मुंबई म्हटलं की धावपळ ही आलीच. इथे राहणारा प्रत्येक माणूस घड्याळाच्या ठोक्यावर आपलं जीवन जगत असतो. कधीही न थांबणाऱ्या या शहरातील माणसांना थोडा वेळ उसंत घेण्याइतपतही वेळ नसतो. पण तरीही काही व्यक्ती त्यांच्या कृतीतून माणुसकीचं दर्शन घडवत असतात. असाच एक प्रसंग माझ्याबरोबरही घडला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेहमीसारखाच दिवस होता. सकाळी ७.३० ला मी ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडले. ८.४० ला ऑफिसला पोहोचले आणि कामाला सुरुवात केली. ऑफिसला येईपर्यंत जाणवणारं कडाक्याचं ऊन अगदी नकोसं होतं. कधी एकदा ऑफिसमध्ये थंडगार एसीत बसतोय असं वाटतं. पण म्हणतात ना कोणतीही गोष्ट मर्यादेतच बरी असते. तसंच ऑफिसमध्ये अर्धा-एक तास झाला की तो एसीही नकोसा वाटतो. त्या दिवशी ही काही तसंच झालं. सकाळपासून अगदी ठणठणीत असताना मला दुपारी अचानक अस्वस्थ वाटू लागलं.

आधी शिंका येऊ लागल्या. झालं आता आपल्याला तापही येणार असं वाटू लागलं आणि थोड्यावेळाने कणकण जाणवूच लागली. तरी कसाबसा संध्याकाळपर्यंत वेळ काढला आणि ६.३० वाजता मी घरी जायला निघाले. माझ्याबरोबर ऑफिसची मैत्रीण होती. दोघी गप्पा मारत गेलो, त्यामुळे तेव्हा दुखणं फार जाणवलं नाही. नंतर मी माझ्या आणि ती तिच्या दिशेने निघून गेली.

ट्रेनमध्ये बसल्यानंतर पुन्हा तसंच अस्वस्थ वाटू लागलं. म्हटलं गेल्या गेल्या आधी डॉक्टरकडे जाईन. पण जसजशी ट्रेन पुढे जात होती तसतशी अस्वस्थताही अधिक वाढत होती. छातीत बारीक बारीक कळा मारू लागल्या. म्हटलं घरी पोहोचेपर्यंत आपण स्वतःला सावरू. ऑफिस ते घर अशा या रेल्वे प्रवासात मला सात स्टेशन लागतात. कधी नव्हे ते माझं स्टेशनही तेव्हा खूप लांब असल्यासारखं वाटू लागलं. थोडा वेळ गेला मी उतरण्यासाठी उभी राहिले. कधी एकदा स्टेशनवर उतरते असं झालं. पण स्टेशन येण्याआधीच माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली. म्हटलं अरे बापरे, आता काय करू? कोणाला काय सांगू?

तरी स्वतःला सावरत मी ट्रेनच्या गर्दीतून उतरले. इतरांना धक्के देत मी आधी बसण्यासाठी बेंचवर जागा शोधली. बॉटलमधलं पाणीही संपलं होतं. शेजारी एक मुलगी बसली होती. माझ्याच वयाची असावी. (तिशीच्या आतील) तिला म्हटलं तुझ्याकडे चॉकलेट आहे का? मला खूप चक्कर आल्यासारखं होतंय. ती ही लगेच उठली आणि थेट स्टेशनवर असणाऱ्या एका दुकानात गेली. तिला मी चॉकलेट सांगितलं होतं पण ती मँगो ज्यूसची एक छोटी बाटली घेऊन आली. त्या ज्यूसचा एक घोट मी घेतला आणि थोडं बरं वाटलं.

घरी फोन लावला आणि आईला स्टेशनवर घ्यायला ये म्हणून सांगितलं. मी तिथे असेपर्यंत ती मुलगीही माझ्याबरोबरच होती. तिचा नंबर मी मागितला, ज्यूसचे ऑनलाइन पैसे पाठवण्यासाठी. पण ती नको म्हणाली. माझी अवस्था पाहून ती स्वतःही काळजीत दिसली. बराच वेळ झाल्यानंतर मीच तिला म्हणाले, तू जा मी जाईन हळूहळू. त्या दिवशी अगदी मरण आल्यासारखंच वाटलं होतं. अशावेळी ही अनोळखी व्यक्ती आपल्या मदतीसाठी धावून आली.

प्रत्येकाची धावपळ ही नेहमीचीच असते. जो तो आपापल्या विचारात गुंतलेला असतो. त्यामुळे माणसांच्या या गराड्यात आपण वावरत असलो तरी माणुसकीचं दर्शन हे क्वचितच घडतं.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of humanity unknow girl helped me at railway station in mumbai chatura pck
Show comments