Mahila Dahihandi Pathak spread awareness about Women’s Safety: पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात काही वर्षांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढतच आहे. धक्कादायक म्हणजे नराधमांनी कोवळ्या, अजाण जीवांनाही सोडले नाही. शाळेत त्या चिमुकल्या ज्याला दादा, दादा म्हणत होत्या, त्याच नराधमाने त्यांना ओरबाडले. बदलापूर घटनेमुळे राज्य हादरले. आंदोलने झाली, सरकारकडून कारवाईचे आश्वासन देण्यात आले. पण राज्यात महिला आणि चिमुकल्यांच्या शरीरांशी कुस्करण्याचा खेळ करण्याची ही पहिलीच गोष्ट नाही. याआधीही अशा प्रकारची हीन कृत्ये घडली आहेत. मग यामध्ये नुकतेच घडलेले बदलापूरमधले प्रकरण असेल किंवा कोलकातामधील; एकंदरीत महिला कुठेच सुरक्षित नाही. रोज नवनवीन अत्याचाराच्या घटना घडत आहेत. गोरेगावमधील स्वस्तिक महिला दहीहंडी पथक यंदा अशाच घटनांचा निषेध करीत महिला अत्याचारांच्या निषेधाची हंडी फोडणार आहे. दहीहंडी उत्सव अवघ्या दोनच दिवसांवर आलेला असताना या स्वस्तिक महिला दहिहंडी पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
बदलापूर, कोलकाता अत्याचाराचा निषेध
गोविंदा’ म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात उंच उंच दहीहंडीचे थर. आणि त्या उंचच उंच थरांवर चढून हंडी फोडणारा गोविंदा. एकेकाळी गोविंदा पथके म्हटली की पुरुषांची मक्तेदारी असयाची. मात्र आता पुरुषांप्रमाणेच महिला गोविंदा पथके देखील उंचच उंच थर लावतात. असेच मंबईतलं गोरेगावमधील स्वस्तिक महिला पथक गेले अनेक वर्ष दहिहंडीमध्ये सहभागी होत आहे. दरवर्षी दहीहंडी उत्सवात हे पथक समाजात जनजागृती करत असतं. यावर्षीही महिलांवरील अत्याचाराच्याविरोधात महिलांवरचे अत्याचार थांबलेच पाहिजे, बदलापूर, कोलकाता अत्याचाराचा निषेध म्हणत या रणरागिणी सज्ज झाल्या आहेत.
महिला अत्याचाराचा निषेध
अशी झाली महिला गोविंदा पथकाची सुरुवात
स्वस्तिक महिला पथकाच्या संचालिका आरती बारी यांनी पुढाकार घेत, या पथकाची मुहूर्तमेढ रोवली आणि अनेक वर्षांपासून त्या या पथकाचा कार्यभार सांभाळत आहेत. सुरुवातीला गोविंदा म्हटले की, पुरुषांची पथके, असेच समजले जायचे. आपल्या देशात स्त्री-पुरुष समानता आहे. मग महिलांनीही दहीहंडी का फोडू नये?, असा विचार मनात आला आणि महिला गोविंदा पथकाला सुरुवात केली, असे स्वस्तिक महिला पथकाच्या संचालिका व आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच आरती बारी यांनी सांगितले. गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला, त्याप्रमाणे स्पर्धाही झाल्या; मात्र त्यामध्ये महिलांचा सहभाग नव्हता. गोविंदामधील महिला गोविंदाच्या सहभागाविषयी सांगताना आरती बारी सांगतात, “महिला गोविंदाच्या सहभागाविषयी प्रयत्न सुरू असून, पुढच्या वर्षी नक्कीच प्रो गोविंदा स्पर्धांमध्ये महिलांचा सहभाग असेल.”
हेही वाचा >> Kolkata Rape : “मुलींनो भारतात येऊ नका, कारण..” कोलकाता बलात्कार प्रकरणानंतर महिला इन्फ्लुएन्सरची पोस्ट
भारताबाहेरही नावलौकिक
गोविंदा पथकांतील मुलींसाठी दहीहंडी हा एक खेळच नाही, तर व्यक्त आणि मुक्त होण्याचे माध्यमही आहे. विशेष म्हणजे गोरेगावमधील या स्वस्तिक महिला गोविंदा पथकाने फक्त मुंबईतच नाही, तर आता भारताबाहेरदेखील जाऊन नावलौकिक मिळवला आहे. या गोविंदा पथकामध्ये बहुतेक मुली आणि महिला गोविंदा या नोकरी करणाऱ्या, तसेच सर्वसामान्य घरातील आहेत. त्यामुळे त्यांना बाहेर जाता येत नाही. तसेच यातील काहींना ते परवडतही नाही. त्यामुळे या निमित्तानं या पथकातील मुलींना बाहेरचं जग पाहता येतं आणि आपली दहीहंडी इतर राज्यांत पोहोचतं, अशी प्रतिक्रिया यावेळी महिलांनी दिली
मराठमोळ्या आरती बारींची यशस्वी कामगिरी
स्वस्तिक महिला पथकाच्या संचालिका व आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच आरती बारी आपल्या समाजाच्या चौकटी मोडून स्वतःची स्वप्ने साध्य केली आहेत. त्यांनी एशियन गेम्स, खेलो इंडिया, प्रो कबड्डी व आता प्रो गोविंदा यांसारख्या स्पर्धांसाठी पंच म्हणून कार्यभार सांभाळला आहे. त्यांचा हा प्रवास इतर मुलींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.