मृण्मयी साटम
लेस्टर युनिव्हर्सिटीतील ‘द सेंटर फॉर अर्बन हिस्ट्री’मध्ये सप्टेंबर, २०१५ मध्ये मी पीएचडीसाठी प्रवेश घेतला होता. ‘पब्लिक हेल्थ इन कलोनिअल बॉम्बे सिटी’ हा माझा अभ्यासविषय आहे. त्यात मी १९१४ ते १९४५ हा पहिल्या नि दुसऱ्या महायुद्धामधला कालखंड अभ्यासला. शहरातील सार्वजनिक आरोग्याशी संबंधित व जीवनावश्यक ठरणाऱ्या पायाभूत सुविधांची उपलब्धता, त्यांचे व्यवस्थापन या विषयांचा अभ्यास करून त्यात झालेल्या परिवर्तनामुळं झालेले व्यापक बदल अधोरेखित करून त्यांची सविस्तर मांडणी करणं हा या प्रबंधाचा उद्देश होता. २९ ऑगस्ट २०१९ मध्ये थिसीस यशस्वीपणं डिफेंड केला आणि १६ जानेवारी २०२० मध्ये मला पीएचडी मिळाली.
आणखी वाचा : यशस्विनी : इतिहासाकडे पाहण्याची ‘डोळस’वृत्ती लाभली (पूर्वार्ध)
अर्थात मी हे लिहिते आहे, इतक्या सहजपणं गोष्टी झाल्या नाहीत. पीएचडी करताना २०१६ मध्ये मला डिप्रेशन (नैराश्य) आणि हायपोथायरॉईडीझमचं निदान झालं. कारण होतं युकेमधले हवामान- प्रचंड थंडी, लवकर होणारा काळोख. शिवाय कुटुंबापासून पहिल्यांदाच एवढ्या लांब एकटी राहिले होते. डिप्रेशनमध्ये असताना एकटेपणा आणि भीती जाणवत असे, तेव्हा आईनं तिच्या कवितेतील आश्वासक शब्दांच्या माध्यमातून मला कायमच धीर दिला. डिप्रेशनवर उपचार सुरू असताना पीएचडीचं कामही सुरू होतं. पहिल्या वर्षात बऱ्याचदा आपण पीएचडी का करतो आहोत, हा प्रश्न मनात डोकावला. त्यामागचं एक कारण होतं डिप्रेशन. पीएचडीचा अभ्यास काठिण्य पातळीवरचा असतो. त्यामुळं मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा कस लागल्याशिवाय राहात नाही. त्यावर उपाय म्हणून उपचार सुरू असताना मी युकेमध्ये ट्रेकिंग सुरू केलं, रोज जिमला जायचे. स्वतःचं एक वेळापत्रक आखलं आणि ते जमेल तितकं पाळायचा प्रयत्न करत राहिले.
आणखी वाचा : चॉइस तर आपलाच : अपेक्षांचा ताण
माझा ब्रिटिश मित्र आणि डिपार्टमेंटमधले सिनिअर पीएचडी अभ्यासक रिचर्ड मॉरीस यानं आणि त्याच्या कुटुंबानं मला मदतीचा हात दिला. पहिल्या वर्षी डिप्रेशनचं निदान झाल्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये असताना तो मला भेटायला येताना नाश्ता-जेवण घेऊन येई. जवळपास चक्कर मारायला घेऊन जात असे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रिचर्डच्या आई-बाबांनी मला त्यांच्या घरी दोन महिने राहू दिलं. माझा आहार-औषधांवर त्यांचं बारीक लक्ष असायचं. त्यांच्या या प्रेम आणि आपुलकीमुळं परदेशात मला दुसरं घर मिळालं.
युनिव्हर्सिटी ऑफ लेस्टरची स्कॉलरशिप मला मास्टर्समध्ये प्रथम क्रमांक मिळाल्यामुळं मिळाली होती. रॉयल हिस्ट्रॉरिकल सोसायटी इन लंडन, इकॉनॉमिक हिस्ट्री सोसायटी (युके), युनिव्हर्सिटी ऑफ स्ट्राटक्लाइड (युके), फ्रामजी कावसजी इन्स्टिट्यूट मुंबई आदी महत्त्वाच्या संस्थांसह अनेक संस्थातर्फे पीएचडीचा अभ्यास करताना मला वेळोवेळी संशोधन आणि प्रवासासाठी ग्रँट मिळाली. या सगळ्या स्कॉलरशिपसाठी मी अर्ज केले होते. फॉर्म भरून रिसर्च प्रपोजल लिहून सादर केलं होतं. या शिष्यवृत्ती स्पर्धात्मक असतात. निवड समितीतर्फे योग्य उमेदवारांची निवड केली जाते. पीएचडीच्या काळात मी सतत या शिष्यवृत्तींच्या अर्जांच्या डेडलाईन्सवर लक्ष ठेवायचे. पीएचडीच्या कालावधीत फंडिंगचा ओघ कायम ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं ठरतं. कारण तसं न झाल्यास संशोधन खर्च वाढतच राहतो.
