शुभ्र दुधावर स्निग्ध साय एकवटायला लागली की मऊशार लोण्याचा देखणा गोळा आकार घ्यायला लागतो… याच लोण्याच्या गोळ्याला काजळ भरलेले दोन टपोरे डोळे…त्यावर चकाकणाऱ्या दोन लांब पापण्या… गोबरे-गोबरे गाल… शिरपेच भासणारी, चापून-चुपून रिबिनीने बांधलेली उभी पोनिटेल व अंगभर लाल ठिपके मिरवणारा श्वेत फ्रॉक घातला की लोण्याच्या गोळ्यात जे चित्र उभे राहील ते हमखास अटरली-बटरली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘अमूल गर्ल’चे असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘अमूल्य’ या संस्कृत शब्दापासून ‘अमूल’ हा शब्द प्रसवला, हा योगायोगच असेल कदाचित. तसे नसते तर उत्पादनाचे मूल्य घेऊनही ‘अमूल गर्ल’ ‘अमूल्य’ थोडीच ठरली असती. ही अटरली बटरली जाहिरातीच्या भल्या मोठ्या फलकातून उतरून घराघरात कशी पोहोचलेली त्याची कथाही मोठीच रंजक आहे. वर्ष होते १९६६चे. दाकुन्हा यांना अमुलच्या जाहिरातीचे कंत्राट मिळाले. मुद्रित माध्यम वा दूरदर्शन ही त्याकाळी महागडी बाब. म्हणून दाकुन्हा यांनी या अटरली-बटरलीला पहिल्यांदा जगासमोर आणले ते जाहिरात फलकावर स्वार करून. ही पहिलीच जाहिरात डोळ्यांना सुखावून मनात उतरणारी. एक चुणचुणीत चिमुकली आपल्या गुढघ्यावर पूजेला बसली आहे… तिचा एक डोळा झाकलेला, पण दुसरा मात्र खिळलाय तो अमूल बटरच्या डब्यावर. खाली शब्द कोरलेले…

“Give us this day our daily
Bread with Amul butter”

प्रार्थनेतही लोणीवर डोळा ठेवणारी ही खट्याळ अटरली-बटरली लोकांना इतकी भावली की जणू तिच्यासाठीच अमूलची उत्पादनं हातोहात खपू लागली. आपली मुलगी ही जाहिरातीतील अमूल गर्ल सारखी दिसावी म्हणून त्याकाळी लाल ठिपक्यांच्या फ्रॉक व तशीच रिबीन अनेक पालक खरेदी करायचे. अनेक घरात वाढदिवसाचा केक कापणारी छकुली ‘अमूल गर्ल’च्याच वेशभूषेत असायची.

दाकुन्हाच्या या अटरली-बटरलीने अर्थचक्राला ही अशी अप्रत्यक्ष गती दिली होती. ही क्लुप्ती कामी येतेय, असे लक्षात येताच दाकुन्हा यांनी रोजच्या जगण्यातील संवेदनशील विषयांना ‘अमूल गर्ल’शी अतिशय मार्मिकतेने जोडले आणि निर्भयता शब्दांची मोताद नसते हे खूपच प्रभावीपणे दाखवून दिले. १९६० साली झालेला कोलकात्यातील संप असो किंवा जगन मोहन दालमिया, सुरेश कलमाडी, सुब्रतोब रॉय यांना लक्ष्य करून मुद्दाम बनवलेल्या जाहिराती. प्रत्येक बापाच्या मनात अलवार रुंजी घालणारी हीच जाहिरातीतील अटरली-बटरली तितक्याच ताठरपणे अयोग्य गोष्टीवर तुटून पडताना दिसली. कॉपी रायटर मनीष तिवारी व चित्रकार जयंत राणे यांच्या सहकार्याने जाहिरातीचा नवा अध्याय घडवणारी ही अटरली-बटरली आज मात्र चिंब पापण्यांनी शून्यात हरवलेली भासतेय… कारण, ‘अमूल गर्ल’च्या रुपात तिला अजरामर करून तिचे लाडके बाबा सिल्व्हेस्टर दाकुन्हा मात्र अनंताच्या प्रवासाला निघून गेलेत…!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sylvester dacunha who brought amul girl add to the public passes away ssb