डॉ. शारदा महांडुळे

ज्या पदार्थाचे नाव काढताच तोंडाला पाणी सुटते, तो म्हणजे चिंच होय. आंबट, गोड व तुरट चवीची चिंच स्वयंपाकघरात जशी महत्त्वाची आहे, तशीच आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही तिचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठीत ‘चिंच’, हिंदीमध्ये ‘इमली’, इंग्रजीमध्ये ‘टॅमॅरिंड’, तर शास्त्रीय भाषेत ‘टॅमॅरिंडस इंडिका’ (Tamarindus Indica) या नावाने चिंच ओळखली जाते. ती ‘सिजाल पिनेसी’ या कुळातील आहे.

anger
जेव्हा आपल्याला खूप राग येतो तेव्हा शरीरावर कसा परिणाम होतात? तज्ज्ञांनी केला खुलासा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
anger affect, mental health
Health Special: रागामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडते का?
Coriander Juice benefits
Coriander Juice: रिकाम्या पोटी कोथिंबिरीचा रस प्यायल्यानं शरीरावर काय परिणाम होतो? वाचून व्हाल अवाक…
Is surgery necessary for the problem of uterovaginal prolapse
स्त्री आरोग्य : ‘अंग’ बाहेर येणं समस्येसाठी शस्त्रक्रिया करावीच लागते का?
milk with salt being harmful for health is this true
Milk With Salt : दुधात चिमूटभर मीठ टाकून प्यायल्यास चेहऱ्याला खाज सुटते का? हा दावा खरा की खोटा? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
wet sock method t For fever in children and adults
Fever : ताप आलाय? मग ‘हा’ घरगुती उपाय ठरेल जादुई; रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास होईल मदत
What Happens If You Drink Coconut Water, Lemon Water, Ginger Shot Every Day
नारळ पाणी, लिंबू पाणी, आले गोळीचे रोज सेवन केल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या

चिंचेचे झाड हे कोठल्याही शेताच्या बांधावर, एखाद्या गावाच्या सीमेवर पाहावयास मिळते. चिंचेचे झाड दीर्घायुषी असून, साधारणतः चारशे ते पाचशे वर्षे टिकते. हा विशाल वृक्ष हिरवागार, डेरेदार असतो. साधारणत: चिंचेचे झाड साठ ते ऐंशी फूट उंच असते. या झाडाला लहान-लहान अनेक फांद्या फुटलेल्या असतात. याची पाने आकाराने लहान व संयुक्त असतात ही पाने लहान लहान कांड्यावर फुटलेली असतात. पाने कुस्करल्यास किंवा चावल्यास आंबट चव लागते. झाडाला पाने व फुले एकाच वेळेस येतात. याची फुलेसुद्धा चवीने आंबट, गोड व तुरट लागतात. चिंचेच्या चोथ्यापासून पेक्टीन प्राप्त होते, तर त्याच्या सालीतून व टरफलातून टॅनिन तयार होते.

भारतामध्ये अति प्राचीन काळापासून चिंचेचा उपयोग आहाराबरोबरच औषध म्हणून केला जातो. हिंदुस्थानी खजूर म्हणूनही चिंच ओळखली जाते. चिंचेचे पान, खोड, फळे, बिया, फांद्या, फुले सर्वच उपयोगात आणता येतात.

औषधी गुणधर्म :

आयुर्वेदानुसार : कच्ची चिंच आंबट, गुरू, वायुहारक, पित्त, कफ आणि रक्त विकारकारक असते. तर पिकलेली चिंच अग्निप्रदीपक, रूक्ष, मलसारक, उष्ण तसेच कफ व वायुनाशक आहे. सुकलेली चिंच हृदयास हितकारक असते. ती श्रम, भ्रम, तृष्णा व ग्लानी दूर करणारी असून पित्तशामक असते.

आधुनिक शास्त्रानुसार : चिंचेमध्ये उष्मांक, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, मेद, ‘क’, ‘अ’, ‘ई’ जीवनसत्त्वे, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, आयर्न, झिंक, फॉस्फरस ही सर्व पौष्टिक घटकद्रव्ये असतात.

उपयोग :

१) जुलाब होत असतील, तर चिंचेची कोवळी पाने तांदळाच्या धुवणामध्ये वाटून त्यात वाळायुक्त पाणी व खडीसाखर टाकून सरबत करावे. या सरबताने जुलाब थांबतात.