आणखी वाचा : आहारवेद : गरोदर महिला व गर्भस्थ बाळासाठी सर्वोत्तम कोहळा
विद्यापीठात पीएचडीचा प्रबंध सबमिट करायच्या दिवसाची गोष्ट आहे ही. तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय होता आणि मला अगदी भरून आलं होतं. जवळपास साडेतीन वर्षांचा सगळा प्रवास एखाद्या चित्रपटाची रिळं उलगडावीत तसा डोळ्यांसमोर येत होता. त्यातले अडथळे आणि निभावून जाणं हे सारं काही जाणवत होतं. त्या मोलाच्या क्षणी आई-बाबा, माझा भाऊ कौस्तुभ आणि आजी माझ्यासोबत हवे होते असं प्रकर्षानं जाणवलं. मग मी आणि बाबा- भाईं व्हीडिओ कॉलच्या माध्यमातून कनेक्ट झालो. शेकडो मैल दूर असूनदेखील ते तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं माझ्यासोबत होते. तेव्हा माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. भाईंना मी कधीच रडताना पाहिलेलं नाही. पण तेव्हा पहिल्यांदा त्यांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले. हा क्षण कायमच अविस्मरणीय राहिल. माझं स्वप्नं प्रत्यक्षात-सत्यात उतरत होतं आणि ते मी माझ्या कुटुंबासोबत अनुभवत होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे बाबा कायमच माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी त्या क्षणी आभासी माध्यमातून हजेरी लावलीच. माझ्या पालकांच्या आणि आजी-आजोबांच्या अविरत कष्ट आणि त्यागामुळंच मी पीएचडी मिळवू शकले. हा प्रवास सोपा नव्हता आणि म्हणूनच हा थिसिस मी आई आणि भाईंना अर्पण करते.
आणखी वाचा : चला, यावर्षी स्वत:साठी जगूया !
२०१८ पासून माझ्या संशोधनाविषयी सादरीकरण करण्यासाठी मला इंग्लड, अमेरिका आणि भारतातील आंतरराष्ट्रीय परिषदा आणि अकादमिक इव्हेंटमध्ये सहभागी होण्याची, बोलण्याची संधी मिळाली. युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहममध्ये सप्टेंबर २०१९ रोजी एका पेपरच्या सादरीकरणासाठी माझी निवड झाली होती. सादरीकरणानंतर माझ्या प्रबंधाची एका पुस्तकात समाविष्ट करण्यासाठी म्हणून निवड झाली. ते पुस्तक अद्याप प्रकाशित झालं नाही, मात्र त्यासाठी घेतलेली मेहनत फुकट गेली आहे, असं अजिबात वाटलं नाही. ते संशोधन पुढं प्रकाशित करता येईल. पीएचडीच्या सुरूवातीला अकादमिक व संशोधनात्मक लेखन ही माझी कमकुवत बाजू होती आणि पीएचडीच्या शेवटी माझ्या लिखाणाची एका पुस्तकात समाविष्ट करण्यासाठी निवड होणं, ही गोष्ट माझ्या दृष्टीनं एका चांगल्या कामगिरीचं द्योतक आहे.
देश-परदेशातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये मला अभ्यागत व्याख्याता म्हणून आमंत्रित केलं जातं. सिस्टमॅटिक लिटरेचर रिव्ह्यू, इन्फ्लूएंझा अॅण्ड कोविड-१९ : हिस्ट्री ऑफ पॅन्डेमिक्स, रीसर्च एथिक्स अॅण्ड रायटिंग इन सोशल सायन्सेस आदी अनेक विषयांचा त्यात समावेश होतो. त्याखेरीज काही परिषदांमध्ये मी ट्रेण्डस इन हेल्थ अॅण्ड मॉर्टॅलिटी : बॉम्बे सिटी, १९१४- १९४५ पब्लिक हेल्थ क्रायसिस इन मुंबई – ए हिस्टॉरिकल कम्पॅरिटिव्ह अप्रोच आदी विषयांवर सादरीकरण केलं आहे.
आणखी वाचा : Open Letter: चित्राताई वाघ, उर्फीवर कारवाई करण्यास एवढा उशिराचा मुहूर्त का?
