‘ती’ शिक्षिका, नंतर पत्रकार म्हणून कार्यरत होती. पत्रकार असतानाची आव्हाने तर होती, रोजच्या आयुष्यातील संघर्ष होता, पण तिची जिद्द होती आयपीएस अधिकारी होण्याची. तिने तिचे स्वप्न पूर्ण केले. हे स्वप्न जागेपणी दृश्यनिश्चयाने पाहिलेले होते. ‘ती’ म्हणजे आयपीएस अधिकारी प्रिती चंद्रा होय. प्रिती चंद्राचा हा प्रवास म्हणजे अतूट इच्छाशक्ती, जिद्दीचे उदाहरण आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रिती चंद्रा या पत्रकार होत्या. पत्रकारिता करत असताना त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचे ठरवले. आयपीएस अधिकारी होऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न होते. हे स्वप्न दिवास्वप्न किंवा रात्री झोपेत पडलेले स्वप्न नव्हते. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी सांगितल्यानुसार, ‘स्वप्न अशी बघा, जी तुम्हाला झोपू देणार नाहीत.’ प्रिती चंद्रा यांचीही कथा अशीच आहे. यूपीएससी परीक्षा देणे, त्यात यश मिळवणे, हे सहज सोप्पे नसते. अथक प्रयत्न, अभ्यास, स्मार्ट स्टडी, परीक्षा देताना येणाऱ्या आव्हानांवर मात या सर्वातून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होता येते. प्रिती यांना या सर्वांची कल्पना होती. पत्रकार म्हणून कार्यरत असतानाची आव्हाने, घरची सामान्य परिस्थिती आणि आयुष्यात येणाऱ्या अडचणी या सर्वावर तिने मात केली. तिच्यामध्ये परिस्थितीला जुळवून घेण्याची ताकद आणि कमालीची चिकाटी होती.

प्रिती चंद्रा यांचे उल्लेखनीय कार्य

प्रिती चंद्रा या मूळ राजस्थानच्या कुंदन गावातील आहेत. त्यांचा जन्म १९७९ साली झाला. घरची परिस्थिती बेताचीच होती. मुलींना शिक्षण देणारा समाज आसपास नव्हता. त्यांचे शालेय शिक्षण सरकारी शाळेत झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण जयपूरच्या महाराणी कॉलेजमध्ये झाले. प्रिती चंद्रा यांनी एम.ए, एमफिलपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. आधी शिक्षिका म्हणून कार्य केले, नंतर त्या पत्रकार म्हणून कार्यरत होत्या. पत्रकार म्हणून कार्य करत असताना त्यांनी यूपीएससीच्या परीक्षा देण्याचे ठरवले. त्यातही त्यांनी संपूर्ण देशातून २५५ वी क्रमांक प्राप्त केला. यूपीएससीसाठी त्यांनी कोणतीही शिकवणी वर्ग लावला नव्हता. त्यात यश मिळवून त्यांनी विविध उच्च पदे भूषविली आहेत. त्यांनी आपल्या कार्याने स्वतःचे असे अस्तित्व निर्माण केले की, त्यांना आता सिंघम लेडी म्हणून ओळखले जाते. कर्तव्यदक्षता, प्रामाणिकता आणि सचोटीने काम करण्याची वृत्ती ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी विविध पदे भूषवली आहेत. एएसपी म्हणून अलवरमध्ये, एसपी म्हणून कोटा येथे तर बुंदीमध्ये एसपी म्हणून त्या कार्यरत होत्या. बंदी येथे लहान मुलांची तस्करी करणाऱ्या टोळीचा त्यांनी पर्दाफाश केला. हरिया गुर्जर आणि राम लखना या कुख्यात गुन्हेगारांना त्यांच्या नेतृत्वाखाली शोधण्यात यश आले. या घटनेनंतर त्यांना लेडी सिंघम म्हटले जाऊ लागले. करौली येथे त्या एसपी म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक गुन्हेगारांना पकडले आहे. करौली गुंड आणि जुगारी लोकांसाठीच प्रसिद्ध होते. हे गुंड चोऱ्या करून, अपहरण करून लपण्यासाठी अन्यत्र जात. प्रिती यांनी या सर्वांवर लक्ष ठेवले. व्यवस्थित योजना आखून त्यांनी अनेक जुगारी आणि गुन्हेगारांना तुरुंगाची हवा खायला लावली.
त्यांचे घरचे शिक्षित नव्हते. आईचे शिक्षणही अल्पच होते. तरीही त्यांनी प्रिती यांना शिक्षणास प्रोत्साहित केले. उच्च शिक्षित प्रिती यांचा विवाह वरिष्ठ पोलीस अधिकारी विकास पाठक यांच्याशी झाला.
आयपीएस प्रिती चंद्रा यांचे कार्य आणि यश हे प्रेरणादायक आहे. कारण, परिस्थितीला कंटाळून किंवा हतबल होणारी आजची पिढी आहे. घरची परिस्थिती बिकट, दैनंदिन आयुष्यातील आव्हाने या सर्वांवर मात करत, कोणत्याही शिकवणीला न जाता देशात २५५ क्रमांक प्राप्त करणे हे सोपे नाही. जिद्द, चिकाटी आणि इच्छाशक्ती तुम्हाला नक्कीच यश मिळवून देते, हे यातून सिद्ध होते.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story journalist to ips officer know the journey of singham lady vvk