Success story of Arushi Agrawal : यशस्वी होण्याचे स्वप्न असावे, मात्र केवळ स्वप्न पहात राहू नये. स्वतःच्या यशाची पाहिलेली स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी तितकीच धडपड करण्याची जिद्द आणि मेहनत व्यक्तीकडे असणे आवश्यक असते. अशाच स्वतःचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या जिद्दी आणि धाडसी व्यक्तिमत्त्वाबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. करोडो रुपयांचा पगार असणाऱ्या नोकरीच्या संधीला नाकारून, गाझियाबादची आरुषी अग्रवाल स्वतःच्या मेहेनतीवर कोट्याधीश कशी बनली, पाहा.
नोकरीच्या विविध संधी स्वतःहून चालून येत असताना त्यांना नाकारणे प्रत्येकाला जमतेच असे नाही. मात्र, आरुषीने तिला आलेल्या अनेक नोकऱ्या नाकारून स्वतःचा ‘टॅलेंटडिक्रिप्ट’ [TalentDecrypt] या नावाचा स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला. मुळच्या उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील रहिवासी असणाऱ्या आरुषीने प्रथम नोयडामधील जेपी इन्स्टिट्यूटमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. नंतर बंगळुरूमधील आयआयएममध्ये व्यवस्थापन म्हणजेच ‘मॅनेजमेंट’चे शिक्षण घेतले. शिक्षणानंतर तिने आयआयटी दिल्लीत इंटर्न म्हणून कामही केले. इतकेच नाही तर कामानंतर आरुषीला तब्ब्ल एक कोटी रुपयांच्या नोकरीची ऑफरदेखील मिळाली होती. मात्र, आरुषीने ती स्पष्टपणे नाकारली.
आरुषी, तिचे आजोबा, [आयआयटीयन] ओम प्रकाश गुप्ता, तिचे व्यावसायिक वडील आणि गृहिणी असणाऱ्या आईकडे आपला आदर्श म्हणून पाहते.
२०१८ साली आरुषीने कोडिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट शिकण्यास सुरुवात केली. पुढच्या केवळ अडीच वर्षांमध्ये तिने आपले टॅलेंटडिक्रिप्ट सॉफ्टवेअर विकसित केले. आता आरुषीची कंपनी ही तरुणांना त्यांच्या आवडत्या नोकऱ्या शोधण्यास मदत करते. आरुषीची कंपनी ही भारतीय कंपनी असून, जगभरातील अमेरिका, सिंगापूर, जर्मनी, UAE, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, नेपाळ आणि इतर ३८० देशांनादेखील सेवा पुरवते. केवळ एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरू झालेल्या या कंपनीने आता तब्ब्ल ५० कोटी रुपयांची मजल गाठली आहे.
कोडिंगच्या आधारे, कंपन्यांच्या ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या परीक्षेबद्दल विश्वासार्हता सुनिश्चित करणाऱ्या या सॉफ्टवेअरद्वारे अनेक शेकडो तरुण मंडळींनी या कंपनीच्या मदतीने नोकरी शोधली आहे. टॅलेंटडिक्रिप्टच्या उत्तम सुरक्षाप्रणालींमुळे हे इतर सॉफ्टवेअर्सपेक्षा अधिक वेगळे ठरते. तरुणांना या कंपनीमध्ये हॅकाथॉनद्वारे घेतल्या जाणाऱ्या व्हर्चुअल स्किल चाचण्यांमध्ये, उत्तीर्ण व्हावे लागते. यानंतर परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या तरुणांना थेट कंपनीद्वारे मुलाखतीसाठी बोलावले जाते. अशा पद्धतीने आत्तापर्यंत शेकडो युवकांना या टॅलेंटडिक्रिप्टच्या माध्यमातून त्यांच्या आवडीच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत.
आरुषीच्या या कामाचे कौतुक भारत सरकारकडूनदेखील झाले आहे. आरुषीला भारत सरकारकडून देशातील अव्व्ल उद्योजिकांपैकी एक म्हणून पुरस्कृत करण्यात आलेले आहे.