-स्वप्निल घंगाळे
“अगं तेल गरम आहे का बघ, नाहीतर खराब होईल ते” किंवा “लाडू नीट वळा” हे असले सल्ले ऐकल्यावर तुम्हाला दिवाळीच्या फराळाची तयारी सुरु आहे आणि कोणीतरी कोणाला तरी सल्ले देत आहेत इतकं सहज समजू शकतं. पण सल्ला देणारी व्यक्ती ही महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या नेत्यांपैकी एकाची पत्नी आणि जिला फराळासंदर्भातील सल्ले, सूचना दिल्या जात आहेत ती सून महाराष्ट्रातील माजी उपमुख्यमंत्र्यांची पत्नी असेल तर?
घरोघरी चालणारा हा संवाद आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रतिष्ठित कुटुंब असणाऱ्या पवार कुटुंबामधील. बरं ही घरातील गुपितं सांगितली आहेत याच ‘फराळ मेकिंग गेट टूगेदर’मधील सर्वात महत्त्वाच्या सदस्यांपैकी एक असणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी. काही दिवसांपूर्वी बारामतीमधील एका स्थानिक बैठकीमध्ये सुप्रिया यांच्यासमोरच गावकऱ्यांमध्ये रस्ता रुंदीकरणाच्या विषयावरुन वाद झाला. अगदी धक्काबुक्कीपर्यंत प्रकार गेल्यानंतर समोर मार्गदर्शनासाठी उभ्या असलेल्या सुप्रिया सुळे यांना झाल्याप्रकाराबद्दल काय म्हणावं कळेना… गोंधळ शांत झाल्यानंतर त्यांनी हे गाव आणि आपण सारे म्हणजे एका मोठ्या कुटुंबासारखे आहोत असं सांगताना नव्याने विचार करण्याची आणि प्रत्येकाला त्याच्या पद्धतीने काम करुन देण्याची किंवा एका काळ मर्यादेनंतर कारभार दुसऱ्यांकडे सोपवण्याची गरज आहे असं सूचित करणारं विधान केलं. हे सांगताना त्यांनी पवार कुटुंबात दिवाळीचा फराळ करताना पवार कुटुंबातील जुन्या जाणत्या सुनांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दलही भाष्य केलं.
“आमचं एकत्र कुटुंब आहे. सध्या फराळ करण्याचे दिवस आहेत. माझी आई आहे. आशा काकी आहे. सुमती काकी आहे. आमच्या घरातील सर्व महिला म्हणजे सूना एकत्र फराळ करायला बसतात. सुनेत्रा वहिनींच्या लग्नाला ३५ वर्ष झाली. पण चकली करायला बसलं ना तर माझी आई किंवा आशा काकी म्हणणार, “ए सुनेत्रा ते बघ तेल गरम आहे का नाहीतर खराब होईल.” “अगं हो, झाली त्यांच्या लग्नाला ३५ वर्ष. करतील ना सुनेत्रा वहिनी चकली. थोडा तर विश्वास ठेवा आमच्या वहिनींवर,” असं सुप्रिया म्हणाल्या आणि सारेच उपस्थित हसू लागले. पुढे सुप्रिया यांनी, “तरी या सासवा चिवचिव करत राहणार तिथे. दिसत नाही तरी कॅटरॅक वगैरे घालून माझी आई, सुमती काकी, आशा काकी सांगत असतात ए ते लाडू नीट वळा… लाडू ३० वर्ष वळतोय ओ,” असं म्हणत एकत्र काम करण्याची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.
खरं तर दिवाळी आणि फराळ या गोष्टी म्हणजे करण-अर्जुनची जोडी आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. तसं आजच्या जमान्यामध्ये फराळाचे पदार्थ १२ महिने उपलब्ध असतात पण त्याला दिवाळीची जोड मिळाली की विचारता सोय नाही असा योग जुळून येतो. हल्ली तयार म्हणजे ज्याला रेडीमेड फराळ म्हणतात तो मागवण्याचा ट्रेण्ड फार वाढला आहे. असं असलं तरी आवर्जून फराळाचे सर्व पदार्थ करणारीही अनेक कुटुंब आणि गृहिणी आहेत. त्यातही खास करुन एकत्र कुटुंब पद्धती असली की आवर्जून एकत्र फराळ केला जातो. हा फराळ करणं आणि त्यामध्ये एकमेकींवर आपआपल्या पद्धती लादणं हे सासू सुनांसाठी काही नवीन नाही. पण हा प्रकार सर्वसामान्यांप्रमाणेच राजकारणी असो किंवा सेलिब्रिटी असो त्यांच्या घरातही होत असतो. सुप्रिया सुळेंनी सांगितलेल्या या किश्श्यावरून तरी तसेच दिसून येते.
त्यामुळे यंदा फराळ करताना कोणी काही सल्ला दिला तर राग मानून घेण्याचं कारण नाही. कारण ३५ वर्षानंतरही उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीला चकली आणि लाडूंवरुन ‘एक्सपर्ट ओपिनियन’ म्हणून सासूबाईंचा सल्ला मिळू शकतो आणि तो त्या फराळा इतक्याच आवडीने स्वीकारत असतील तर आपण ‘किस झाड की पत्ती’ आहोत नाही का?
आणि हो बाय द वेहॅव अ हॅपी फराळ मेकींग!
संपर्क – lokwomen.online@gmail.com