Success story: करोना महामारीनंतर सोशल मीडियाचा वापर अनेक पटींनी वाढला आहे. डिजिटल युगाचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम होत आहे. शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही सोशल मीडियामुळे खूप बदल झाले. आधुनिकतेच्या युगात सर्वांच्याच हाती स्मार्टफोन आले. अशाच एका स्मार्टफोनमुळे एका गृहिणीचं आयुष्य पूर्णपणे बदललं. दोन वर्षांपूर्वी तिचे आयुष्य उत्तर प्रदेशातील कौशांबी येथील तिच्या लहानशा गावातल्या इतर गृहिणींपेक्षा फारसे वेगळे नव्हते. तिचा नवरा रोजंदारी मजूर म्हणून काम करत होता आणि ती घरातील कामे सांभाळत पतीच्या वृद्ध आई-वडिलांची काळजी घेत होती. मात्र, २०२१ मध्ये दिवाळीच्या दिवशी तिच्या हातात आलेल्या स्मार्टफोननं तिचं नशीबच बदललं म्हणायला हरकत नाही. आम्ही बोलत आहोत उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागातील यशोदा लोधी यांच्याबद्दल. आपल्या टॅलेंटचा वापर करून यशोदा लोधी यांनी त्यांच्यासह कुटुंबाचंही नशीब पालटलं आहे. अतिशय गरिबीत दिवस काढणाऱ्या यशोदा लोधी यांची आजच्या तारखेतली कमाई ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
एकेकाळी ३०० रुपयांत घर चालवणारी गृहिणी ते युट्यूबर
एकेकाळी ३०० रुपयांत घर चालवणारी गृहिणी आज महिन्याला हजारो रुपयांची कमाई करते आहे. २८ वर्षीय यशोदा लोधी यांनी हे सगळं युट्यूबच्या माध्यमातून शक्य करून दाखवलं आहे. त्यांनी ‘इंग्लिश विथ देहाती मॅडम’ नावाचे चॅनेल केवळ ११ महिन्यांपूर्वी सुरू केले होते. यामध्ये यशोदा लोधी युट्यूबवर इंग्रजी शिकवतात. यशोदा कौशांबी सिरथू येथील रहिवासी आहेत. त्यांच्या युट्यूब चॅनेलद्वारे त्यांनी लाखो लोकांना इंग्रजीच्या युक्त्या शिकवल्या आहेत. यशोदा लोधी साडी, कपाळावर बिंदी अशा एखाद्या सामान्य खेडेगावातील स्त्रीसारख्या दिसतात. मात्र, त्यांची इंग्रजी बोलण्याची आणि शिकवण्याची शैली सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. सोप्या पद्धतीनं इंग्रजीचे धडे देण्यासाठी यशोदा आता ओळखल्या जातात.
द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना यशोदा लोधी सांगतात, सुरुवातीला इंग्रजी शिकण्यासाठी मी घरातली कामे करताना इतरांचे इंग्रजी एकायचे. इतर लोक कसे बोलतात हे ऐकून ऐकून मी स्वत: बोलायला सुरुवात केली. यशोदा लोधी यांचा दिवस पहाटे ३ वाजता सुरू होतो. सुरुवातीला पुस्तके वाचणे, तासभर इंग्रजी बोलण्याचा सराव करणे आणि नंतर YouTube चॅनेलसाठी व्हिडीओ शूट करणे, यासोबतच घरातली कामेही करणे, असा त्यांचा दिनक्रम असतो. यशोदा लोधी पुढे सांगतात, “मी स्वतः शूट करते, एडिट करते आणि अपलोड करते. हे कौशल्यही मी YouTube व्हिडीओ पाहून शिकली आहे. यशोदा या युट्यूब चॅनेलमधून महिन्याला सुमारे १५ ते २० हजारांपर्यंत कमावतात.
युट्यूबची सुरुवात कशी झाली
युट्यूबची सुरुवात कशी झाली सांगताना यशोदा लोधी सांगतात, “ मी संदीप माहेश्वरींचा एक व्हिडीओ पाहिला, जिथे ते म्हणाले की कोणीही YouTube वर आपली ओळख बनवू शकतो आणि चांगली कमाईदेखील करू शकतो. तिथून, मी इतर व्हिडीओ पाहण्यास सुरुवात केली आणि या युट्यूब जगाचे धडे घेण्यास सुरुवात केली. “माझ्या आजूबाजूला कोणीही इंग्रजी बोलत नाही किंवा त्यांना समजत नसल्याने, त्या वातावरणात अस्खलित इंग्रजी बोलणे कठीण व्हायचे. म्हणून मी माझे व्हिडीओ पाहणाऱ्यांकडून फीडबॅक घेण्याचे ठरवले. लोकांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले आणि आत्मविश्वास दिला,” त्या म्हणाल्या.
डिसेंबर २०२२ मध्ये यशोदा यांनी चॅनेल सुरू केल्यापासून ‘अनोळखी व्यक्तींशी इंग्रजीमध्ये संभाषण कसे करावे’ ते ‘तुम्हाला इंग्रजी का शिकायचे आहे’ या विषयांसह ३६८ व्हिडीओ अपलोड केले आहेत. ‘इंग्रजी बोलण्याच्या भीतीवर मात कशी करावी’ या शीर्षकाचे व्हिडीओदेखील आहेत, जे व्हायरलही झाले आहेत. अनेक व्हिडीओ लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहेत.
भविष्यातील स्वप्नांबद्दल त्या म्हणाला, “मला अशी शाळा उघडायची आहे, जिथे प्रत्येकाला मोफत शिक्षण मिळेल आणि ज्यांची काळजी घेणारे कोणी नाही त्यांच्यासाठी वृद्धाश्रम सुरू करायचा आहे.”