आपल्या थेट, बेधडक कारवाईसाठी प्रसिध्द असलेल्या सुपरकॉप मीरा बोरवणकर त्यांच्या कामासाठी तर ओळखल्या जातातच. पण सध्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकामधील काही उल्लेखांमुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. सुपरकॉप मीरा बोरवणकर यांची कारकिर्दही बेधडक राहिली आहे. त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘मर्दानी’ हा सिनेमादेखील आला होता.
धडाकेबाज पोलीस अधिकारी म्हणून प्रसिध्द असलेल्या मीरा बोरवणकर यांनी मुंबई अंडरवर्ल्डमध्ये दहशत निर्माण केली होती. मीरा चढ्ढा – बोरवणकर यांना माहेर व सासर अशा दोन्हीकडून देशसेवेचा वारसा लाभला आहे. मूळच्या पंजाबच्या असलेल्या मीरा बोरवणकर यांचे आधीचे नाव मीरा चढ्ढा. त्यांचे वडील ओ.पी. चढ्ढा हे सीमा सुरक्षा दलात (बीएएसफ) अधिकारी होते. मीरा बोरवणकर यांचं शालेय शिक्षण वडिलांचं पोस्टिंग असलेल्या फाजिल्का येथे झाले. त्यानंतरचं महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी जालंधरमधून पूर्ण केलं. त्या कॉलेजमध्ये असताना किरण बेदी या आयपीएस झाल्या होत्या. त्यांच्यामुळेच आपण पोलीस खात्याकडे खेचले गेलो असं मीरा बोरवणकर सांगतात. भारतीय प्रशासकीय सेवेत आणि त्यातही पोलीस सेवेत जायचं त्यांनी मनापासून ठरवलं होतं.
हेही वाचा >> साधी साडी, कपाळावर टिकली; पण ३६ हजार कोटींची मालकीण! जाणून घ्या भारतातील सर्वांत श्रीमंत सेल्फ मेड महिलेचा प्रवास…
मीरा बोरवणकर यांनी आपल्या पोलीसमधील कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा देशभरात केवळ १०-१५ महिला पोलीस अधिकारी पदावर होत्या. १९८१ मध्ये त्या आयपीएस उत्तीर्ण झाल्या. आयपीएस उत्तीर्ण झालेल्या त्या महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला आयपीएस पोलीस आधिकारी ठरल्या. पोलीस अधिकाऱ्यांच्या ट्रेनिंगमध्ये त्या एकमेव महिला होत्या. अत्यंत खडतर ट्रेनिंग सुरू असताना मासिक पाळीच्या नावाखाली त्यांनी सुट्टी घेतली नाही. किंबहुना पुरुष सहकाऱ्यांच्या बरोबरीने त्यांनी आपलं प्रशिक्षण वेळेत पूर्ण केलं. आयपीएस झाल्यानंतर मुंबईत त्यांचं पोस्टिंग झालं . आपल्या कारकिर्दीत त्यांनी मुंबईतल्या अंडरवर्ल्डमध्ये दहशत निर्माण केली. डॉन दाऊद आणि छोटा राजन टोळीतील अनेकजणांना त्यांनी पकडून तुरुंगात धाडलं. दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्यावरही मीरा बोरवणकर यांची करडी नजर होती.
मुंबईतलं माफिया राज संपवण्यात मीरा बोरवणकर यांचं मोठं योगदान मानलं जातं. लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मीरा बोरवणकर यांच्या पोलीस कारकर्दीत ‘जळगाव सेक्स स्कँडल’ हा महत्त्वाचा टप्पा ठरला. १९९४ साली जळगावमध्ये सेक्स स्कँडल चांगलंच गाजलं होतं. शाळा-कॉलेजमधल्या अनेक मुलींना सेक्स रॅकेटमध्ये ओढलं जात असल्याचं समोर आलं होतं. शाळा किंवा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना तिथून उचलून वेश्याव्यवसायात आणलं जात होतं. मीरा बोरवणकर यांनी अत्यंत हुशारीने या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला. सेक्स रॅकेटच्या सूत्रधारांना पकडून तुरुंगात टाकलं आणि अनेक निष्पाप मुलींची आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचवली. मीरा बोरवणकर यांनी फक्त पोलिसीच काम केलं असं नाही तर यातल्या अनेक मुलींना, त्यांच्या घरच्यांना दिलासा दिला. त्यांच्या भविष्यातील सुरक्षेची हमी दिली आणि गुन्हेगारांना शिक्षा देऊन त्यांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ केला. त्यानंतर देशभरात मीरा बोरवणकर यांना सुपरकॉप नावाने ओळखलं जाऊ लागलं.
हेही वाचा >> महिलांनो, पुरुषांच्या तुलनेत तुम्हाला पगार किती? समान वेतन कायदा काय सांगतो माहितेय? वाचा सविस्तर!
त्या महाराष्ट्र राज्याच्या डीजीपी (जेल)- अतिरिक्त पोलीस महासंचलक असताना पाकिस्तानी दहशतवादी याकूब मेमनला फासावर लटकवण्यात आलं होतं. तसंच मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याच्या भारतातील प्रत्यार्पणातही त्यांनी मोठी भूमिका बजावली. २६/११च्या मुंबई हल्ल्यातील मुख्य गुन्हेगार अजमल कसाबला फाशीही त्यांच्याच कार्यकाळात आणि देखरेखीखाली देण्यात आली. कसाबला एका तुरुंगातून दुसरीकडे नेणे, येरवडा जेलमध्ये त्याला फाशी देणे याबद्दल कमालीची गुप्तता बोरवणकर आणि त्यांच्या टीमनं पाळली होती.
अत्यंत कठोर पोलीस अधिकारी असलेल्या मीरा बोरवणकर यांना शिक्षणाची मनापासून आवड आहे. त्यांनी २०१४ साली पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली, २००९ मध्ये Organizational Management मध्ये डॉक्टरेटही मिळवली. त्यांचे पती अभय बोरवणकर हेही आयएएएस आहेत. पण कालांतरानं त्यांनी प्रशासकीय सेवेतील नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला.
हेही वाचा >> स्वतःच्या क्षमता ओळखणं का गरजेचं? १४ लाखांची नोकरी सोडणाऱ्या राशीची यशोगाथा तुम्हालाही प्रेरणा देईल!
२०१७ मध्ये महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक म्हणून निवृत्त झाल्यानंतर मीरा बोरवणकर यांनी ‘माझ्या आयुष्याची पानं ’लिव्ह्ज ऑफ लाईफ’ हे पुस्तक लिहीलं. त्यानंतर त्यांनी लिहीलेल्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकातील काही प्रसंगांवरुन वाद सुरू झाला आहे. खरंतर आपल्या मुलीने पोलीस सेवेत जावं असं मीरा बोरवणकर यांच्या वडिलांना वाटत नव्हतं. पण त्या मात्र आयपीएस होण्यावर ठाम होत्या. जिद्दीने प्रशिक्षण पूर्ण केलं, चिकाटीने, धाडसाने कर्तव्य पूर्ण केली आणि पुरुषी वर्चस्व असलेल्या पोलीस खात्यात त्यांनी कोणतीही विशेष सवलत न घेता काम केलं. आपला वेगळा ठसा उमटवला.