Vineeta Singh of Rules for Girls in School Bus: शार्क टँक कार्यक्रमामुळे घराघरात परिचित झालेल्या उद्योजिका विनीता सिंह यांनी केलेली इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये त्यांच्या मुलाच्या शाळेतील एका निर्णयावर परखड भाष्य केलं आहे. शाळेच्या मुलांची ने-आण करणाऱ्या बसमध्ये पहिल्या काही सीटवर मुलींना बसण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. शाळेच्या या निर्णयावर विनीता सिंह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, कोलकाता डॉक्टर बलात्कार प्रकरणाचाही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे विनीता सिंह यांच्या पोस्टमध्ये?

विनीता सिंह यांनी त्यांच्या मुलांच्या शाळेकडून करण्यात आलेल्या नव्या नियमावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “या आठवड्यात माझ्या मुलांच्या शाळेत एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. या नियमानुसार मुलींना शाळेच्या बसमधल्या पहिल्या काही सीट्सवर बसण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. बसचालकाशी मुलींचा कमीत कमी संपर्क यावा, हे त्यामागचं कारण. हे पाहून मला पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांसाठी लागू करण्यात आलेल्या नव्या नियमांची आठवण होतेय. महिलांसाठी रात्रपाळीचं काम शक्य तेवढं टाळलं जावं, असं त्यांनी ठरवलं आहे”, असं विनीता सिंह यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“पुढच्या महिन्यापर्यंत देशभरातील इतर शिक्षण संस्थाही जे सगळ्यात सोयीचं आहे, तेच करतील. म्हणजे, मुलींवर अधिकाधिक बंधनं टाकतील. कारण मुलं ही शेवटी मुलंच असतात”, असंही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

मुलींसाठीचे पिंजरे!

दरम्यान, हे नियम म्हणजे मुलींसाठी हळूहळू मोठे पिंजरे बनत चालल्याचा उल्लेख त्यांनी केला. “हळूहळू आपण शार्कवर संशोधन करण्यासाठी त्यांना ठेवण्यात येणाऱ्या मोठ्या पिंजऱ्यांसारखेच मुलींसाठीही असे संरक्षणात्मक पिंजरे उभे करू. कारण पुरुष हे पुरुषच असतात. महिलांना हवा असणारा बदल हा नव्हे”, अशा शब्दांत त्यांनी त्यांची भूमिका पोस्टमध्ये नमूद केली आहे.

“लहान मुलींचे पालक आधीच सगळ्या घडामोडींमुळे भीतीत जगत आहेत. मग आपण मुलींवर संस्थात्मक बंधनं वाढवून त्या दडपणात भर टाकू शकत नाही का? हा प्रत्येक लहान मुलीसाठी संदेशच आहे. त्यांना जर टिकून राहायचं असेल, तर त्यांनी कोणत्याही प्रकारे समानतेच्या वागणुकीची, समान संधीची अपेक्षाच ठेवता कामा नये”, असंही या सविस्तर पोस्टमध्ये विनीता सिंह यांनी लिहिलं आहे.

IIT, IIMमधून घेतले शिक्षण, १ कोटीची नोकरी नाकारून उभारली ३०० कोटींची कंपनी! कोण आहे ही उद्योजिका?

“मुलांच्या पालकांवर जास्त जबाबदारी हवी”

दरम्यान, या पोस्टच्या शेवटी विनीता सिंह यांनी या सगळ्यामध्ये अतिरिक्त जबाबदारी ही मुलींच्या पालकांवर नसून मुलांच्या पालकांवर असायला हवी, अशी अपेक्षा केली आहे. “दोन मुलांची आई म्हणून मला या अतिरिक्त जबाबदारीचं दडपण आमच्यावर असावं असं वाटतंय. आता वेळ आली आहे की आपण आपल्या मुलांना चांगली व्यक्ती म्हणून मोठं करायला हवं, ज्यांना समानता, आदर आणि सहमती याचा खरा अर्थ माहिती असेल. जर बंधनं टाकायचीच असतील तर ती मुलींवर नसून मुलांवर टाकली जायला हवी जेणेकरून ते वाईट वर्तनाची रेषा पार करणार नाहीत. पिंजरे हे शिकाऱ्यांसाठी असतात, सावजांसाठी नव्हे”, अशा शब्दांत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugar cosmetics ceo vineeta singh instagram post on girls not allowed in front seat of school bus pmw