Sudha Murty Story : साडी हा अनेक महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यात साड्यांचे इतके वेगवेगळे प्रकार आहेत की स्त्रियांना त्या खरेदी करण्याचा मोह आवरता आवरत नाही. लग्न समारंभ असो की वाढदिवस प्रत्येक कार्यक्रमासाठी अनेक भारतीय महिलांना वेगवेगळ्या पॅटर्नच्या नव्या साड्या विकत घ्याव्याशा वाटतात. त्याप्रमाणे अनेक जणी तशा साड्या विकत घेतातही. पण, भारतात अशी एक महिला आहे; जिने अफाट संपत्ती असतानाही ३० वर्षांत स्वत:च्या कमाईची एकही साडी विकत घेतलेली नाही. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटले असेल; पण हे खरे आहे. ही महिला दुसरी-तिसरी कोणी नसून, इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती या आहेत. सुधा मूर्ती या जवळपास ७०० कोटींच्या संपत्तीच्या मालकीण आहेत. त्यांनी ठरवले, तर त्या रोज नवीन साडी नेसू शकतात. पण, खरेदीची आवड असूनही त्या तसे करीत नाहीत. का तर त्या त्यामागे कारणही तितकेच रंजक आहे. चला जाणून घेऊ…
सुधा मूर्ती आपल्या साधेपणामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांच्याबद्दल आणखी एक गोष्ट समोर आली आहे आणि ती जाणून घेतल्यानंतर लोक त्यांचे कौतुक करीत आहेत. डीएनए वेबसाइटवरील माहितीनुसार, सुधा मूर्ती यांनी ३० वर्षांपासून स्वत:साठी एकही साडी खरेदी केलेली नाही. सूधा मूर्ती या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर त्या शिक्षणतज्ज्ञ, लेखिका व समाजसेविकाही आहेत. त्यांच्याकडे आज तब्बल ७७४ कोटी रुपयांची संपत्ती असूनही त्या साधेपणाने जीवन जगतात. त्यामुळे त्या इतर श्रीमंत लोकांप्रमाणे विलासी जीवनासाठी नाही, तर त्यांच्या साधेपणासाठी ओळखल्या जातात.
…म्हणून सुधा मूर्तींनी ३० वर्षांत खरेदी केली नाही एकही साडी
समाजसेविका सुधा मूर्ती (वय ७३) या त्यांची बहीण, जवळचे नातेवाईक आणि स्वयंसेवी संस्थांनी भेट म्हणून दिलेल्या साड्या नेसतात. एकेकाळी सुधा मूर्ती यांना खरेदीची खूप आवड होती आणि त्या वेगवेगळ्या प्रकारचे अनेक कपडे खरेदी करायच्या; पण आता त्या त्यांच्या नो शॉपिंग पॉलिसीमुळे खूप खूश आहेत.
काशीत दिले होते ‘असे’ वचन
सूधा मूर्ती ३० वर्षांपूर्वी एकदा वाराणसीत आल्या होत्या. त्यावेळी काशी या पवित्र ठिकाणी त्यांनी मनापासून प्रिय असलेल्या एखाद्या गोष्टीचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आणि साडीखरेदी ही ती प्रिय गोष्ट होती. तेव्हापासून त्यांनी नवीन साडी खरेदी केलेली नाही. सुधा मूर्ती अन्न, पाणी, औषधे आणि इतर आवश्यक गरजांपुरतीच खरेदी करतात.
सूधा मूर्तींकडे सर्वांत महाग अशा दोन साड्या आहेत; ज्या त्यांना अत्याचारपीडित महिलांच्या एका गटाने दिल्या होत्या. या साड्यांवर हाताने सुंदर भरतकाम केलेले आहे.
सुधा मूर्ती यांच्याप्रमाणे त्यांचे पती व उद्योजक नारायण मूर्ती हेदेखील अतिशय साधी जीवनशैली जगतात. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, नारायण मूर्ती यांची एकूण संपत्ती $4.4 अब्ज (अंदाजे ३६,६९० कोटी रुपये) असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, या दोघांनाही वाचनाची खूप आवड आहे. त्यांच्याकडे सुमारे २० हजार पुस्तकांचा मोठा संग्रह आहे.
व्यवसायात यशस्वी झाल्यानंतरही सुधा मूर्ती यांचे पाय जमिनीवर आहेत. सुधा मूर्ती यांचा जन्म कर्नाटकातील देशस्थ माध्व ब्राह्मण कुटुंबात झाला; जिथे त्यांचे वडील सर्जन आणि आई एक शालेय शिक्षिका होत्या. सुधा मूर्ती यांची मुलगी अक्षता हिचे लग्न ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी झाले आहे.
सुधा मूर्ती यांनी खेळकरपणे नमूद केले की, त्यांनी आपल्या पतीला एक यशस्वी उद्योगपती बनवले. पण, मुलीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आणि आपल्या पतीला पंतप्रधान केले. हा मनोरंजक किस्सा त्यांच्या पतीच्या जीवनात पत्नीची प्रभावशाली भूमिका अधोरेखित करतो.