डॉ. उल्का नातू – गडम
आसनांचा सराव करताना एक तत्व नेहमी लक्षात ठेवायचे. शरीराचे / स्नायूंचे / सांध्यांचे दोन भाग करायचे. एक चल / ॲक्टिव्ह/ क्रियाशील भाग व दुसरा अचल /पॅसिव्ह/ क्रियाहीन भाग. ज्या भागातील स्नायू आसनाच्या स्थितीत वापरात असतील फक्त त्याच स्नायूंची हालचाल संथपणे करावी. पण ज्या भागातील स्नायू वापरात आणणे अपेक्षित नाही तो भाग उगाचच ताणू नये. अशा हालचालींमुळे अनावश्यक दुखापत होऊ नये, किंवा कुठलेही स्नायूबंध अथवा सांधे ताणले जाणे अपेक्षित नाही. असे झाल्यास नाहकच योगविद्येस दोष प्राप्त होईल.
आतापर्यंत आपण ताडासन, तीर्यक ताडासनाचा सराव केला. हात डोक्याच्या दिशेने नेऊन ताण अथवा खेच देणारे बैठक स्थितीतील एक आसन आज करून पाहूया. या आसनाला ‘पर्वतासन’ म्हणतात. बैठक स्थितीतील दृढ पाया, वर निमुळते होत जाणारे टोक, त्यामुळे त्याला पर्वतासन म्हणतात.
हे करण्यासाठी प्रथम पद्मासन करूया. बैठकस्थितीतील विश्रांती स्थिती; दोन्ही पाय सरळ शरीरापुढे, दोन्ही हात शरीराच्या बाजूला पाठकणा सरळ. आता उजवा पाय दुमडा, उजवी टाच डाव्या जांघेजवळ, डाव्या पायाची टाच उजव्या जांघेजवळ आणा. दोन्ही गुडघे जमिनीवर टेकलेले असतील. जर जमत नसेल, तर अर्धपद्मासन अथवा सुखासनात या.
आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये छातीपुढे आणा. दोन्ही कोपरे व हात जमिनीला समांतर असतील. आता सावकाश दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. आता दोन्ही दंडांचा दोन्ही कानांना स्पर्श करा. हात कोपरात सरळ ठेवा. पाठकणा पुढे अथवा मागे झुकवू नका. या स्थितीत दोन्ही हातांना व पाठकण्याला वर खेच द्या.
डोळे मिटून श्वासावर लक्ष एकाग्र करा. दीर्घश्वसनाची आवर्तने श्वसन क्षमता वाढविण्यास मदत करतात. आसन करताना वक्षस्थळे वर ताणली खेचली जातात. बाळंतपणानंतर या आसनाचा सराव शरीराचा बांधा पूर्ववत करण्यास मदत करतो.
ulka.natu@gmail.com