार्थ बनविताना साजूक तुपाचा वापर करावा. यामुळे जाठराग्नी प्रदीप्त होऊन अपचन, पोटात गॅस धरणे, रूक्षता जाणवणे हे विकार दूर होतात. ज्वारीच्या भाकरीवर नेहमी गायीचे एक चमचा तूप घालून ती भाकरी खावी.

dr.sharda.mahandule@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sorghum is useful for the body and has protein reserves amy
Show comments