प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी ना कधी आव्हानात्मक स्थिती निर्माण होते. अशा परिस्थितीवर संयमाने मात करणे महत्त्वाचे असते. अशा कठीण परिस्थितीतून हार न मानता मार्गही काढता येऊ शकतो. याचे उदाहरण उत्तर प्रदेशमधील कृष्णा यादव या आहेत. आज आपण महिला उद्योजिका कृष्णा यादव यांच्याविषयी जाणून घेणार आहोत.

त्यांना भाजी विकत घेणे परवडत नसे

उत्तर प्रदेश या राज्यातील छोट्याशा गावात राहणाऱ्या कृष्णा यादव. त्यांच्या आयुष्यात एक काळ असा आला होता की कृष्णा यादव यांच्या कुटुंबाला पोळीबरोबर मीठ खावे लागत असे, कारण त्यांना भाजी विकत घेणे परवडत नसे. मात्र, या परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्यांनी रस्त्याच्या कडेला लोणचे विकण्यास सुरुवात केली. त्यांची प्रसिद्धी वाढत गेली. आज त्या श्री कृष्णा पिकल्स नावाची कंपनी चालवतात. या कंपनीचे वार्षिक उत्पन्न पाच कोटी रुपये आहे.

कृष्णा यादवच्या पतीला वाहतूक पोलिस अधिकाऱ्याची नोकरी गमवावी लागली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्यांना त्यांची दोन घरे विकावी लागली. हा काळ असा होता की त्यांना भाजी विकत घेणेदेखील परवडत नसे. त्यांच्या कुटुंबाने अनेक दिवस पोळीबरोबर मीठ खाऊन काढले.

अनेक दिवस संघर्ष केल्यानंतर कृष्णा यादव यांनी आपली तीन मुले आणि पतीसह दिल्लीला स्थलांतर केले. त्यावेळी त्यांच्याकडे फक्त पाचशे रुपये होते. त्यांनी शेतात काम करायला सुरुवात केली. भाजीपाल्याचे उत्पन्न घ्यायला सुरुवात केली, मात्र त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्यानंतर कृष्णा यादव यांनी कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला. तिथे त्या मुरांबा आणि लोणचे बनवायला शिकल्या. २००२ मध्ये त्यांनी घरी करवंदाचे लोणचे आणि कॅन्डीज बनवायला सुरुवात केली. हे लोणचे त्यांचे पती रस्त्याकडेला विकत असत.

त्यांनी बनवलेल्या लोणच्याच्या चवीच्या वेगळेपणामुळे आणि दर्जामुळे त्यांच्या उत्पादनाची मागणी वाढू लागली. पुढील काही वर्षांत त्यांनी स्वत:ची कंपनी सुरू केली. त्यांचे पती आणि मोठा मुलगादेखील या व्यवसायात त्यांना मदत करतो. त्यांची इतर दोन मुले उच्च शिक्षण घेत आहेत. त्यांच्या यशामुळे कधीही शाळेत न गेलेल्या कृष्णा यादव यांना दिल्लीतील मुलींच्या शाळेत लेक्चर देण्यास बोलावले जाते.

हेही वाचा: Loan For Women Entrepreneurs : बँक कर्ज नको, सरकारी योजना माहीत नाहीत; महिला उद्योजकांना कुठून मिळतं भांडवल? सर्वेक्षणातून बाब उघड!

कृष्णा यादव यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. २०१२ मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाकडून त्यांना उत्कृष्ट महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०१३ मध्ये जागतिक कृषी परिषदेत त्यांना शेती आणि संलग्न गोष्टींसाठी इनोव्हेटिव्ह अवॉर्ड देण्यात आले आहे. २०१४ मध्ये प्रतिष्ठित एन जी रंगा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात आला होता.