‘‘माझी पोरगी मला लई फाड फाड बोलते, मला तोंडच उघडू देत नाही. तुम्हाला सांगते ताई, सासरच्या लोकांनी तिच्या मनात माझ्याविषयी विष कालवलं. तिच्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही, तिला जसं सांगितलं तसंच ती वागणार ना! ती बोलत नाही, पण बरक्यांनी तरी माझ्याशी बोलावं…’’ आपली कर्म कहाणी सांगताना डोळ्यांना पदर लावून सुरेखाताई ढसाढसा रडू लागतात… त्यांची कहाणी ऐकताना काय एककेकाचे नशिबाचे फेरे असतात असंच वाटतं.

सुरेखा घोरपडे दोन मुली व एका मुलाची आई… काही वर्षांपूर्वी एका कामानिमित्त त्या माहेरी गेल्या होत्या. नेमकं त्याच वेळी त्यांच्या नवऱ्यानं आत्महत्या केली. मग सासरच्यांनी त्याच्या आत्महत्येला सुरेखाताईंनाच जबाबदार धरलं. त्यांना तुझ्यामुळे आमचा मुलगा गेला ही टोचणी देत राहिल्या. या रोजच्या मानसिक त्रासाला त्या कंटाळल्या. मग एक दिवस मुलांना सोबत न देताच त्यांना बाहेर काढलं. सासरच्यांनी त्यांना आपल्या नातेवाईक, नातेसंबंधातून कायमचं बहिष्कृत केलं. नवऱ्या गेल्यानंतर त्यांनी सासरच्या माणसांसोबत जुळवून घेण्याचा अटोकाट प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आलं नाही. उलट त्यांच्यासाठी घराची दारे कायमची बंद झाली. अन्य नातेवाईक आणि मुले यांनी सुरेखाताई यांच्यासोबत बोलणं सोडले ते आजतागायात. माहेरी कोणावर आपला भार येऊ नये याकरता त्यांनी सफाई कर्मचारी म्हणून काम सुरू केलं. दरम्यान, सुरेखाताई यांच्या मोठ्या मुलीचं लग्न ठरल्याचं त्यांना कळलं. मार्चमध्ये लग्न आहे. मुलीच्या लगीन घाईचा आपणही सहभागी व्हावं. डोळ्यात साठवलेली आपली फ्रॉकमधील बाहुली आता बोहल्यावर चढणार… हिरवा चुडा भरलेली, दागिन्यांनी सजलेली, शालु नेसलेली आपली मुलगी पाहावी… तिला सासरी निरोप देताना काही कानगोष्टी सांगाव्यात या माफक अपेक्षेने सुरेखाताईंनी पुन्हा एकदा सासरच्या बंद असलेल्या दरवाजावर थाप दिली. परंतु याहीवेळी प्रतिसाद शून्य. मात्र मधल्या तीन वर्षांच्या काळात त्यांनी सुरू केलेले काम. सामाजिक कार्यकर्त्यांसोबत सुरू असलेला संवाद यातून त्यांना लढण्याचं बळ मिळालं. आपल्या मुलीच्या लग्नात सहभागी करून घ्यावं यासाठी त्या लढल्या. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी कृष्णा चांदगुडे यांच्याशी त्यांना मुलांशी भेटताना येणाऱ्या अडचणी, सासरच्यांची मानसिकता या विषयी सांगितलं. चांदगुडे यांनी या काळात नाशिक दौऱ्यावर असलेल्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या निलम गोऱ्हे यांची भेट घेतली. घोरपडे यांनी या विषयी त्यांना आपली आपबिती सांगितली.

हा विषय योग्य व्यक्तीपर्यंत पोहचला असे आदेश त्यांनी दिले. आपले काम होणार ही भाबडी आशा सुरेखाताईंनी बाळगली. निलमताईंनी सुरेखा ताईंचे सासर ज्या ठिकाणी आहे त्या दिंडोरी पोलिसांना या विषयी विचारणा केली आणि लक्ष घालायला सांगितलं. पोलीस दारात आल्यावर बिथरलेल्या सासरच्या मंडळींनी सुरेखाताईंच्या मुलीचं मनपरिवर्तन केलं. पोलिसांनी सासरच्या लोकांना समज देत सुरेखाताईंना लग्नाला उपस्थित राहू द्या असा सल्ला दिला. परंतु ऐनवेळी त्यांच्या मुलीनं आक्रमक पवित्रा घेत ‘‘आई तू लग्नाला कुठल्याही परिस्थितीत मला नको. तू लग्नात आली तर मी मांडवातच आत्महत्या करेन आणि माझ्या आत्महत्येच्या चिठ्ठीत सर्वांचं नाव लिहीन अशी धमकी वजा इशारा दिला. पोलिसांनी या सगळ्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सुरेखाताई यांना लग्नाला जाऊ नका असा सल्ला दिला. शेवटची आशाही मावळल्याने सुरेखाताई परिस्थितीला शरण आल्या आहेत.
‘‘पोरीचं लग्न पाहायचं होतं वो ताई, पण आता तीच नाही म्हणते तर काय करू? पण तिची पाठची भावंडं आहेत. त्यांनी तरी सोबत राहावे. मला काही दुखल खुपलं तर आपलं कोणी जवळ राहावं एवढचं वाटतं.. येतील ना ती माझ्या जवळ?‘‘ हा सुरेखाताईंचा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे…

Story img Loader