भारतीय समाजात महिलांचं नेमकं स्थान कोणतं आहे? असा प्रश्नच मला पडतो. मुलीचा जन्म होतो तेव्हा ती आपल्या पालकांच्या अधिकारात वाढते, लग्नानंतर तिचा पती तिच्यावर हक्क गाजवतो आणि पतीच्या मृत्यूनंतर ती आपल्या मुलांच्या आधारे जगू लागते. आपल्या संस्कृतीमध्ये महिलांचं जे स्थान सांगण्यात आलंय, ते केवळ वाचनापुरतंच मर्यादित आहे का? २१व्या शतकामध्ये भारतीय समाज पुढारला आहे, असं आपण छाती ठोकून सांगतो. पण जेव्हा याच समाजात काही पारंपारिक प्रथांच्या आधाराने महिलांचे खच्चीकरण केले जाते, तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजच्या आधुनिक काळातही महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे. आजवर कोणत्याही महिलेची यातून सुटका झालेली नाही. आपला देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना, महिलांच्या प्रगतीमध्ये अडचणी निर्माण करण्याचं कामही काहीअंशी समाजच करत आहे. मग ते महिलांना शिक्षणाच्या आणि नोकरीच्याबाबतीत दिलेली दुय्यम वागणूक असो, पारंपारिक प्रथांमध्ये अडकवून तिची वाढ खुंटवणे असो किंवा तिचे मानसिक खच्चीकरण करणे असो. प्रत्येक महिलेला आपल्या रोजच्या आयुष्यात या गोष्टींचा सामना अजूनही करावा लागतो आहे.

पारंपारिक प्रथांबद्दल बोलायचं झालं तर आजही पतीच्या मृत्यूनंतर भारतीय महिलांकडून त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते. पतीच्या मृत्यूनंतर तिचे कुंकू पुसले जाते, तिच्या बांगड्या फोडल्या जातात. यानंतर या विधवा महिलांनी कोणताही साजशृंगार करू नये, भडक रंग परिधान करू नयेत, कुंकू-टिकली लावू नये अशी एक ना अनेक बंधनं त्यांच्यावर लादली जातात. इतकंच नाही तर विवाहित महिलांच्या हळदी-कुंकूसारख्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची परवानगीही या महिलांना नसते. विधवा महिलांवर इतकी बंधने लादण्याचे कारण तरी काय? बरं, या प्रथा फार पूर्वीपासून चालत आल्याने अशा महिलांमध्ये आधीच मानसिक दडपण पाहायला मिळतं. त्या स्वतःहून ही चौकट मोडण्याचा प्रयत्नही करत नाहीत. याचा प्रत्यय गेल्याच महिन्यात आला.

गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंत नागदे यांच्या निवास्थानी भेट दिली होती. यावेळी त्यांनी अतिशय भावूक क्षण अनुभवला. हा क्षण त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसह शेअरही केला आहे. यावेळी वसंत नागदे यांनी समाज कसा असावा आणि समाजाने प्रत्येक महिलेला कसा पाठिंबा द्यायला हवा याचा आदर्शच घालून दिला.
उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंत नागदे यांच्या मुलाचं नुकतंच निधन झालं. मात्र अशा परिस्थितीतही ते आपल्या सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांचं स्वागत त्यांनी आपल्या विधवा सुनेच्या हस्ते केलं. यावेळी आलेल्या महिलांना हळद कुंकू लावताना सुनबाईंचा हात थरथरत होता. त्यांना हे करताना अवघडल्यासारखं झालं, मात्र वसंतरावांनी लगेचच आपल्या सुनेला आधार देत प्रोत्साहन दिले. दरम्यान, हा संपूर्ण प्रसंग अतिशय भावनिक आणि अंगावर शहारे आणणारा होता. आधुनिक काळात एका वृद्ध सासऱ्याने आपल्या सुनेसाठी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे.

अशीच एक घटना घडली, कोल्हापूर जिल्ह्यातल्या हेरवाड गावात. येथील गावाने समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. या गावाने नेहमीच आधुनिक विचारांची कास धरली आहे. त्यातच, एक प्रसंग आला आणि या गावाने पुन्हा एकदा आपली वैचारिक योग्यता सिद्ध करून दाखवली. या गावाने विधवा महिलांबाबत समाजात सुरू असलेल्या चालीरीती, भेदभावाची परंपरा थांबवण्याचा निर्णय घेतला. आहे. ग्रामस्थ, ग्रामपंचायत, पदाधिकाऱ्यांनी याबाबत चर्चा करून त्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये गावाने महिलांमध्ये भेदभाव करणाऱ्या या प्रथा, जसे की विधवा महिलेचे कुंकू पुसणे, बांगडय़ा फोडणे आदी बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळेच आता गावातील प्रत्येक विधवा महिलेला आता इतर महिलांप्रमाणेच सामान्य जीवन जगण्याचा अधिकार मिळाला आहे.

या लहान लहान वाटणाऱ्या गोष्टी एका महिलेसाठी किती महत्त्वाच्या असू शकतात याची आपण कल्पनाही करू शकत नाही. हीच आधुनिक प्रथा संपूर्ण देशात राबवली गेली तर कितीतरी महिलांचे जीवन सुसह्य होईल आणि त्यांना स्वतःसह समाजाची प्रगती करण्याचे बळ मिळेल!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Struggle of widows in indian society pvp