सहजच टीव्हीवर चॅनल सर्फिंग करत होते. तेव्हा ९० च्या दशकात सुपरहिट ठरलेला ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट एका चॅनलवर लागला होता आणि तो पाहण्याचा मोह आवरला नाही. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्यात कॉलेजच्या मुख्याध्यापकाची भूमिका अनुपम खेर यांनी साकारली आहे. तर अभिनेत्री अर्चना पुरन सिंग हिने एका प्राध्यापिकेची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात एक दृश्य दाखवण्यात आले आहे. यात मिस ब्रिगेन्झा (अर्चना सिंग) या शॉर्ट स्कर्ट घालून कॉलेजमध्ये येताना दिसतात. यावेळी मल्होत्रा (अनुपम खेर) हे तिला अडवत शॉर्ट स्कर्ट घालण्यास परवानगी नाही असे सांगतात. त्यावर ब्रिगेन्झा या शॉर्ट स्कर्ट तर आजकालची फॅशन आहे. हल्ली काही मुली तर काही घालतही नाहीत, असे उत्तरादाखल सांगतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यानंतर माझ्या बाबांनी चॅनेल बदलले आणि बातम्या लावल्या. बातम्यांमध्ये घटना सांगितली जात होती ती कोलाकातामधली… एका महिला प्राध्यापिकेने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘हॉट’ फोटो शेअर केला म्हणून तिला राजीनामा द्यावा लागला. यानंतर सहज उत्सुकतेपोटी ती बातमी काय, नेमकं काय घडलं याबद्दल जाणून घेतलं.

सोशल मीडियावर एखादा बोल्ड फोटो पोस्ट केला आणि त्यामुळे एखाद्याला नोकरी गमवावी लागली, असे आतापर्यंत घडलेलं माझ्या फारसं ऐकण्यात नाही. पण कोलकातामधील सेंट झेवियर्स विद्यापीठात हा प्रकार घडला. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा हा विषय सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे; कारण या प्राध्यापिकेने तिची भूमिका स्पष्ट करणारा लेख ‘दी इंडियन एक्स्प्रेस’मध्ये लिहिला.
स्कॉटलंडला शक्य तर इतर देशांना का नाही?

एका विद्यार्थ्याच्या पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर विद्यापीठाने तिच्यावर कारवाई केली. त्या संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा त्या प्राध्यापिकेचे इन्स्टाग्राम अकाऊंटवरील बिकीनी लूकमधील फोटो सातत्याने पाहत होता. आणि हे फोटो उत्तान असल्याचा त्याच्या वडिलांचा आरोप होता. या पत्राच्या आधारे विद्यापीठ प्रशासनाने रीतसर चौकशी करून या मुद्द्यावर कारवाई करणेही समर्थनीय नाही तर त्या अवस्थेत खापपंचायतीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आली. ते एक विद्यापीठ आहे हे तरी विद्यावंतांनी लक्षात घेणे आवश्यक होते. आणि मग खापपंचायतीसारखेच निर्णय घ्यायचे तर मग शिक्षण तरी का आणि कशासाठी घ्यायचे?

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हे प्रकरण समोर आले होते. या कारवाई प्रसंगी तिला काही कागदपत्रेही दाखवण्यात आली. त्यात तिची काही खासगी छायाचित्रेही होती. यानंतर त्या प्राध्यापिकेने २४ ऑक्टोबर २०२१ रोजी याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यात तिने तिचे वैयक्तिक इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याचा संशय व्यक्त केला. त्यानंतरच ही छायाचित्र व्हायरल झाली असावी, असा दावा तिने केला. यानंतर या महिला प्राध्यापिकेने पुन्हा एकदा याप्रकरणी कलम ३५४ (सी) आणि ५०९ च्या अंतर्गत एक पोलीस तक्रार दाखल केली.

विशेष बाब म्हणजे या प्राध्यपिकेने सेंट झेवियरमधून इंग्रजीमध्ये बीए केले आहे. तर जाधवपूर विद्यापीठातून एमए केले. त्यानंतर तिने युरोपियन विद्यापीठातून डॉक्टरेटची पदवी घेतली आहे. भारतात परतल्यानंतर तिने तिच्या मूळ गावी कोलकाता येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरीला सुरुवात केली. मात्र यादरम्यान घडलेल्या घटनेने ती पूर्णपणे कोलमडून गेली. आधीच तब्येतीच्या अनेक तक्रारी असलेल्या तिच्या वडिलांच्या , शिवाय तिच्या स्वत:च्या तब्येतीवर या घटनेचा वाईट परिणाम झाला.

डोन्ट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ अ वुमन!

एखादी शिक्षिका चांगली शिकवत नसेल आणि तिला कामावरुन काढून टाकणे योग्यच. पण त्या महिलेच्या खासगी आयुष्यावरुन, तिच्या खासगी अकाऊंट वरचे फोटो उत्तान असल्याचा आरोप करत, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नोकरीचा राजीनामा द्यायला लावणे अगदीच चुकीचे आहे. एखाद्या शिक्षिकेने कोणते कपडे परिधान करावे, तिने काय घालावे हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे. महत्त्वाचे म्हणजे एवढे सारे झाल्यावरही ही शिक्षिका म्हणते की, ‘त्या विद्यार्थ्याच्या वडिलांना अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य मान्यच आहे. पण माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे काय? माझ्या खासगीपणाच्या अधिकाराचे काय?’ तिने मांडलेला हा मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. कारण 2017 साली सर्वोच्च न्यायालयाने पथदर्शी निवाडा देत खासगीपणाचा अधिकार हा मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करून समस्त भारतीयांना दिलासा तर दिलाच पण काळानुरूप बदल करत राज्यघटना जपण्याचेच काम केले आहे. असे असतानाही कोलकातासारख्या ठिकाणी उच्च शिक्षण संस्थेत अशा घटना घडणे हे केवळ निंदनीय आहे. अशा घटनांना खतपाणी मिळाले की समाजातील कथित नैतिक रक्षकांना बळ चढते म्हणूनच सध्या या प्राध्यापिकेले सुरू केलेल्या न्यायालयीन लढ्यासोबत समाजाने आणि खास करून महिलांनी उभे राहणे गरजेचे आहे!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St xavier university professor forced to quit over instagram bold photos nrp