Who is Druvi Patel : ध्रुवी पटेल ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड २०२४’ची विजेती ठरली आहे. विजेतेपदाचा मुकुट ध्रुवी पटेलच्या डोक्यावर मानाने ठेवण्यात आला आहे. ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड २०२४’ ही भारताबाहेर चालणारी सौंदर्य स्पर्धा आहे. स्पर्धेचे हे ३१ वे वर्ष अमेरिकेतील न्यू जर्सीतील एडिसन शहरात पार पडले. तसेच ध्रुवी पटेलने (Druvi Patel) स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर, कोण आहे ध्रुवी पटेल? तिचा आतापर्यंतचा प्रवास नेमका कसा होता याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या…

मिस इंडिया वर्ल्डवाइड जिंकल्यानंतर ध्रुवी (Druvi Patel) म्हणाली, “मिस इंडिया वर्ल्डवाइड जिंकणं हा एक मोठा सन्मान आहे. हा फक्त क्राऊन नाही, तर माझा वारसा, माझी मूल्यं आणि जागतिक पातळीवर लोकांना प्रेरित करण्याची ही संधी आहे.”

कोण आहे ध्रुवी पटेल? (Who Is Druvi Patel)

अमेरिकेत कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टीमचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी ध्रुवी पटेलला फॅशन जगताचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून ध्रुवीचा कल ग्लॅमरकडे होता. पण, शालेय शिक्षणामुळे तेव्हा ती आवड जोपासणे तिला शक्य होत नव्हते; पण आता ती शिक्षणाबरोबर स्वतःची आवड जपत आहे. याअगोदर २०२३ मध्ये तिला मिस इंडिया न्यू इंग्लंडचा ताज मिळाला होता. त्यानंतर तिने मिस रोड आयलँडदेखील जिंकले आहे आणि मिस वर्ल्ड अमेरिका स्पर्धामध्ये ती स्पर्धकसुद्धा होती. सध्या ती हॅम्डेन, कनेक्टिकट येथे तिचे पालक आणि भावंडांबरोबर राहते. आयटी क्षेत्रातील तिची आवड जोपासण्यासाठी तिने ध्रुवी २०२१ मध्ये क्विनिपियाक युनिव्हर्सिटीमध्ये कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टीमचे शिक्षण घेतले. ही स्पर्धा जिंकल्यानंतर ध्रुवीने बॉलीवूड अभिनेत्री आणि युनिसेफची ॲम्बेसेडर होण्याची इच्छा व्यक्त केली आहे..

हेही वाचा…Success Story : मिसेस इंडिया स्पर्धेने बदललं आयुष्य! एकेकाळी विकले चाकू; वाचा अब्जावधीची कंपनी उभारणाऱ्या चिनू कालाची यशोगाथा

मिस इंडिया वर्ल्डवाइड २०२४ बद्दल

मिस इंडिया वर्ल्डवाइड २०२४ या स्पर्धेत सुरीनामच्या लिसा अब्दोएलहक ही पहिली उपविजेती ठरली; तर नेदरलँड्सची मालविका शर्मा दुसरी उपविजेती ठरली आहे. मिसेस कॅटेगरीमध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोची सुएने माउटेट हिने किताब आपल्या नावावर केला आहे; तर स्नेहा नांबियार उपविजेती आणि युनायटेड किंग्डमची पवनदीप कौर ही तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. ग्वाडेलूपच्या सिएरा सुरेटेला हिने किशोर गटात ‘मिस टीन इंडिया वर्ल्डवाइड’चा किताब जिंकला आहे. नेदरलँडची श्रेया सिंग व सुरीनामची श्रद्धा टेडजो यांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक देण्यात आल्याचे घोषित करण्यात आले आहे.