नागरी सेवा परीक्षा (यूपीएससी) उत्तीर्ण करणे सोपे नाही. अनेक वेळा उमेदवारांना एक, दोन किंवा तीन वेळा प्रयत्न करूनही या परीक्षेत यश मिळत नाही. सततच्या अपयशामुळे उमेदवाराच्या मनात निराशा निर्माण होते अन् अनेक उमेदवार या निराशेपोटीच प्रयत्न करणे थांबवतात. पण, काही असेही उमेदवार असतात जे सतत अपयश मिळूनही हार मानत नाही. जिद्द व प्रयत्नांच्या जोरावर ते आपलं स्वप्न पूर्ण करतातच.
आज आपण अशाच एका IAS महिला अधिकारीबद्दल जाणून घेणार आहोत, जिने एक-दोन तीन नाही तर तब्बल पाच वेळा यूपीएससी परीक्षेत अपयशाचा सामना केला. मात्र, या अपयशानंतरही आपले प्रयत्न थांबवले नाहीत अन् सहाव्या प्रयत्नात आपलं IAS बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. प्रियांका गोयल असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे.
प्रियांका गोयल ही दिल्लीची रहिवासी आहे. पीतमपुरा येथील महाराजा अग्रसेन मॉडेल स्कूलमधून तिने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. यानंतर तिने दिल्ली विद्यापीठाच्या केशव महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने यूपीएससीची तयारी सुरू केली. प्रियांका गोयलने एकूण सहा वेळा यूपीएससी परीक्षा दिली आहे.
हेही वाचा- १५ चित्रपटांमध्ये काम करून UPSC साठी सोडली फिल्म इंडस्ट्री, पाच अपयशानंतर झाली IAS अधिकारी
सुरुवातीला प्रियांकाला यूपीएससी परीक्षेच्या अभ्यासक्रमाबद्दल पूर्ण माहिती नव्हती. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात ती पूर्व परीक्षाही उत्तीर्ण करू शकली नव्हती. दुसऱ्या प्रयत्नात तिचे केवळ ०.७ गुणांनी कट ऑफ लिस्टमध्ये स्थान हुकले. तिसर्या प्रयत्नात ती यूपीएससीच्या मुख्य परीक्षेपर्यंत पोहचली, मात्र मुख्य परीक्षा ती उत्तीर्ण करू शकली नाही. करोना काळात तिने पाचव्यांदा ही परीक्षा देण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेस तिच्या आईची तब्येत बिघडली. तिच्या आईचे फुफ्फुस ८० टक्के खराब झाले होते. या सगळ्या प्रकारामुळे ती यूपीएससीची पूर्व परीक्षाही उत्तीर्ण करू शकली नाही.
दरम्यान, घरात तिच्या लग्नाची चर्चाही सुरू करण्यात आली होती. नातेवाईकांकडून तिच्यावर लग्नाचा दबाव वाढत चालला होता. प्रियांकाकडे यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी शेवटची संधी होती. या संधीचं सोनं करत तिला आपलं स्वप्न पूर्ण करायचं होतं. अखेर प्रियांकाच्या प्रयत्नांना यश मिळाले अन् २०२२ साली दिलेल्या यूपीएससी परीक्षेत प्रियांकाने ३६९ वा नंबर मिळवत आपलं IAS बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं.