‘आज संध्याकाळी बागेत नक्की ये.’ ‘येणारेस ना?’ ‘४.३० लाच ना?’ असे सुनीताचे तासातासाने मेसेजेस पाहून रमाला नवल वाटलं.
“एवढी का तहान लागलीय गं माझी?” भेटल्या भेटल्या रमाने विचारलंच.
“अगं, गेले तीन-चार दिवस फार अस्वस्थ झालेय. शेवटी म्हटलं तुझ्याशीच बोलावं.”
“काय झालंय एवढं?”
“मलाही कळत नाहीये, पण घरातला प्रत्येकजण मला गृहीत धरतोय, मलाच शिकवतोय असं वाटतंय. काही घडलं तरी, नाही घडलं तरी, जबाबदार मीच. मागे मला रिक्षाने धडक दिली तेव्हापासून नेहमी काहीतरी दुखत असतं, अशक्तपणा वाटतो त्याबद्दल कोणी साधी चौकशीसुद्धा करत नाही. नवरा ऑफिसमध्ये असल्यासारखा घरीसुद्धा ‘बॉस झोन’ मधून टार्गेट देतो. ‘बँकांची कामं झाली का?, प्लम्बरला बोलावलं का?’ असे प्रश्न, किंवा तुला प्लॅनिंग नाहीच जमत म्हणून लेक्चर. एवढाच संवाद उरलाय आमच्यात.
“युवराज रोहित आपल्याच तारेत. हातात मोबाइल, कानात इयरफोन, ऑफिस आणि मित्रमंडळात मग्न. घरातलं एखादं काम त्याला सांगणारे आपणच वेडे.
“सासूबाईंची तिसरीच तऱ्हा. लग्नाला पंचवीस वर्षं झाली, तरी फोडणी अशी घाल, भाजी धुवून घे असल्या सूचना देत राहतात. तेही माझ्यासारख्या टापटीप आणि पर्टिक्युलर बाईला.”
“खरंय, मला तर तुझ्या टापटिपीचा कॉप्लेक्सच येतो.”
“बघ ना. मला कधी सर्वांचा खूप राग येतो, ओरडावंसं वाटतं, कधी ‘मला काही किंमतच नाही या घरात’ असं फ्रस्ट्रेशन येऊन रडावंसं वाटतं, कधी काही न करता शांत पडून राहावंसं वाटतं. एवढे खालीवर मूड मेनोपॉजमुळे होत असतील का?”
हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: जीवनावश्यक मीठ
“ते एक कारण असेलच, पण पन्नाशी जवळ आली ना, की उताराला लागल्याची जाणीव होते आणि राहून गेलेल्या गोष्टी आठवायला लागतात. मी गेलेय यातून चार-पाच वर्षांपूर्वी. VRS घेतली त्यानंतर असंच निरर्थक, हातून सगळं सुटल्यासारखं वाटायचं.”
“करेक्ट, नेमकं बोललीस. सासऱ्यांच्या आजारपणात मला जॉब सोडावा लागल्यापासून प्रपंचातच अडकलेय. ती खंत पण वर येतेय बहुतेक.”
“तसंही असेल. पण तुझ्या घरी राहिल्यामुळे आणि परफेक्शनच्या आग्रहामुळे सगळं तूच करायचंस किंवा इतरांना सांगत, दुरुस्त करत राहायचं अशी सवय लागली, त्यामुळे तू गरजेपेक्षा जास्त अडकलीस प्रपंचात.”
“असेलही, पण तेव्हा ते आवडत होतं.”
“कारण तेव्हा ती गरज होती. त्याचं कौतुकही व्हायचं. आता परिस्थिती बदललीय. रोहित मोठा झालाय, त्याला तुझ्या सूचना म्हणजे अनावश्यक कंट्रोल वाटतो, तुझ्या नवऱ्याच्या आताच्या टॉप पोझिशनमुळे फॉलोअप घेणे, जाब विचारणे हेच त्याचं काम झालंय. सासूबाईंना आता काम होत नाही, त्या सूचना देत राहतात. तू सवयीने सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करायला बघतेस, पण आता फिटनेस कमी आणि जुन्या गोष्टी वर आल्यामुळे होममेकिंगच निरर्थक वाटतंय. मीही तेव्हा अशीच फ्रस्ट्रेट झाले होते.”
“मग बाहेर कशामुळे आलीस?”
“माझ्या लक्षात आलं, संसाराचं रहाटगाडगं पूर्ण सोडता येणार नाही, पण ‘फक्त तेवढंच’ आयुष्य निरर्थक वाटणार, डिप्रेस करणार. मग एका NGO चं हिशेबाचं काम शोधलं. इतर मदतही करते. त्यांना माझी गरज आहे, बरं वाटतं. घराच्या पलीकडे स्वत:चं छोटंसं विश्व असलं की निरुपयोगी वाटत नाही गं.”
“पण घर महत्वाचं आहेच की.”
हेही वाचा… नातेसंबंध: नवऱ्याची एक्स अजूनही फोन करते?
“हो, पण घरचे मला समजून घेत नाहीत, माझ्या मनासारखा सन्मान देत नाहीत म्हणत चोवीस तास तिथेच किती वर्षं गरागरा फिरणार? घरच्यांशी संवाद करून थोडाफार बदल घडेल, ते तुझेच आहेत, तरीही तुला आवडेल, ‘अर्थ’ वाटेल असा पर्याय शोधावास, कारण अजून वीस-पंचवीस ॲक्टिव्ह वर्षं जायचीत.” रमा ठामपणे म्हणाली.
“खरंच ग, इतकी वर्ष अशा निगेटिव्हिटीत का घालवायची? काय करू शकेन मी?” सुनीता आठवू लागली.
“तुला गाणं येतं, तेच पुढे शिकायचं, एखाद्या संस्थेतल्या मुलांना गाणी, गोष्टी सांगायच्या, नवे ग्रुप जॉइन करायचे, शोधल्यावर पर्याय सापडतीलच.”
“थोडक्यात, प्रपंच करायचाच, पण परिस्थिती बदलतेय हे समजून घेऊन आपल्या आनंदाच्या नव्या, वेगळ्या जागा शोधायच्या, त्यातून एनर्जी मिळवायची. ही खरी ‘आत्मनिर्भर’, सेकंड इनिंग. मस्तच ग.” सुनीता खुशीने म्हणाली.
(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)
neelima.kirane1@gmail.com