Asian Games 2023 : आशियाई खेळ २०२३च्या सातव्या दिवशी महिलांच्या टेबल टेनिस दुहेरी स्पर्धेतही भारताची चमकदार कामगिरी दिसून आली. एकाच गावातून आलेल्या समान आडनाव असणाऱ्या मैत्रिणींनी भारताला कांस्यपदक मिळवून दिले. या दोन्ही मैत्रिणी समान आडनाव आणि गाव असल्यामुळे अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या आहेत. जाणून घेऊया या मैत्रिणींविषयी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


आशियाई खेळ २०२३च्या सातव्या दिवशी महिलांच्या टेबल टेनिस दुहेरी स्पर्धेतही भारताची चमकदार कामगिरी दिसून आली. भारताच्या सुतीर्थ आणि अहिका मुखर्जी या जोडीने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चिनी जोडीचा पराभव करून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. यानंतर सोमवारी भारताच्या टेबल टेनिसपटू सुतीर्था मुखर्जी आणि अहिका मुखर्जी यांनी महिला टेबल टेनिस दुहेरीत भारताला कांस्यपदक जिंकून दिले. भारतानं पहिल्यांदाच महिला टेबल टेनिस दुहेरीत पदक जिंकलं आहे. मात्र, उपांत्य फेरीत भारतीय जोडीला पराभवाचा सामना करावा लागला. परंतु, या ‘मुखर्जी मैत्रिणी’ सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय ठरल्या.

हेही वाचा : महिलांना कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते का ? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात…

सोमवारी सुतीर्थ आणि अहिका मुखर्जी यांनी भारताला प्रथमच महिला टेबल टेनिस दुहेरीमध्ये पदक मिळवून दिले. या दोघींचे आडनाव समान आहे, त्यांचे गाव समान आहे, त्या ज्या अकादमीमध्ये शिकल्या तीही समान आहे. कोलकात्यापासून जवळ असणाऱ्या नैहटी गावातील या मुखर्जी मैत्रिणी. आधी त्यांच्या गावी त्या एकत्र शिकायला होत्याच, तसेच पुढेही त्याधानुका धुनसेरी सौम्यदीप पौलोमी टेबल टेनिस अकादमीमध्ये पुन्हा एकत्र आल्या. एकत्र शिक्षण घेतले असल्यामुळे त्या उत्तम मैत्रिणी होत्याच पण उत्तम सहकारीसुद्धा ठरल्या. या दोन मैत्रिणींमुळे भारताला कांस्यपदक मिळाले.
दुहेरी टेबल टेनिस या खेळामध्ये संयोजन उत्तम होणे आवश्यक असते. दोघांनाही समन्वय साधता आला पाहिजे. अहिका आणि सुतीर्थ यांनी एकत्र सराव केला. त्यामुळे त्यांना खेळ नियंत्रित करणे, पॉईंट सेट करणे, खेळी खेळणे शक्य झाले.अहिका आणि सुतीर्थ यांनी प्रतिस्पर्ध्यांना गोंधळात टाकण्यासाठी त्यांची खेळीच बदलली. सुतीर्थने ‘वेटिंग गेम’ खेळली, अहिका आक्रमक खेळी केली. याआधीही जूनमध्ये ट्युनिशियामध्ये जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत त्यांनी चांगली कामगिरी केली आहे.


आज हे मिळवायला मुखर्जी मैत्रिणींनी अनेक कष्ट घेतले आहेत. पात्रता फेरीमधील संघर्ष, प्रशिक्षकांची नेमणूक-बदली यामुळे सरावामध्ये येणारा व्यत्यय, जकार्ता येथील गेम्सपासून अहिकाला होणारा पाठीचा त्रास, यामुळे येणारे अपयश, एकेरी-दुहेरी मधील खेळींच्या रचना अशा अनेक समस्यांवर मुखर्जी मैत्रिनींनी मात केली आहे. सोमवारच्या त्यांच्या या यशानंतर त्यांनी त्यांच्या प्रशिक्षकांना फोन केला. त्याक्षणी त्यांना हा आनंद शब्दात मांडताही आला नाही. भारताला प्रथम पदक मिळवून देण्याचा आनंद त्यांच्यासाठी वर्णनातीत होत्या. त्यांचे प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांनी ‘माझ्या या दोन विद्यार्थिनी म्हणजेच एक संघ आहे, आमच्या विद्यार्थिनींना यश मिळणे हा आमच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण आहे,’ असे म्हटले.
लहान गावातून येणे, सामाजिक परिस्थितीशी लढणे आणि आपले अस्तित्व सिद्ध करणे हे सोपे नाही. मुखर्जी मैत्रिणींनी ते सिद्ध करून दाखवले आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sutirtha and ayhika the mukherjees from naihati who tamed the chinese at their game in their den vvk