Success Story Of Shash Soni : पूर्वीच्या काळी महिलांच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी असायची, त्यामुळे तेव्हा स्त्रियांना नोकरी करणे जमायचे नाही. पण, बदलत्या काळानुसार आता स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नोकरीबरोबर घरही सांभाळताना दिसत आहेत. महिला आता मोठमोठ्या कंपनीच्या मालकसुद्धा बनल्या आहेत. यशस्वी महिलांची यशोगाथा (Success Story)पाहून किंवा ऐकून कोट्यवधी गृहिणींना काही तरी मोठं काम करण्याची प्रेरणा मिळते. तर आज आपण अशाच एका महिलेबद्दल या लेखातून जाणून घेणार आहोत, ज्यांनी १० हजार रुपयांच्या भांडवलावर एक छोटा व्यवसाय सुरू केला आणि आता त्यांच्या व्यवसायाचं साम्राज्य ४१०० कोटी रुपयांचं आहे.
शशी सोनी असे या महिलेचं नाव आहे. शशी सोनी यांची कथा (Success Story) सेल्फ-मेड, अत्यंत प्रेरणादायी व विलक्षण आहे. शशी सोनी यांनी १९७१ मध्ये त्यांनी पहिल्यांदा व्यवसाय सुरु केला. दीप ट्रान्सपोर्ट सुरु केलं. केवळ दहा हजार रुपयांचं भांडवल गुंतवून त्यांनी दीप ट्रान्सपोर्ट सुरु केलं आणि ते १९७५ पर्यंत चालवलं. पुढे त्यांनी मुंबईच्या मुलुंड परिसरात दीप मंदिर सिनेमाचे उद्घाटन केले. हा व्यवसाय त्यांचा १९८० पर्यंत चालला.
वेगवेगळ्या क्षेत्रांत आजमावलं नशीब :
दीप ट्रान्सपोर्ट, दीप सिनेमा मंदिर या व्यवसायात त्यांना फारसं यश आलं नाही, म्हणून त्यांनी नंतर म्हैसूरमध्ये ऑक्सिजन प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. या गॅस निर्मिती प्रकल्पातून त्यांनी यशाची पायरी चढण्यास सुरुवात केली. हळूहळू व्यवसाय वाढल्यानंतर त्यांनी तांत्रिक व्यवसायात त्यांनी प्रवेश केला. २००५ मध्ये, शशी सोनी यांनी Izmo Limited नावाच्या सॉफ्टवेअर कंपनीची स्थापना केली ; जी मार्केट सोल्यूशन्स प्रदान करते. त्यांची कंपनी आज जागतिक स्तरावर हाय-टेक ऑटोमोटिव्ह आणि ई-रिटेलिंग सेवा प्रदान करते आहे. शशी सोनी या कंपनीच्या चेअरपर्सन म्हणून तेथे काम पाहत आहेत.
व्यवसायाव्यतिरिक्त शशी सोनी विविध सामाजिक क्षेत्रांमध्येही गुंतलेल्या आहेत. त्या दीप जनसेवा समितीच्या सदस्यदेखील आहेत. ही संस्था महिलांसाठी नोकरी, महिलांसाठी शिक्षण, निवृत्तीवेतन योजना आणि भिन्न-अपंग लोकांसाठी निधी उभारणीकडे लक्ष देते. शशी सोनी यांचा २०२४ साठीच्या पद्म पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. पद्मश्री मिळवण्याआधी, शशी सोनी यांनी व्यवसाय आणि समाजकल्याण क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख मिळवली आहे. १९९० मध्ये त्यांनी भारतीय उद्योगातील योगदानासाठी वुमन ऑफ द इयर पुरस्कारसुद्धा जिंकला आहे. तसेच, त्या ऑल इंडियन इंडस्ट्रीयल गॅस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या समिती सदस्या म्हणून काम करतात आणि तांत्रिक विकास संचालनालयाच्या सदस्यादेखील आहेत.
तर आज आपण शशी सोनी यांचा प्रेरणादायी प्रवास (Success Story) लेखातून जाणून घेतला…