राधिका सध्या भारतीय लष्करात कार्यरत आहे. ती मूळची बायोटेक इंजीनीअर आहे. मुंबई आयआयटीमधून तिनं अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. आठ वर्षांपूर्वी लष्करात रुजू झालेल्या राझिकावर एक खूप मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मिशनअंतर्गत कांगो या देशात ती तैनात होती. रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये मोनुस्को (MONUSCO) म्हणजेच संयुक्त राष्ट्रांच्या शांतता प्रस्थापित करणाऱ्या मोहिमेअंतर्गत एंगेजमेंट प्लॅटून कमांडर म्हणून ती तैनात होती. तिच्या नेतृत्वात २० महिला आणि १० पुरुषांची फौज तिथे तैनात करण्यात आली होती. शांतता राखणं एवढंच या शांतता सेनेचं कार्य नसतं. तर त्याशिवाय तिथलं विस्कळीत झालेलं जनजीवन रुळावर आणणं, सुरळीत सुरू करणं हेही महत्त्वाचं काम शांतता सेना करते. कांगोमध्ये शांतता राखण्यात तर त्यांनी भूमिका बजावलीच. पण तिथलं जनजीवन परत रुळावर आणण्यासाठी तिनं भरपूर प्रयत्न केले. या प्रयत्नांचं फळ म्हणूनच तिचा संयुक्त राष्ट्राच्यावतीने गौरव करण्यात आला. कांगोमध्ये लोकांशी संवाद साधणं हे सगळ्यांत महत्त्वाचं काम होतं, ते राधिकाने अत्यंत प्रभावीपणे केलं. त्याशिवाय निर्वासितांच्या समस्या सोडवणं, संघर्ष क्षेत्रातील महिला आणि मुलांकडे विशेष लक्ष देणं, त्यांच्या समस्या ऐकून घेणं त्या सोडवण्याचा प्रयत्न करणं हीदेखील या फौजेची मुख्य कार्ये होती. महिला सुरक्षेसाठीही तिनं पुढाकार घेतला. पण राधिकाच्या नेतृत्वाखाली या फौजेने महिला आरोग्य, बालसंगोपन, लैंगिक समानता, शिक्षण, रोजगार अशा विषयांवर विविध सत्रे आयोजित केली. तिथल्या मुलांसाठी इंग्रजी बोलण्याचे विशेष क्लासेस घेतले. तरुणांसाठी कौशल्य विकास उपक्रम राबवले. लोकांना त्यामध्ये सहभागी करून घेतलं. त्यांचा आत्मविश्वास वाढवला. या सगळ्या प्रयत्नांसाठी राधिकाचा विशेष गौरव करण्यात आला. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटेनियो गुटरेस यांनीही तिचं विशेष कौतुक केलं होतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा