Sudha Murthy on Rakshabandhan 2024 : राज्यसभेच्या खासदार, प्रसिद्ध लेखिका, समाजसेविका तथा इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्ष सुधा मूर्ती यांनी रक्षाबंधनानिमित्त भाऊ-बहिणीच्या नात्यातील एक ऐतिहासिक कथा विषद केली आहे. व्हिडिओद्वारे त्यांनी ही कथा सांगितली असून बहीण आपल्या भावासाठी कितीही अंतर कापून येऊ शकते, असं त्या म्हणाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“माझ्यासाठी रक्षाबंधन आणि राखी हा महत्त्वाचा सण आहे. बहीण साधा राखा आपल्या भावाला बांधते. बहिणीच्या कठीण काळात भावाने तिला मदत करावी या भावनेप्रती ही राखी बांधली जाते. भाऊ-बहीण फार महत्त्वाचे असतात”, असं म्हणत त्यांनी एक ऐतिसाहिक कथा सांगितली.

हेही वाचा >> Raksha Bandhan 2024:राखीच्या परंपरेमागची ऐतिहासिक कथा; किती सत्य, किती असत्य?

“राणी कर्णावती अडचणीत होती. तिच्या लहानश्या राज्यावर कोणीतरी हल्ला केला होता. तिला कळत नव्हतं काय करावं. त्यामुळे तिने मुघल साम्राज्याचा राजा हुमायुला एक साधा धागा पाठवला. मी अडचणीत आहे, मला तुमची बहीण समजा आणि येथे येऊन माझं संरक्षण करा. हुमायूला कळत नव्हतं की हे काय आहे. तो इतर देशातील असल्याने त्याला या धाग्याचा अर्थ कळला नाही. त्यामुळे त्याने स्थानिकांना विचारलं. ते म्हणाले की बहीणीने भावाला बोलावल्याची ही सूचना आहे. त्यामुळे राणी कर्णावतीला वाचवणं त्याला त्याचं कर्तव्य वाटलं. तो लागलीच निघाला. दिल्ली सोडून तो तिच्या राज्यात गेला. पण त्याला थोडा उशीर झाला. त्यावेळी विमानं नव्हती. वाहतुकीसाठी घोड्यांचा वापर केला जाई. पण त्याने तिथे गेल्यावर पाहिलं की ती मृत झाली होती”, असं सुधा मूर्ती म्हणाल्या.

“ही राखीची कल्पना म्हणजे अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला मदत करायला येणे आहे. आताही ही परंपरा केवळ उत्तर भारतात नव्हे तर भारताच्या प्रत्येक कोपळ्यात पाळली जाते आणि बहीण आपल्या भावासाठी कितीही अंतर पार करून राखी बांधायला येऊ शकते”, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, त्या या व्हिडिओमुळे ट्रोलही झाल्या आहेत. ही अत्यंंत चुकीची कथा असून या घटनेपासून रक्षाबंधनाला सुरुवात झाली हे मिथक खोटं असल्याचंही म्हटलं जातंय. अनेक नेटिझन्सने या कथेमुळे सुधा मूर्तींवर टीकाही केली आहे.

हेही वाचा >> सुधा मूर्ती राज्यसभेत; राजकारणापल्याडच्या माणसांची राज्यसभेवर कशी होते निवड? काय असतात निकष?

कोण आहेत सुधा मूर्ती?

सुधा मूर्ती इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. तसेच त्या लेखिका म्हणूनही जगभर प्रसिद्ध आहेत. सुधा मुर्ती या महिला आणि लहान मुलांसाठी काम करत आहेत. त्यांची संस्थादेखील यासाठी देशाच्या विविध भागांमध्ये काम करतेय. सुधा मूर्ती यांचे पती नारायण मूर्ती यांनी १९८१ मध्ये इन्फोसिसची स्थापना केली होती. त्यासाठी सुरुवातीच्या काळात सुधा मूर्ती यांनी नारायण मूर्ती यांना १०,००० रुपये उधार दिले होते. सुरुवातीच्या काळात मूर्ती दाम्पत्य एका छोट्याशा घरात भाड्याने राहत होते. त्या काळात त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. आज त्यांची इन्फोसिस ही देशातली दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. त्याचबरोबर जगभरातल्या नावाजलेल्या आयटी कंपन्यांमध्ये इन्फोसिसचं नाव घेतलं जातं. इन्फोसिसमध्ये ३ लाखांहून अधिक कर्मचारी काम करत आहेत. मूर्ती यांच्या मुलाचीही स्वतःची स्वतंत्र कंपनी आहे. त्याचबरोबर त्यांच्या मुलीचा इंग्लंडमध्ये मोठा व्यवसाय आहे. इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक हे मूर्ती यांचे जावई आहेत.

सुधा मूर्ती यांची मार्च महिन्यात राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आली. भारतीय संविधानातील अनुच्छेद ८०(३)नुसार राष्ट्रपतींना साहित्य, विज्ञान, कला व समाजसेवा यांसारख्या विविध क्षेत्रांतील विशेष ज्ञान किंवा अनुभव असणाऱ्या १२ व्यक्तींना राज्यसभेवर नामनिर्देशित करण्याचे अधिकार असतात. सुधा मूर्ती यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, त्या प्रसिद्ध लेखिका व समाजसेविका आहेत. तर, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, सिद्धहस्त लेखिका सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. ‘इन्फोसिस’चे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांना हा पुरस्कार यापूर्वीच प्रदान करण्यात आला असल्याने एकाच कुटुंबातील दोघांना हा पुरस्कार मिळणारे हे पहिलेच दाम्पत्य ठरले आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudha murthy on rakshadhan 2024 shared a story on social media chdc sgk