डॉ.अश्विन सावंत
मुलींना पीसीओएस् ही विकृती होण्याचे नेमके कारण काय? पीसीओएस् चे एकच कारण ठोसपणे सांगता आलेले नाही. ही विकृती कोणत्याही एका कारणाने नाही तर अनेकविध कारणांमुळे होते असे दीर्घकालीन निरीक्षणाने संशोधकांच्या लक्षात आले आहे. वेगवेगळी कारणे हे या रोगाचे वैशिष्ट्य आणि उपचार करण्यामधील आव्हान आहे. त्याचमुळे एक विशिष्ट औषध घेऊन ही विकृती नष्ट होईल हे संभवत नाही. स्वस्थ जीवनशैली, स्वास्थ्य-पोषक आहार, आरोग्य-पूरक सवयी, योग्य-पर्याप्त व्यायाम आणि नेमकी औषधे व योग्य उपचार यांच्या एकत्रित उपचारानेच या रोगाचा सामना करणे शक्य आहे. याचसाठी या रोगाची नेमकी कारणे कोणती हे समजून घ्यायला हवे. आपल्याला रोगाची कारणे लक्षात आली तरच त्यांचा प्रतिबंध व उपाय करणे सोपे होईल.
लहान वयात मासिक पाळी सुरू होणे हे सुद्धा पीसीओएएस् चे एक महत्त्वाचे लक्षण व कारणही आहे. आजच्या आधुनिक जगात संपन्नता मिळालेल्या, मात्र त्या संपन्नतेचा उपयोग कसा सत्कारणी लावायचा हे न समजलेल्या पालकांकडून मुलींना मिळणारे अतिरिक्त पोषण, अतिलाड व त्यामधून कष्टाच्या कामांपासून मुलींना दूर ठेवणे हे मुलींच्या शरीराला धष्टपुष्ट करते. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत तुम्ही पाहिले असेल की दहा-बारा वर्षांच्या कोवळ्या मुलीसुद्धा १८ वर्षांच्या तरुण मुलींसारख्या दिसू लागतात. पालकांनाही याचे कोण कौतुक वाटते. ‘आपली मुलगी खात्यापित्या घरची दिसते’, या भ्रमात राहणाऱ्या या पालकांचे मुलीला नकळत्या वयातच पाळी सुरू झाली की, मात्र धाबे दणाणते.
आणखी वाचा : भाग १ : पीसीओएसची कारणे, एक नाही… अनेक!
अतिरिक्त व अयोग्य पोषण जशी शरीराची वाढ करते, तशीच ते स्त्री-प्रजनन अंगांची सुद्धा झपाट्याने वाढ करते. परंतु अयोग्य- निकस आहारामुळे व व्यायामाच्या अभावामुळे शरीराची वाढ लवकर झाली तरी ते शरीर निरोगी व सकस शरीरकोषांचे असे तयार होत नाही. साहजिकच स्त्री-प्रजनन अवयव सुद्धा स्वस्थ-सकस तयार होत नाहीत आणि सकस स्त्री-बीज तयार करू शकत नाहीत. अकाली (म्हणजे लवकर) मासिक पाळी सुरू होण्यामागे २१व्या शतकात लहान मुलींचा अजाणत्या वयात लैंगिक उद्दिपन करणाऱ्या विविध गोष्टींशी येणारा संबंध हे सुद्धा कारण असावे अशी शंका येते, ज्यामुळे शरीरामधील संप्रेरकांना उद्दिपन मिळून प्रजनन-संस्था कार्यान्वित होते, मात्र अयोग्य वेळी व अयोग्य प्रकारे.
औषधाचा दुष्परिणाम – वाल्प्रोईक ॲसिड या नावाचे औषध पीसीओएस् ला कारणीभूत होऊ शकते. वाल्प्रोईक ॲसिड हे आकडी (फिट) येण्याचा त्रास, काही मानसिक आजार व अर्धशिशी (मायग्रेन) अशा आजारांमध्ये वापरले जाणारे औषध आहे. हे औषध एखाद्या मुलीने घेतल्यावर पुढे त्या औषधाच्या दुष्परिणामामुळे तिला पीसीओएस् होण्याची शक्यता असते.
मंद-जीर्ण आभ्यन्तर शोथ –
आपल्या शरीराला कुठे मार लागल्यास तिथे येणारी सूज (शोथ) काही दिवसांत बरी होते, जिला तीव्र (त्वरित येणारी आणि लगेच बरी होणारी) सूज म्हणता येईल. याचप्रमाणे शरीराच्या आभ्यन्तर (आतल्या अवयवांना किंवा रक्तवाहिन्या- नसा अशा सूक्ष्म रचनांना सुद्धा सूज येऊ शकते, मात्र ती हलकी (मंद) आणि दीर्घकाळ राहणारी म्हणजे जुनाट (जीर्ण) असते. म्हणून हिला नाव दिले ‘मंद-जीर्ण आभ्यन्तर शोथ’ (क्रॉनिक लो ग्रेड इन्फ्लमेशन). ही सूज वर्षानुवर्षे राहू शकते आणि घातक रसायनांचे स्त्रवण करून आरोग्याला धोका पोहोचवू शकते. या जुनाट सुजेमुळे शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये होणाऱ्या उर्जा-ज्वलनामध्ये तयार होणाऱ्या घातक सूक्ष्म कणांचे (फ्री-रॅडिकल्सचे) प्रमाण रक्तामध्ये वाढत जाते, यालाच ‘ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस’ म्हणतात. हे सूक्ष्म-मुक्त कण आणि मंद-जीर्ण आभ्यन्तर शोथ यामुळे शरीर-पेशींना इजा होते आणि हृदयविकारापासून मधुमेहापर्यंत विविध विकृतींना आमंत्रण मिळते तर पीसीओएएस बाबत इन्सुलिन प्रतिरोधाला, स्त्री-बीज ग्रंथींचे कार्य बिघडवण्याला आणि पुरुष-संप्रेरकांच्या अतिनिर्मितीलाही ते आमंत्रणच ठरते. साखरेचे नित्य सेवन, जंक फूडचे सेवन, चरबीयुक्त पदार्थांचे नित्य सेवन, धूम्रपान, मद्यपान, व्यायामाचा-परिश्रमाचा अभाव आणि मानसिक ताणतणाव ही कारणे यामागे आहेत. सीआरपी ही करोना काळामध्ये प्रसिद्ध झालेली रक्त चाचणी करून शरीरामधील आभ्यन्तर सूजेचे निदान करता येते… (क्रमशः)
drashwin15@yahoo.com