SC cook’s daughter won US scholarships : असं म्हणतात, जर तुम्ही कोणतेही काम खूप मेहनतीने केले तर अशक्य गोष्टसुद्धा शक्य होऊ शकते. अशक्य गोष्टी शक्य करून दाखवण्यात माणसाची खरी कसोटी असते. आज आपण अशाच एका २६ वर्षीय प्रज्ञा सामलविषयी जाणून घेणार आहोत. प्रज्ञाला अमेरिकेतील एक नाही तर दोन नामवंत विद्यापीठांतून शिष्यवृत्ती मिळाली आहे. प्रज्ञाचे वडील हे सर्वोच्च न्यायालयाच्या भोजनालयामध्ये स्वयंपाकी म्हणून काम करतात. प्रज्ञाने आयुष्यातील प्रत्येक लहान मोठ्या संघर्षाला तोंड देत हे यश मिळवले आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि इतर न्यायाधीशांनी प्रज्ञा आणि तिच्या आईवडिलांचा सत्कार केला. प्रज्ञा ही असंख्य मुलींसाठी एक प्रेरणा आहे. आज आपण या प्रज्ञाविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

प्रज्ञा सामल कोण आहे?

मनात जर जिद्द असेल तर तुम्ही यशाला गवसणी घालू शकता, हे सांगणारी २६ वर्षीय प्रज्ञा सामलची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. प्रज्ञाचे वडील अजय कुमार सामल हे सर्वोच्च न्यायालयाच्या भोजनालयामध्ये स्वयंपाकी आहेत, तर प्रज्ञाची आई प्रेमिला ही एक गृहिणी आहे. अजय कुमार १९९६ पासून सर्वोच्च न्यायालयात काम करतात. प्रज्ञाला एक मोठी बहीण आणि एक लहान भाऊ आहे. विशेष म्हणजे ती तिच्या कुटुंबातील पहिली महिला वकील आहे.
२०२१ मध्ये अ‍ॅमिटी विद्यापीठातून लॉची पदवी घेतल्यानंतर सामलने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबरोबर लिपिक म्हणून काम केले, त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये तिने सीपीआर म्हणजे दिवाणी न्यायालयालात (Civil Procedure Rules – CPR) काम करण्यास सुरुवात केली.

प्रज्ञाला सहा विद्यापीठांतून प्रवेशासाठी ऑफर, तर दोन विद्यापीठांकडून शिष्यवृत्ती

प्रज्ञाला कोलंबिया लॉ स्कूल, शिकागो लॉ स्कूल, न्यूयॉर्क विद्यापीठ, युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिलवेनिया कॅरी लॉ स्कूल, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले स्कूल ऑफ लॉ आणि युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन लॉ स्कूल या सहा विद्यापीठांतून एलएलएम करण्यासाठी प्रवेश घेण्यास ऑफर मिळाल्या आहे आणि याशिवाय तिला बर्कले आणि मिशिगन लॉ स्कूल या दोन विद्यापीठांकडून शिष्यवृत्ती मिळाल्या आहेत.

हेही वाचा : Women’s Day 2024 : मासिक पाळीबाबत महिला गूगलवर सर्च करतात हे प्रश्न; डॉक्टरांनी दिली उत्तरे

सरन्यायाधीशांनी केले कौतुक

प्रज्ञाची कामगिरी पाहून भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांनी प्रज्ञाचे कौतुके केले. तिच्या आई वडिलांचा आणि तिचा सत्कार केला. सरन्यायाधीशांनी तिला तीन पुस्तके भेट म्हणून दिली. या पैकी एका पुस्तकावर सरन्यायाधीशांसह इतर न्यायमूर्तींनी प्रज्ञाला पुढील वाटचालीस शुभेच्छा देत सह्या केल्या. या क्षणी प्रज्ञा भारावून गेली. तिच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.

“वडिलांच्या सहकार्यामुळे शक्य..”

प्रज्ञा द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगते, “लॉचे शिक्षण घेताना मी लिपिक म्हणून जेव्हा काम केले तेव्हा मी अनेक बाबी हाताळल्या. यामध्ये सर्व प्रकारच्या प्रकरणांविषयी मला जाणून घेता आले. लिपिक पदानंतर मला वाटले की आपण धोरणात्मक क्षेत्रातही ( policy realm) काम केले तर आपल्याला अधिक चांगला अनुभव मिळेल; त्यामुळे मी पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे ठरवले. मी जेव्हा पदव्युत्तर शिक्षणासाठी अर्ज करत होते त्यावेळी दिवाणी न्यायालयाचे प्रमुख माझे वरिष्ठ, यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांनी हार्वर्डमधून एलएमएम केले होते. त्यांनी मलासुद्धा एलएलएम करण्यास प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी अर्ज केला आणि मला प्रवेश मिळाला.

प्रज्ञा यशाचे श्रेय तिच्या वडिलांना देताना सांगते, “मी खूप मेहनत केली, पण हे सर्व माझ्या वडिलांच्या सहकार्यामुळे शक्य झाले आणि सर्व लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला म्हणूनच इथेपर्यंत पोहचले आहे.”

प्रज्ञा ही असंख्य मुलींसाठी एक प्रेरणा आहे

प्रज्ञा महिलांना या क्षेत्रात येण्यासाठी आवाहन करते. तिला वाटते की, नवोदितांना सहकार्याची आणि आर्थिक मदतीची गरज आहे. ती सांगते, “मला ज्याप्रमाणे सहकार्य मिळाले, तसे सहकार्य प्रत्येकाला मिळावे. मी माझ्या कुटुंबातील पहिली महिला वकील आहे. जर मला माझ्या कुटुंबाकडून सहकार्य मिळाले नसते तर मी इथेपर्यंत पोहचू शकले नसते. ज्या पालकांना वाटते की, महिलांनी या क्षेत्रात येऊ नये, त्यांना मला आवर्जून सांगायला आवडेल की महिलांनी या क्षेत्रात नक्की यायला पाहिजे.”

प्रज्ञा सामल हे फक्त नाव नाही तर हजारो मुलींसाठी एक प्रेरणा आहे. जर तुम्ही एखादी गोष्ट ठरवली तर ती पूर्णत्वास कशी न्यायची, हे कोणीही प्रज्ञाकडून शिकायला हवे. प्रज्ञानी कधीही हार मानली नाही. वाटेला आलेल्या प्रत्येक गोष्टीला ती सामोरे गेली आणि त्यामुळेच ती हे यश मिळवू शकली.

Story img Loader