अमेरिकेच्या बोस्टनमधील कोलेट दिव्हीट्टोने वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्यांसाठी केलेल्या अर्जांवर, दिलेल्या मुलाखतींवर “ती कंपनीसाठी योग्य नाही” हे उत्तर मिळाले. सततच्या नकारांनंतर एखाद्याने हार मानली असती. परंतु कोलेटने जिद्द सोडली नाही. `डाऊन सिंड्रोम’सारख्या अपंगत्वावर मात करत तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि यशस्वीही करून दाखवला. १५ ठिकाणांहून नकार आल्यानंतर तीस वर्षीय कोलेटने बेकिंगच्या आवडीलाच व्यवसायाचे रूप देत “कोलेटीज् कुकीज” सुरू केले आता ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहे!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : कोण आहे मीरा मुराटी?

“जेव्हा आम्ही कनेक्टिकट या मूळ गावाहून बोस्टनला रहायला आलो त्यावेळी, अर्धवेळ कामापासून ते कार्यालयीन कामापर्यंत सगळ्या स्वरूपाच्या नोकऱ्यांसाठी मी अर्ज केले होते. अर्जांवरून मला मुलाखतींसाठी बोलावलं जायचं. त्या मुलाखतीही माझ्यामते चांगल्या झाल्या असाव्यात. काही दिवसांनी मात्र मुलाखतीचे उत्तर म्हणून “त्यांच्या कंपनीसाठी मी योग्य नसल्याचा” ईमेल यायचा. हे सगळं खरंच हताश करणारं होतं. यामुळे मला वाईटही वाटायचं. असं एकदा नाही तर सुमारे १५ वेळा झाल्यानंतर तर मला आलेलं नैराश्य तुम्ही नक्कीच समजू शकाल. सततचे नकार ऐकूनही मला फक्त घरी बसून राहणं मान्यच नव्हतं आणि आपण काहीच काम करत नसल्याची खंतही मनाला टोचत होती. तेव्हा मी ठरवलं, झालं तेवढं बास झालं. यापुढे मला ज्यामधून आनंद मिळेल तेच करायचं आणि त्याचंच रूपांतर व्यवसायात करायचं,” हे सांगताना कोलेटच्या भावना दाटून आलेल्या होत्या…

आणखी वाचा : सलाम तिच्या जिद्दीला! बाळाला जन्म दिल्यानंतर तीन तासांतच दिली १० वीची परीक्षा!

लहान स्वरूपात सुरू केलेल्या तिच्या आवडीच्या व्यवसायाने थोड्याच दिवसात मोठे रूप घेतले. आजघडीला तिच्याकडे १५ कर्मचारी काम करतात आणि तिने भाडेतत्त्वावर किचनही घेतले असून तिथेच कुकीजचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते. “व्यवसाय सुरू झाल्यापासून आम्ही दहा लाखांहून अधिक कुकीज विकल्या” असे सांगताना कोलेटच्या नजरेत आनंदाची चमक दिसते. “कोलेटीज् कुकीज”चा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तिला स्वतंत्र व्यवसाय कसा करतात, चालवतात याबद्दल पुसटशीही माहिती नसल्याचं ती स्वतःच कबूल करते. पण तरीही व्यवसाय करण्यासाठी तिने पहिलं पाऊल टाकलं असून त्याविषयीचे ज्ञान मिळवण्यासाठी तिने काही क्लासेसमधूनही प्रशिक्षण घेतलं आहे.