२) चिंचोके भाजून त्यावरील टरफले काढून आतील पांढऱ्या गराचे पीठ करावे. हे पीठ एक चमचा घेऊन त्यामध्ये मध घालून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण थोड्या थोड्या अंतराने चाटावे. यामुळे खोकला नाहीसा होतो.

३) मलावरोधाचा त्रास होत असेल, तर चिंच पाण्यात कुस्करून त्यात थोडे सैंधव व साखर घालून त्याचे सरबत बनवावे. हे सरबत दिवसभरात दर तीन तासांच्या अंतराने एक-एक कप प्यावे. यामुळे आतड्यांची हालचाल वाढून पोटातील मल पुढे ढकलण्यास मदत होते व शौचास साफ होते.

४) पिकलेल्या चिंचेचा उपयोग आमटी, भाजीत करावा. याच्या आंबट-गोड चवीमुळे आमटी, भाजी स्वादिष्ट व रुचकर बनते.

५) उष्माघाताचा त्रास होत असेल, तर चिंचेचे सरबत करून प्यायल्यास शरीरातील उष्णता कमी होऊन थंडावा निर्माण होतो.

६) चिंचेची पाने ही शोथघ्न म्हणजेच सूज दूर करणारी असल्याने संधिवात, आमवात किंवा जखडलेल्या स्नायूवर चिंचेची पाने व मीठ एकत्र वाटून त्याचा लेप लावावा. याने त्वरित आराम मिळतो.

७) चिंच आणि आवळा यांची पाने एकत्र वाटून त्याचा लेप केल्याने मुरगळणे किंवा मुका मार लागणे यामध्ये अगदी थोड्या कालावधीतच आराम मिळतो.

८) अजीर्ण, आम्लपित्त होऊन उलटी व मळमळ होत असेल, तर चिंच पाण्यात भिजवून थोड्या वेळाने कुस्करून ते पाणी गाळून घ्यावे व या पाण्यात थोडा बारीक केलेला गूळ व सैंधव घालावे. थोड्या थोड्या अंतराने हे पाणी घोट-घोट प्यायल्यास उलटी, मळमळ कमी होते.

९) मूळव्याधीच्या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी चिंचेच्या फुलांचा रस प्यावा किंवा या फुलांच्या ‘भाजीत दही, डाळिंबरस, धणे, सुंठ, जिरे, पुदिना घालून ते दुपारी जेवताना खावे.

१०) पोटात दुखत असेल, तर चिंचेच्या सालीचे सूक्ष्म चूर्ण आणि चिमूटभर हिंग एकत्र करून एक ग्लासभर पाण्यातून प्यावे. यामुळे वात सरून पोटदुखी थांबते.

११) चिंचेच्या सालीमध्ये टॅनिन नावाचे द्रव्य असते. याचा उपयोग कापडाचा रंग पक्का करण्यासाठी केला जातो. हेच टॅनिन कातडी कमाविण्यासाठी सुद्धा उपयोगात आणतात.

१२) चिंचेच्या गरापासून रस काढतात व त्याच्या उरलेल्या चोथ्यापासून पेक्टिन तयार केले जाते. या पेक्टिनचा उपयोग जॅम, जेली, सॉस, केचप आणि मुरांबा करण्यासाठी केला जातो.

१३) चिंचोक्याच्या दळलेल्या पिठापासून खळ तयार केली जाते. या खळीचा उपयोग कापडाला पक्का रंग देण्यासाठी केला जातो.

१४) शरीराला खूप घाम येऊन दुर्गंधी येत असेल, तर चिंचेच्या आतील गर व चिंचेची फुले पाण्यात बारीक वाटून हे मिश्रण शरीरावर हलक्या हाताने चोळावे. याने शरीराची दुर्गंधी नाहीशी होऊन उत्साह निर्माण होतो.

१५) उन्हाळ्यात चिंच, गूळ, खजूर, चिमूटभर मीठ यांचे एकत्र मिश्रण करून सरबत बनवावे. हे सरबत दुपारच्या वेळेत घेतल्यास उष्णतेचा त्रास जाणवत नाही.

सावधानता :

चिंच आंबट व शीत गुणधर्माची असल्याने जास्त प्रमाणात खाल्ल्यास खोकला व दम्याचा त्रास वाढतो. तसेच सांधे जखडून संधिवात निर्माण होऊ शकतो. चिंच अति प्रमाणात खाल्ल्याने रक्त दूषित होऊन त्वचाविकार, श्वेत कोड असे आजार निर्माण होऊ शकतात. याकरता चिंचेचा वापर प्रमाणात करावा.