Success Story of Seven Sisters of bihar आपल्या सात मुलींच्या यशामुळे राजकुमार सिंह यांना आकाश ठेंगणं झालं आहे. जे लोक, नातेवाईक त्यांना सतत टोमणे मारायचे, तेच आता त्यांच्याशी आदराने बोलतात. आपल्या मुलांना या सात मुलींच्या यशाचं उदाहरण देतात.
पूर्वी मुलगी म्हणजे आई – बापाला ओझं वाटायचं. कारण मुलगी झाली की तिचा शिक्षणाचा खर्च, लग्न लावून देताना हुंडा वगैरे द्यावा लागे. पण आता समाजात काळानुरुप बदल घडू लागला आहे. हुंडा प्रथा वगैरे बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे, पण काही राज्ये त्याला अपवाद आहेत. हुंडा नाही तर लग्न नाही. खासकरून बिहारसारख्या राज्यात हुंडा ही प्रथा अजूनही अस्तित्वात आहे. त्यामुळे मुलीचा जन्म होताच आई-वडिलांना भारच वाटतो. त्यातही एका पेक्षा जास्त मुली असतील तर समाजाचे टोमणेसुद्धा ऐकावे लागतात. असंच काहीसं प्रकरण आहे बिहारमधील सारण जिल्ह्यातील राजकुमार सिंह यांचं. वंशाला दिवा हवा या इच्छेखातर त्यांना सहा मुली झाल्या. त्यामुळे समाजात त्यांना टोमणे, टीका सहन कराव्या तर लागल्या ते वेगळंच. पण आज त्याच मुलींमुळे राजकुमार सिंह अभिमानाने उभे आहेत. संपूर्ण बिहारमध्ये त्यांचीच चर्चा सुरू आहे.
हेही वाचा >>> विरोध करणाऱ्यांनी आज घेतले डोक्यावर! आजोबांच्या भक्कम साथीने झाल्या आयएएस अधिकारी; वाचा प्रिया राणी यांचा संघर्षमय प्रवास
… तर कहाणी अशी आहे की, बिहारमधील सरणा जिल्ह्यातील ‘एकमा’ गावातील सात बहिणींनी अशी काही कामगिरी करून दाखवली आहे की जे त्यांचे जन्मदातेच काय तर नातेवाईक, गावकऱ्यांनीसुद्धा स्वप्नातसुद्धा विचार केला नसेल. या गावातील राजकुमार सिंह हे गिरणी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. लग्नानंतर आपल्या वंशाला दिवा हवा म्हणून मुला होईल म्हणून ते सात मुलींचे पिता बनले आणि आठवा मुलगा झाला. सात मुली जन्माला घातल्यामुळे त्यांना नातेवाईक, समाजाकडून टोमणे ऐकावे लागत. पण राजकुमार सिंह यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मुली जसजशा वयात येऊ लागल्या तसे नातेवाईक राजकुमार यांच्यामागे लागले की मुलींचं शिक्षण बंद कर. लग्न करून टाक. पुढे शिकवून काय होणार नाही शेवटी त्या दुसऱ्याच्या घरी जाणार आहेत. पण राजकुमार यांनी कधीही नातेवाईवाईकांचं हे बोलणं मनावर घेतलं नाही. ना त्यांनी कधी मुलींच्यामागे लग्नाचा तगादा लावला.
घरची परिस्थिती बेताची असतानासुद्धा त्यांनी मेहनत करून मुलींचे शिक्षण पूर्ण केले. मुलींनीदेखील बापाच्या कष्टाचं चीज करून सरकारी सेवेत अधिकारी पदावर रुजू झाल्या आहेत.
या सात बहिणींमधील सर्वात मोठी राणी कुमारी सिंह सांगतात की, शाळेत असताना बोर्डाच्या परीक्षेला जातेवेळी त्यांनी एका महिला पोलिस अधिकारीला पाहिलं आणि त्यांची काम करण्याची पद्धत आणि दरारा पाहिला तेव्हाच मनाशी पक्कं केलं की आपणदेखील यांच्यासारखं पोलिस अधिकारी बनायचं. पण पुढे भरतीची तयारी करत असताना सराव करतेवेळी गावकऱ्यांकडून टोमणे, तसेच त्यांच्या विचित्र नजरेचा सामना करावा लागला. पण माझं ध्येय निश्चित असल्यानं मी त्याकडे दुर्लक्ष करून सराव चालू ठेवला. अशाप्रकारे सुरुवातीला सर्वात मोठी बहिण राणीकुमारी सिंह, दुसरी बही रेणूकुमारी सिंह या बिहार पोलीस दल आणि सशस्त्र सीमा दलमध्ये भरती झाल्या. नंतर या दोन बहिणींकडून प्रेरणा घेऊन बाकीच्या पाच बहिणी सोनीकुमारी सिंह, प्रीतीकुमारी सिंह, पिंकीकुमारी सिंह, रिंकीकुमारी सिंह, नन्हीकुमारी सिंह या सीआरपीएफ, क्राईम ब्रांच, एक्ससाइज पोलीस, बिहार पोलीस दल, जीआरपी सारख्या दलात अधिकारी पदावर कार्यरत आहेत.
मुलींच्या या यशामुळे राजकुमार सिंह यांना आकाश ठेंगणं झालं आहे. जे लोक, नातेवाईक त्यांना सतत टोमणे मारायचे तेच आता त्यांच्याशी आदराने बोलतात. आपल्या मुलांना राजकुमार सिंह यांच्या मुलींची उदाहरणं देतात. राजकुमारसिंह म्हणतात की, आपल्या समाजाने मुलींना मुलांप्रमाणे समान अधिकार, वागणूक दिली तर मुली खूप काही करू शकतात.
या सात बहिणींच्या कामगिरीमुळे यांच्याकडून प्रेरणा घेऊन, मार्गर्शन घेऊन बिहारमधील हंसराजपुर, एकमा, भरहोपूर, साधपुर, भागांतील अनेक मुली आता पोलीस दलात भरती होत आहेत.
rohit.patil@expressindia.com
© The Indian Express (P) Ltd