आणखी वाचा : असा नादानपणा पुन्हा नाही करणार! – अभिनेत्री नर्गिस फाखरी

“कोलेटीज् कुकीज”ची स्वतंत्र वेबसाईटही तिने तयार केली असून त्याद्वारे बिझनेस कार्ड्स पाठवणे, खरेदीविक्रीच्या पावत्या तयार करणे असं सारं काही ती शिकते आहे. आता तर तिची स्वतःची कंपनी आहे आणि ती विस्तारते आहे. कोलेट आता पालकत्वाच्या भूमिकेत आहे. तिच्या व्यवसायातील कर्मचाऱ्याच्या कामाचं व्यवस्थापन करण्यात ती व्यग्र आहे. हे करत असताना बेकिंग करण्याच्या कामातही वेळप्रसंगी सहभागी होत असते, त्याचाही आनंद घेत आहे. आपल्या अनुभवाचे बोल सांगताना ती म्हणते, “अपंगत्वावर मात करत आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी मी इतरांना प्रेरित करेन. अपंगत्वापेक्षाही तुमच्यातील क्षमतांवर लक्ष केंद्रित करा, असाच सल्ला देईन. यशासाठी कसून मेहनत करा, नेहमीच सर्वांचा आदर करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या स्वप्नांचा पिच्छा सोडू नका, हाच खास मंत्र आहे”, असंही कोलेट आत्मविश्वासाने म्हणते. “आज माझा आणि माझ्या व्यवसायाचा मला खूप अभिमान वाटतो. मला नेहमीच खूप मेहनत करायची आहे आणि माझ्या कंपनीला प्रगतीकडे न्यायचे आहे.

आणखी वाचा : यशोगाथा : ‘सिंगल मदर’ आईच माझी हिरो! संध्या रंगनाथच्या ट्विटनंतर क्रीडाप्रेमीही झाले भावूक!

तिच्या व्यवसायाची लोकप्रियता वाढल्याने आता संपूर्ण अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कॅनडामध्येही “कोलेटीज् कुकीज” वितरित होत आहेत. तिने हा व्यवसाय ज्या प्रसिद्ध कुकीजपासून सुरू केला त्या दालचिनी आणि चॉकलेट चिप्सचे अफलातून मिश्रण असलेल्या “द अमेझिंग कुकी”ला आजदेखील खवय्ये सर्वाधिक पसंती देताना दिसतात. ती म्हणते, की ‘आता आमच्या खाद्यपदार्थांची यादीही विस्तारत असून त्यात ओटमील आणि रेझिन्स कुकीज, पिनट बटर कुकीज आणि हेल्दी ब्रेकफास्ट कुकीज या नवीन चवींचा समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय ग्लुटेनफ्रीचाही पर्याय आणला असून त्यायोगे आम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकू,’ असा विश्वास तिने एका मुलाखतीत बोलून दाखवला. कोलेट आणि तिच्या टीमकडे ऑडर्सचा अक्षरशः पाऊस पडतो. दर आठवड्याला त्यांच्याकडे किमान ३०० ऑर्डर्स येतात.

“‘बेन अँड जेरीज्’ सोबत काम करण्याचं आणि त्यांच्या नामांकित आइस्क्रीमसह माझ्या कुकीज जोडल्या जाव्यात, हे माझं ध्येय आहे. असं झालं तर ते खरोखरच अद्भूत असेल. याशिवाय माझ्या आयुष्याचं आणखी एक अतिशय महत्त्वाचं उद्दिष्ट आहे, ते म्हणजे अपंगांसाठी माझ्याच कंपनीत अधिकाधिक नोकरीच्या संधी मला निर्माण करायच्या आहेत”. आजमितीलासुद्धा कोलेटच्या कंपनीत काम करणारे अर्ध्याहून अधिक कर्मचारी अपंग आहेत, हे विशेष. या स्वरूपाचा निर्णय घेण्यामागचे कारण सांगताना कोलेट म्हणते, की ‘अपंग असताना नोकरीसाठी किती प्रयत्न करावे लागतात, त्या अनुभवातून मी गेले आहे. म्हणूनच अपंग असल्यामुळे नोकरी मिळवण्यात अडचणींना तोंड द्यावं लागणाऱ्यांसाठी मला रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात, इतरांपेक्षा वेगळं ठरण्यात मला आनंद मिळणार आहे’, असंही ती सांगते.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of a disabled girl with down syndrome started her own business after many rejections inspirational vp