माझं संशोधन अनेक ॲकॅडमिक आणि काही लोकप्रिय प्रकाशनांमध्ये प्रसिद्ध झालं. जर्नल ऑफ कलोनिअलिझम अॅण्ड कलोनिअल हिस्ट्री साठी चार पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत. प्रसिद्ध मराठी वृत्तपत्रांत माझे लेख प्रकाशित झाले असून ऑनलाईन माध्यमांतूनही मी लिहिते. या लिखाणामुळं इतिहासप्रेमींसह सामान्यांना इतिहासाच्या पाऊलखुणा आणि वर्तमानातील अडचणी-आव्हाने यांचा संबंध उलगडता येतो.
संशोधनाचं काम करता करता मी आणखीही काही पूरक गोष्टी केल्या. मुंबईच्या सेंट झेव्हिअर्स महाविद्यालयातील इतिहास विभागात मी हंगामी व्याख्याता होते. तर पुढं लेस्टर विद्यापीठात स्कूल ऑफ हिस्ट्रीमध्ये असोसिएट ट्यूटर होते. मार्च २०२१ मध्ये माझी लंडनच्या रॉयल हिस्टॉरिकल सोसायटीमध्ये पाच वर्षांसाठी अर्ली करिअर मेम्बर म्हणून निवड झाली. मध्यंतरी मला ऑल इंडिया रेडिओ- आकाशवाणी मुंबई, अस्मिता वाहिनीवर रत्नागिरी, सिंधूदुर्ग आणि जळगाव जिल्ह्यांतील भारतीय स्वातंत्र्यलढ्याबद्दल बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं.
जानेवारी २०२० मध्ये मला पीएचडीची पदवी मिळाली. त्याच महिन्यात अमिटी युनिव्हर्सिटीमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कामाला लागले. २०२० ते २०२१ मध्ये कोरना संकटामुळं फारसं संशोधन करता आलं नाही. त्या दोन वर्षांत ऑनलाईन कॉन्फरन्समध्ये सहभागी होत होते आणि झूमवर बऱ्याच ॲकॅडमिक इव्हेंट आयोजित केल्या. माझ्या थिसिसमध्ये इन्फ्लुएन्झा पॅनडॅमिकवर (१९१९) मी एक प्रकरण लिहिलं आहे. बरोबर शंभर वर्षांनी कोव्हिड १९ च्या दरम्यान माझ्या इतिहास संशोधनाला बराच वाव मिळाला. मला बऱ्याच संस्थांमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून बोलावलं गेलं. माझे लेख प्रसिद्ध झाले. इन्फ्लुएन्झा आणि कोव्हिडमधले साधर्म्य व फरक यावर तज्ज्ञ म्हणून माझे विचार मांडता आले. ऑक्टोबर २०२१ पासून याच विद्यापीठातील अमिटी इन्स्टिट्यूट ऑफ लिबरल आर्टस् मध्ये इतिहासाची असिस्टंट प्रोफेसर झाले. मी इतिहासाचा अभ्यासक्रम ठरवते आणि बीए. (हि.) लिबरल आर्ट प्रोग्रॅमचा समन्वय साधते.
करिअरमधील वैविध्याखेरीज छायाचित्रण, ट्रेकिंग आणि सोलो ट्रॅव्हलिंग हे छंद अजूनही जोपासत आहे. माझे पीएचडीचे मार्गदर्शक डॉ. प्रशांत किदंबी यांनी पीचडी सुरू करताना मला स्पष्टपणं सांगितलं होतं की पाच दिवस काम करायचं आणि दोन दिवस छंदांसाठी राखीव ठेवायचे. सुदृढ शरीर आणि निकोप मन असा समतोल राखता आला पाहिजे. त्यांनी सांगितल्याप्रमाणं अजूनही वीकडेजला ॲकॅडमिक आणि संशोधनाचं काम आटोपते आणि वीकएण्डला छंद जोपासते. हा समतोल राखायचा नेहमीच जमतं असं नाही, पण प्रयत्न जरूर करते. त्यामुळं २०१५ पासून मी खूप फिरले आहे. ट्रेकिंग सतत सुरू असतं आणि ते करताना आपोआपच छायाचित्रणालाही वाव मिळत राहतो. आता ध्यास आहे तो माझ्या पीएचडीचा थिसिस पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध करण्याचा. त्यावरचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर प्रकाशक शोधायचं काम करायचं आहे. सोशल हिस्ट्री ऑफ हेल्थ अँड हेल्थ केअर याच क्षेत्रात पुढं संशोधन करायचं आहे. मुंबई आणि कोल्हापूरचा विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातल्या घडामोडींची तुलनात्मक निरीक्षणं नोंदवण्याचा मानस आहे.