दिवाळीत केवळ स्वत: नटून भागत नाही. घर सजवण्याबरोबरच दारासमोर अशी सुरेख रांगोळी रेखली जाते, की येणाऱ्या व्यक्तीचं मन घरात प्रवेश करण्यापूर्वीच प्रसन्न होतं. तशा आपल्यापैकी बहुतेक ‘चतुरां’ना सजावटीची आवड असतेच. ही आवड आणि आपली उपजत कल्पकता आपण रांगोळीत वैविध्य आणण्यासाठी वापरतो. रांगोळी हे पूर्वापार एक मंगल प्रतीक समजलं जात असलं, तरी सणाला रांगोळी काढावी असं आयुर्वेदात कुठे म्हटलेलं आढळत नाही. मग या रांगोळीची प्रथा का पडली असावी, असा विचार करता काही गोष्टींचे धागे जुळवता येतात.
आणखी वाचा : दिवाळीत असा असू द्या आहार
रांगोळीचा एक उपयोग म्हणजे कलात्मकतेचा, कल्पकतेचा विकास आणि रांगोळी काढताना मनाला मिळणारी शांतता आणि आनंद. चारजणी एकत्र येऊन रांगोळी काढतात, तेव्हा त्यांच्यात होणारा खेळीमेळीचा संवाद हा आणखी एक फायदाच. मानसिक ताण घालवायचा असल्यास कागद आणि रंग घेऊन मनात येईल ते चित्र काढावं म्हणजे बरं वाटतं, अशी एक ‘पेंट थेरपी’ची संकल्पना सांगितली जाते. यानुसार रांगोळीचा उपयोग ‘पेंट थेरपी’सारखा होऊ शकतो असं निश्चितच म्हणता येईल. सतत घरातले कष्ट उपसून दमलेल्या स्त्रियांना रांगोळी काढून, त्यात रंग भरून बरं वाटलं नाही तरच नवल! या लेखात दिवाळीत काढल्या जाणाऱ्या मोठ्या रांगोळ्यांपैकी काही डिझाईन्स पाहू या. या रांगोळ्या पाहून तुम्हाला स्वत:ची अशी काही नवी डिझाईन्ससुद्धा सुचतील.
आणखी वाचा : दिवाळीला का करतात अभ्यंगस्नान? त्याचे शास्त्रीय महत्त्व काय ?
१) फुलांची रांगोळी
ही रांगोळी काढायला सगळ्यात सोपी. शिवाय कमी वेळात होणारी आणि कमी-जास्त कितीही जागा असेल, तरी जागेनुसार त्यात सहज बसवता येणारी. केशरी आणि पिवळी झेंडूची फुलं, ॲस्टरची पांढरी फुलं, लाल गुलाबाची फुलं, हिरवी पानं जवळ असली की झालं. शिवाय ही फुलं अगदी ताजीच असायला हवीत असंही नाही. थोड्या शिळ्या झालेल्या फुलांच्या पाकळ्या काढून त्या निश्चितच वापरता येतील. आधी हवं ते मोठं डिझाईन खडूनं जमिनीवर काढून घ्या आणि त्यात डिझाईनप्रमाणे फुलांच्या पाकळ्या भरा. या रांगोळीला बॉर्डर काढण्याची गरज नसते. सर्वांत शेवटी मध्यभागी व बाजूनं मेणपणत्या ठेवून रांगोळी सजवता येईल.
आणखी वाचा : हिवाळा आला, आहाराची वेळ पाळा
२) नैसर्गिक रंग वापरून पाहा
बाजारात मिळणारे रांगोळीचे रंग वापरून सर्वचजण रांगोळी काढतात. तुम्हाला काही वेगळं करून पाहायचं असेल, तर तुम्ही नैसर्गिक रंगांची रांगोळी काढून पाहा. अर्थात यासाठी मात्र तुम्हाला थोडा सराव करावा लागेल. पांढऱ्या रांगोळीऐवजी बेस म्हणून तांदळाचं पीठ वापरता येईल. त्यावर हळद आणि कुंकू वापरून रांगोळी काढता येईल. त्यानं एक छान पारंपरिक ‘लूक’ मिळेल. अर्थात ही रांगोळी प्रथम शक्यतो लहान आकाराचीच असावी. म्हणजे तुम्हाला रांगोळी काढायची सवय नसली तरी एकदम खूप तांदळाचं पीठ वाया जायची भीती नको. ही रांगोळीसुद्धा तुम्ही आधी खडूनं जमिनीवर काढून घेऊ शकता. काही जण कावेनं जमिनीचा थोडासा तुकडा रंगवून त्यावर नैसर्गिक रंगांनी रांगोळी काढतात. तीही छान दिसते.
आणखी वाचा : मी दीपिका नाही पण… ट्रेन मध्ये दिसलेली ‘ती’, जगातील सर्वात सुंदर महिला!
३) कोलम रांगोळी
आपली पारंपरिक शुभचिन्हं खूपजण रांगोळीत आवर्जून काढतात. त्याबरोबर हल्ली कोलम रांगोळी हा प्रकारही लोकप्रिय होतो आहे. या रांगोळीतसुद्धा साध्या पांढऱ्या रांगोळीनं काही ठराविक चिन्हं वापरून कलात्मक डिझाईन बनवलं जातं. नंतर ती सजवता येते. इंटरनेटवर तुम्हाला या कोलम रांगोळीची कितीतरी डिझाइन्स सापडतील.
आणखी वाचा : मराठी अभिनेत्रींनी बोल्ड सीन दिले म्हणून त्यांचे कुटुंबीय दोषी कसे?
४) मोराची रांगोळी
तुम्हाला रांगोळीत काय काढायचं हे अजिबात सुचत नसेल, तर तुलनेनं सोपी, अधिक विचार करावा न लागणारी आणि भरपूर रंग असल्यानं आकर्षक दिसणारी रांगोळी म्हणजे मोराची रांगोळी. यात तुम्हाला भरपूर डिझाईन्स सुचतील. मोराचा बेसिक आकार तोच असल्यामुळे आधी खडूनं काढून त्यावरून गिरवल्यानं ही रांगोळी सोपी होते.
आणखी वाचा : विवाहपूर्व मार्गदर्शन : असुरक्षित सेक्सचे धोकेच अधिक
५) रांगोळीचा स्टिकर
तुम्हाला रांगोळी काढायला मुळीच वेळ नसेल, तर तुम्ही रांगोळीचा रेडिमेड स्टिकर वापरून त्याच्या बाजूनंही मेणपणत्या आणि फुलांची सजावट करून त्याला शोभा आणू शकता.