कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ वेगाने पुढे जात आहे. वैद्यकीय, शिक्षण, तंत्रज्ञान, माध्यम असे कुठलेही क्षेत्र ‘एआय’ने सोडलेले नाही. प्रत्येक क्षेत्रात ‘एआय’चा वापर होत आहे. १०० मानवी सॉफ्टवेअर्स जे काम एक वर्षात करतील, तेच काम ‘सुपर एआय’ एका दिवसात करू शकेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
‘आर्टिफिशियल इंटेलिजन्सने लोकांच्या आयुष्यात इतका प्रवेश केला आहे की लोक आता AI शी लग्नही करू लागले आहेत. तुम्हाला वाचून थोडं विचित्र वाटेल, पण एक स्पॅनिश कलाकार तिच्या AI होलोग्रामशी लग्न करणार आहे. एका व्यक्तीने एआय होलोग्रामशी लग्न करण्याची ही जगातील पहिलीच घटना आहे.
ॲलिसिया फ्रॅमिस असे या महिला कलाकाराचे नाव असून ती AI जनरेटेड होलोग्रामशी लग्न करणारी पहिली महिला होणार आहे. ॲलिसियाने लग्नासाठी जागा आधीच बुक केली आहे. युरोन्यूजच्या वृत्तानुसार, यावर्षी रॉटरडॅममधील एका संग्रहालयात ॲलिसियाचा विवाहसोहळा पार पडणार आहे. ॲलिसियाच्या भावी पतीचे नाव ‘आयलेक्स’ आहे. ॲलिसियाचे हे लग्न तिच्या ‘हायब्रिड कपल’ नावाच्या नवीन प्रोजेक्टचा एक भाग आहे.
फ्रॅमिस सध्या तिच्या लग्नाचा पोशाख डिझाईन करण्यात व्यस्त आहे. तसेच तिच्या लग्नसमारंभात उपस्थित राहणाऱ्या पाहुण्साठी ड्रेसकोडही ठरवण्यात आला आहे. फ्रॅमिस यावर्षी मे किंवा जूनमध्ये रॉटरडॅममधील डेपो बोइजमन्स व्हॅन ब्युनिंजन संग्रहालयात आयलेक्सबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. फ्रॅमिसने तिच्या व्हर्च्युअल पार्टनर आयलेक्सचे फोटो व व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रावरुन शेअर केले आहेत.
हेही वाचा- स्त्री आरोग्य : सलाइन लावल्यावर ‘लो’ बीपीचा त्रास कमी होतो?
फ्रॅमिस म्हणाली की, “ज्यांना त्यांच्या एखाद्याच्या सहवासाची गरज आहे त्यांच्यासाठी AI हे फायदेशीर पर्याय असू शकतात.” एका वैयक्तिक प्रकरणाचा दाखला देत ती म्हणाली, “माझी मैत्रीण विधवा आहे आणि तिच्यासाठी तिच्या पतीची जागा घेणे अवघड आहे. AI च्या माध्यमातून प्रेमाची एक नवीन पिढी उदयास येत आहे.”