असं म्हणतात की, एखादी गोष्ट आपण मनापासून करायची ठरवली आणि त्यासाठी जर का प्रामाणिक प्रयत्न केले, तर त्या गोष्टीमध्ये आपल्याला निश्चितच यश मिळते. असंच काहीसं अफगाणिस्तानमधल्या एका महिलेसोबत घडलं. तिनं तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व अडथळे पार केले आणि आज ती आपल्या गंतव्य स्थानाच्या जवळ पोहोचली आहे. एवढंच नाही, तर ही महिला आज लाखो लोकांची प्रेरणास्थान बनली आहे. इतकंच नाही, तर तिची कथाही खूप रंजक आहे. चला तर जाणून घेऊ या महिलेबद्दल…
किशोरवयात, मनीजा तलाश तालिबानी बॉम्बस्फोटातून थोडक्यात बचावली आणि तिच्या लहान भावाला हातात घेऊन अफगाणिस्तानातून पळून गेली. आज या २१ वर्षीय तरुणीनं ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली अफगाण महिला ब्रेकडान्सर म्हणून इतिहास रचला आहे. काबूलच्या युद्धग्रस्त रस्त्यांपासून ते ऑलिम्पिक स्टेजच्या चमकदार दिव्यांपर्यंत, लवचिकता आणि धैर्याची ही चित्तथरारक कथा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानची रहिवासी मनीजा तलाश केवळ १८ वर्षांची होती तेव्हा ती ब्रेक डान्सिंग कम्युनिटीमध्ये सामील झाली होती. असे सांगितले जात आहे की, हा समुदाय खूपच लहान होता; परंतु या समुदायात सामील होणारी ती एकमेव महिला होती. काही काळापूर्वी ऑलिम्पिक खेळ म्हणून मान्यता मिळालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे मनिजाचे स्वप्न. जेव्हा मनीजा ब्रेक डान्स ग्रुपमध्ये सामील झाली तेव्हा तिला खूप अडचणींचा सामना करावा लागला. कारण- ती जिथून पुढे येतेय तिथून अनेक अडथळे येतात, पडदे असतात आणि मुलींना सर्व काही करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य नसते. तलाशने एका सलूनमध्येही काम करायला सुरुवात केली होती.
मनीजा तलाश ज्या रूढीवादी मुस्लिम समाजातून आली आहे, त्या समाजात अनेक समस्या आहेत; पण ती सातत्याने सर्व अडथळे पार करून, तिच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पुढे जात आहे. ती म्हणते की, मला अफगाणिस्तानातील लोकांपुढे एक चांगला आदर्श म्हणून पुढे यायचे आहे. कारण- येथे महिलांना ज्या प्रकारे वागणूक दिली जाते आणि तिथे त्यांच्यावर होणारा हिंसाचार अत्यंत रानटी स्वरूपाचा आहे. असे असूनही मी या सगळ्याशी लढत पुढे जात आहे. तिला जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या; पण असे असूनही ती मागे हटायला तयार नाही. ती म्हणाली, “जेव्हा मी तालिबानबद्दल विचार करते, तेव्हा मला काळजी वाटते. त्यामुळे माझे स्वप्न पूर्ण करणे आणि लोकांसाठी उदाहरण बनणे हेच माझे ध्येय आहे.”
अफगाणिस्तानपासून दूर असूनही तिला आशा आहे की, ब्रेक डान्सर म्हणून तिचा प्रवास महिला आणि तरुण मुलींना निर्भयपणे त्यांच्या आवडींचा पाठपुरावा करण्यास प्रेरित करील.