Sunita Williams third time in space : अंतराळविश्वात अजून एका ऐतिहासिक क्षणाची नोंद ५ जून रोजी झाली आहे. पुन्हा एकदा सुनीता विलियम्सने वैश्विक जगात आपले नाव झळकावले आहे. भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्सने अंतराळासाठीच्या सर्वात पहिल्या संपूर्ण क्रू मिशनच्या बोईंग स्टारलाइनरची पहिली महिला पायलट बनून हा इतिहास घडवला आहे. फ्लोरिडामधील केप कॅनाव्हरल स्पेस स्टेशनवरून प्रक्षेपित केले गेलेले आणि सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) सुरक्षितपणे डॉक केलेले हे पहिले ‘ह्यूमन रेटेड स्पेसक्राफ्ट’ आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

५८ वर्षीय सुनीताने ५ जून २०२४ रोजी, बुच विल्मोर या मिशन कमांडरसह कॅप्सूल लाँच केले. या मोहिमेला खूप महत्त्व आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर, स्टारलाईनरला अंतराळवीरांना अंतराळात नेणारे, स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगननंतर दुसरे कमर्शियल अंतराळयान म्हणून घोषित केले जाईल.

हेही वाचा : नववीच्या वर्गात असल्यापासून करत होती स्पर्धा परीक्षांची तयारी! पाहा AIR ३४ पटकावणाऱ्या सान्वीचा प्रवास

सुनीता विलियम्सच्या अवकाशातील प्रवासाबद्दल जाणून घेऊ [SUNITA WILLIAMS SPACE JOURNEY]

१९ सप्टेंबर १९६५ रोजी अमेरिकेत जन्म झाला असला, तरीही वडिलांमुळे सुनीता विलियम्स ही भारतीय वंशाची आहे. वडील गुजरातमधील झुलासनचे असून तिची आई ही स्लोव्हेन वंशाची असल्याचे सुनीताने सांगितले आहे.

सुनीता विलियम्स ही केवळ एक अंतराळवीर नसून, १९८७ साली ती युनायटेड स्टेट्समध्ये नौदल अधिकारी म्हणूनही कार्यरत होती. अनेक उड्डाणं, मोहिमा, परीक्षा आणि प्रशिक्षणानंतर सुनीताची १९९८ साली नासा अंतराळवीर म्हणून निवड झाली. तेव्हापासून सुनीताने तिच्या ‘कॉस्मिक’ प्रवासाला सुरुवात केली.

सुनीतासारख्या कुशल अंतराळवीराने तिच्या गणवेशावरील खिश्यावर ‘सुनी’ असे नाव लिहिले आहे. सुनीता विलियम्स तिच्या सहकाऱ्यांसह जेव्हा यशस्वीरीत्या अंतराळात पोहोचली, तेव्हा तिचा उत्साहाने आणि यशस्वी झाल्याच्या आनंदाने अंतराळयानात नाचत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सुनीता विलियम्स एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

अतिशय अनुभवी अशा सुनीताच्या नावावर दोन शटल मोहिमांसह तब्ब्ल ३२२ दिवस ऑर्बिटमध्ये असल्याची नोंद आहे आणि आत्ताच्या या स्टारलाईनरने तिच्या यशामध्ये महत्त्वपूर्ण अशी भर घातली आहे. इतकेच नाही तर सुनीता विलियम्सच्या नावावर ५० तास ४० मिनिटे असा महिलांमधील सर्वाधिक स्पेसवॉक केल्याचा विक्रमदेखील आहे.

या मोहिमेच्या यशानंतर अंतराळवीर, शास्त्रज्ञ आणि संपूर्ण मानवजातीला पृथ्वीच्या बाहेरील विश्वाकडे पाहण्यासाठी, समजण्यासाठी अधिक सुलभता निर्माण होईल असे दिसते. या यशानंतर, अंतराळ संशोधनाच्या इतिहासात नक्कीच सुनीता विल्यम्सचा एक गौरवशाली वारसा निर्माण होईल.

अंतराळात भारतीय संस्कृती आणि परंपरा घेऊन गेली सुनीता विलियम्स

२०१३ च्या एका मुलाखतीदरम्यान, सुनीता विलियम्सनी सांगितले होते की, अंतराळात प्रवास करताना त्यांना अतिशय मोजक्या वस्तू घेऊन जाण्याची परवानगी असते. तेव्हा अवकाशात झेप घेताना सुनीताने आपल्याबरोबर गणपती बाप्पाची छोटी मूर्ती, भगवद्गीतेची छोटी प्रत आणि भारतीय पदार्थांवर प्रचंड प्रेम असल्याने सोबत सामोसे घेऊन गेली असल्याचे सांगितले होते, अशी माहिती इंडिया डॉट कॉमच्या एका लेखावरून समजते.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunita williams successfully become first woman pilot of flight boeing starliner take a look in her journey to space chdc dha