वैशाली मोरे
अफगाणिस्तानात ऑगस्ट २०२१ पासून तालिबानची सत्ता आहे. आधुनिक जगात काही देशांमध्ये ज्या क्रूर, रानटी राजवटी आहेत त्यामध्ये तालिबानचा क्रमांक अगदी वरचा. धर्माचा सोयीस्कर अर्थ लावत स्त्रियांचा कमालीचा द्वेष हे या संघटनेचं मुख्य लक्षण आहे. अगदी अलीकडचीच घटना पाहू. गेल्या महिन्याच्या अखेरीस अफगाणिस्तानात ब्युटी पार्लरवर बंदी घालण्याचा फतवा काढण्यात आला. अफगाणिस्तानातील सर्व ब्युटी पार्लर बंद करण्यासाठी एका महिन्याचा अवधी देण्यात आला आहे. ती मुदत आता संपते आहे. महिलांनी पार्लरमध्ये का जायचं नाही याची देण्यात आलेली कारणं एकाच वेळी संतापजनक आणि हास्यास्पद आहेत.
महिला ब्युटी पार्लरमध्ये मेकअप आणि सौंदर्यवर्धनासाठी पैसे खर्च करतात, त्यामुळे गरीब कुटुंबांवर आर्थिक ताण येतो (जणू काही गरीब महिला घरात अन्नाचा कण नसला तरी आधी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन सुंदर दिसण्यावर पैसे खर्च करतात), मेकअप करण्यात वेळ गेल्यामुळे महिलांना धार्मिक कर्मकांडांसाठी वेळ उरत नाही (महिला दिवसाचे २४ तास फक्त मेकअपच करतात?), मेकअप केलेली महिला धार्मिक कार्यांपूर्वी योग्य प्रकारे म्हणजेच विधिवत स्नान करत नाहीत (म्हणजे मेकअप खराब होईल म्हणून नमाजपठणापूर्वी चेहरा धूत नाहीत)… अशी एक से बढकर एक कारणं दिलेली आहेत. इतकंच नाही तर केस रंगवणं, खोट्या पापण्या लावणं या कृती इस्लामविरोधात आहेत असा शोधही लावला. या गोष्टी इस्लामविरोधात आहेत हे कशावरून ठरवलं ते स्पष्ट करावंसं त्यांना वाटत नाही. खरं तर धर्माच्या नावानं सत्ता राबवणाऱ्या कोणीही कधीही कशाचीही जबाबदारी घेत नसतात हे एक निरीक्षण.
थोडक्यात, ब्युटी पार्लर बंद करण्यासाठी दिलेली कारणं केवळ बहाणे आहेत हे लक्षात येतं. महिलांना सातत्यानं गुलामगिरीत ठेवणं मुख्य धोरण आहे. त्यामुळेच दोन वर्षांपूर्वी अफगाणिस्तानची सत्ता पुन्हा हातात आल्यानंतर तालिबाननं लगेचच मुलींच्या सहावीनंतरच्या शिक्षणावर बंदी घातली. त्याशिवाय बहुसंख्य सार्वजनिक ठिकाणी जाण्यास त्यांना बंदी घालण्यात आली, विशिष्ट अंतरापेक्षा जास्त प्रवास करायचा असेल तर घरातील किंवा नातेवाईक पुरुषाची सोबत अनिवार्य करण्यात आली. लिहिणं, वाहन चालवणं, मैदानी खेळ खेळणं यांवरही बंदी आहे. ही यादी खूप मोठी आहे. थोडक्यात सांगायचं तर, नातेवाईकांना भेटण्यासाठी, वैद्यकीय कामासाठी किंवा जवळपास खरेदीसाठी अशा अत्यावश्यक कामाशिवाय स्त्रियांनी घराबाहेर पडू नये याची पूर्ण तजवीज करण्यात आली आहे.
ब्युटी पार्लर बंद करण्याच्या आदेशाचे सामाजिक आणि आर्थिक असे दोन्ही परिणाम होणार आहेत. संपूर्ण अफगाणिस्तानात जवळपास १२ हजार ब्युटी पार्लर असून, त्यामधून सुमारे ६० हजार महिलांना रोजगार मिळतो. यापैकी कित्येक महिला तर त्यांच्या घरातील एकमेव कमावती व्यक्ती आहेत. नेहमीचा ताण विसरण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये काम करणं हा त्यांच्यासाठी चांगला पर्याय होता. थोडेफार पैसे मिळणं आणि त्याच वेळी सामाजिक तणावातून सुटका होणं हे दोन्ही हेतू साध्य होत होते. आता बेरोजगार होणाऱ्या या महिलांच्या रोजगारासाठी काही उपाययोजना केल्या आहेत का, याबद्दल कोणतीच घोषणा झालेली नाही.
दुसरा मुद्दा सामाजिक आहे. अफगाणिस्तानात महिलांना मनोरंजनाच्या ठिकाणी जायला बंदी आहे. घराच्या चार भिंतीबाहेर पडून थोडी मौजमजा करावी म्हटलं तर तशा जागाच शिल्लक नाहीत. अशा वेळी कित्येक महिलांना स्वतःचं मन रमवण्यासाठी ब्युटी पार्लर ही एकमेव जागा होती. तीही बंद केल्यामुळे आता आम्ही जायचं कुठं? असा या स्त्रियांचा सवाल आहे. यातूनच एक विशेष गोष्ट घडली. काही दिवसांपूर्वी काबूलमध्ये महिलांनी एकत्र येऊन या आदेशाचा निषेध केला. घोषणा दिल्या. मात्र, हवेत गोळीबार करून सुरक्षा सैनिकांनी त्यांना पांगवलं. संयुक्त राष्ट्रांनी एक ट्विट करून अफगाण महिलांना समर्थन दिलं. पण अफगाणिस्तानच्या स्वायत्तता आणि सुरक्षेसाठी संयुक्त राष्ट्रांचा फारसा उपयोग झाला नाही, तिथे अशा निषेधाचा कितीसा उपयोग होणार आहे?
अफगाणिस्तानातील तालिबान आणि त्यांच्या आदेशांचं तिथल्या स्त्रियांवर होणारे परिणाम हा विषय आपल्यासाठी महत्त्वाचा का आहे? कारण आपल्यापैकी अनेकांना आजही हुकुमशाहीचं सुप्त आकर्षण आहे. का कोण जाणे, पण हुकुमशाहीच्या समर्थकांचा असा एक गैरसमज असतो की, हुकुमशाहीचे फटके आपल्याला बसणार नाहीत. वास्तवात, हुकुमशाहीला तथाकथित धार्मिकपणाची जोड दिल्यावर तयार होणारं रसायन किती घातक असतं हे अफगाणिस्तानकडे पाहून वारंवार लक्षात येतं. त्यामुळे हा धडाही वारंवार गिरवणं आवश्यक आहे.