UPSC परीक्षा देणे आणि त्यात उत्तीर्ण होणे हे काहींसाठी स्वप्न असते; तर काहींसाठी ते आयुष्यातील एक महत्त्वाचे ध्येय असते. आज आपण अशाच एका ध्येय साध्य करणाऱ्या आणि सामान्य कुटुंबात वाढलेल्या परमिता मलाकर [Paramita Malakar] हिचा प्रवास पाहणार आहोत. उत्तम पगाराची नोकरी असतानादेखील परमिताने यूपीएससी परीक्षा देण्याचे ठरविले. मात्र, पहिल्या प्रयत्नात ती प्राथमिक स्तरावरील परीक्षेतसुद्धा उत्तीर्ण न होऊ शकल्याने परमिताचा आत्मविश्वास कमी झाला.
२०१२ साली भौतिकशास्त्रात ऑनर्सची पदवी मिळवून, परमिताने आपले पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिला कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे BPO मध्ये काम करावे लागले. मात्र, तिने त्या ठिकाणी अधिक काळ न राहता, कॉर्पोरेट क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला
कॉर्पोरेट क्षेत्रात अनेक प्रयत्नांनंतर तिला TCS मध्ये नोकरी मिळाली. या ठिकाणी नोकरी करत असतानाच तिने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन नागरी सेवा करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले. आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी परमिताने यूपीएससी परीक्षा दिली; परंतु त्यामध्ये तिला प्राथमिक स्तरातही उत्तीर्ण होता आले नाही. खरे तर परमिताला तिच्या नोकरीमुळे परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ देता येत नव्हता. पुढे तिची TCS मधील नोकरीदेखील फार काळ टिकली नाही. नोकरी करतानाच, तिने दिलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या परीक्षेत ती उत्तीर्ण झाली आणि मग एसबीआयमध्ये रुजू झाली.
पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीमध्ये अपयश आल्याने, परमिताला ती कोणत्याही मोठ्या परीक्षेत आपण उत्तीर्ण होऊ शकतो की नाही, अशी स्वतःबद्दल शंका येऊ लागली होती. मात्र, स्वतःचा आत्मविश्वास डगमगला असला तरीही तिने प्रयत्न थांबवले नाहीत. २०२० साली परमिताने उपविभागीय माहिती आणि सांस्कृतिक अधिकारी (SDICO) हे महत्त्वपूर्ण पद प्राप्त केले. स्वतःचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी परमिता लहान-लहान सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षा देत यूपीएससी परीक्षेची तयारी करीत होती, असे मत इंडियन मास्टरमाइंडचे असल्याचे, डीएनएच्या एका लेखावरून मिळाली.
परमिताने ३० वर्षांची होईपर्यंत एलआयसी, बँक क्लार्क पीओ, रेल्वे आणि पश्चिम बंगाल लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या होत्या. परंतु, त्याच कालावधीत ती चार वेळा यूपीएससी परीक्षांमध्ये अयशस्वी ठरली होती. २०२२ साली संपूर्ण तयारी करून, तिने प्रथम स्तर पार केला आणि नंतर ती मुख्य परीक्षेतदेखील उत्तीर्ण झाली होती; मात्र ती या वेळेस मुलाखतीच्या फेरीत बाद झाली. पुढे सहाव्यांदा तिने या परीक्षेसाठी तयारी सुरू केली होती. २०२३ च्या परीक्षेत परमिताने प्राथमिक आणि मुख्य परीक्षा पार केल्यावर तिला मुलाखतीसाठी बोलावण्यात आले.
हेही वाचा : बायकोच्या ‘या’ सल्ल्यामुळे, Google चे सीईओ आज दिवसाला कमवतात तब्ब्ल पाच कोटी रुपये! पाहा
गेल्या वर्षी झालेल्या परीक्षांचा निकाल १६ एप्रिल २०२४ ला लागला. हा निकाल पाहून मात्र परमिताला आनंदाचा धक्का बसला. या वर्षी तिचे नाव मेरिट यादीत लागले होते. तिने ऑल इंडियामध्ये ८१२ वी रँक पटकावली होती. यादीत आपले नाव पाहून, परमिताला तिने घेतलेले कष्ट, मेहनत, अपयश आणि अपयशावर केलेली मात यांची आठवण झाली. “सतत नोकरी बदलत राहण्याने अभ्यास करण्याच्या वेळेवर मर्यादा येत होती. मात्र, वर्ष २०२२ मध्ये मी माझ्या पद्धतीत बदल केला. मागच्या प्रयत्नात मी उत्तीर्ण होईन की नाही याबद्दल मी साशंक होते. प्रचंड अभ्यास आणि मोजक्या मॉक परीक्षांमुळे माझी चिंता वाढली होती. परंतु, २०२३ साली मी कोलकत्तामधील एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला आणि तो निर्णय माझ्यासाठी मोलाचा आणि ‘गेम चेंजर’ ठरला,” असे परमिताने म्हटले असल्याची माहिती डीएनएच्या एका लेखातून मिळते.