आई- अगं समिधा ऐकलंस का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समिधा – काय म्हणतेस आई, काय झालं?

आई – तुला ती नमिता माहितीये ना? तिने लग्नाच्या आठ दिवसाआधी लग्नाला नकार दिलाय म्हणे.

समिधा – काय? लग्नाच्या आठ दिवसाआधी नकार, काय झालं गं?

आई – तिला तो मुलगा आवडला नाही म्हणे

समिधा – अगं, पण लग्न तर दीड महिन्यापूर्वी जमलं ना, साखरपुडाही झाला होता, मग आता अचानक… असं कसं..

आई- अगं तिची बहीण सांगत होती की अरेंज होतं. एक-दोन भेटीत मुलगा चांगला वाटला तर तिने होकार दिला. घरचे लग्नाच्या तयारीला लागले. इकडे हा तिला सारखा फोन करायचा. भेटायला गेल्यावर तो तिचा फोन बघायचा. मित्राच्या वाढदिवसाचं स्टेटस का लावलं म्हणून भांडायचा. एकदा तर तिच्या घरीच त्याने फोन हिसकावून फेकून दिला होता.

समिधा – बापरे

आई – हो. तिची बहीण सांगत होती की असं सगळं झालं. त्याने फोन फेकला त्यादिवशी तर तिच्या आई-बाबांच्याही लक्षात आलं की काहीतरी गडबड नक्कीच आहे. मग त्यांनी तिला विचारलं तर तिने सांगितलं की त्याचा सारखा फोनवर बोल असा हट्ट असतो. मित्रांशी कुणाशी बोलायचं नाही, फोनमध्ये फोटो ठेवायचे नाही, त्यांच्या वाढदिवसाचे स्टेटस ठेवायचे नाही. ठेवलंच तर तुझं त्याच्याशी नातं काय म्हणत नको ते बोलायचं असा प्रकार बरेच दिवस चालू होता.

समिधा – अगं आई पण हे किती वाईट. नुकत्याच भेटलेल्या व्यक्तीवर तुम्ही इतका हक्क कसा दाखवणार. तिच्या आई-वडिलांनी त्याला काही म्हटलं नाही का गं?

आई – त्यांनी त्याला बोलावलं होतं आणि घडलेल्या प्रकाराबद्दल विचारलं तर तो सॉरी म्हणाला. चुकून झालं वगैरे. पण तिच्या आई-वडिलांनाही या गोष्टी खटकत होत्या. लग्नाआधीच असं सगळं होतंय, उद्या लग्नानंतरही याच कारणावरून तो भांडत राहिला, तिचं नोकरी करणं बंद केलं तर कसं होईल याची चिंता त्यांना लागली होती. शेवटी त्यांनी नमितावर निर्णय सोपवला. ती म्हणेल तसं करायचं.

समिधा – मग..

आई – नमिताने लग्न न करायचं जाहीर केलंय. उशीरा केलेलं चालेल, पण चुकीच्या व्यक्तीशी नको, असं ती म्हणाली. त्याचे आई-वडील आले होते समजवायला पण तेही मुलाचीच बाजू घेत होते, त्यामुळे नमिताच्या आई-वडिलांनीही मुलीची बाजू घेत नकार कळवला.

समिधा – खरंच आई. बरं झालं नमिताने वेळीच निर्णय घेतला. नाहीतर पुढे जाऊन त्रास झाला असता तर आयुष्यभर सहन करण्यावाचून पर्याय राहिला नसता.

आई – बरोबर बोललीस. लग्न हा काही एका दिवसाचा खेळ नाहीये. आयुष्यभराचं नातं असतं. त्यामुळे निर्णय घेताना सारासार विचार करावा, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होऊ शकतो.

समिधा – खरंच आई. बरं झालं तू सांगितलंस.

आई – होय आणि हे सगळं तुला सांगण्याचं कारण म्हणजे तुलाही रविवारी पाहुणे बघायला येतायत. तर तुही लक्षात ठेव बरं का या गोष्टी. लग्न उशीरा झालेलं चालेल, पण चुकीच्या व्यक्तीशी नाही.

समिधा – हो आई.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of a girl who broke her marriage because to groom hrc
Show comments