स्त्री आणि दागिना यांचे एकमेकांवर असलेले प्रेम जगजाहीर आहे. स्वत:च्या कुटुंबाच्या अडीअडचणीच्या काळात दागिने विकणं वेगळं आणि समाजासाठी दागिने विकणं वेगळं. स्वत:चे दागिने विकून विद्यार्थीरुपी हिऱ्यांना पैलू पडणाऱ्या अन्नपूर्णा मोहन या शिक्षिकेची प्रेरणादायक कहाणी.

शाळा आणि त्यामधील शिक्षक यांचा खूप मोठा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडत असतो. शिक्षकांच्या शिकविण्याच्या शैलीमुळे कधी नावडता विषय आवडता होतो, तर कधी आवडता विषय नकोसा वाटू लागतो. पण काही जण हे हाडाचे शिक्षक असतात. आपण शिकवित असलेला विषय हा काही विद्यार्थ्यांपुरताच मर्यादीत न राहता तो सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल यासाठी झटणारे असतात. अशाच मांदियाळीतील एक नाव म्हणजे अन्नपूर्णा मोहन.

तामिळनाडू राज्यातील विलीपूरम शहरातील पंचायात युनियन या शाळेतील इंग्रजी विषय शिकविणारी शिक्षिका. अवघ्या काही गुणांच्या फरकाने तिची एमबीबीएसची जागा हुकली. तेव्हा ती फार निराश झाली होती. याच काळात एका शाळेत शिक्षिकेची नोकरी करण्याची संधी मिळाली. ही नोकरी सुरू असताना तिने इंग्रजीत एम.ए., गणित विषयात एमएसी, बी.एड.च्या जोडीने एमबीए, बीसीए यांसारखे व्यावसायिक अभ्यासक्रमदेखील पूर्ण केले.

पुढे नेमकं काय करायचं, याचा विचार सुरू असताना तिला इंग्रजी विषय शिकविण्यात रस आहे, हे जाणवू लागले आणि हाच विषय शिकविण्याचे ठरविले. हा विषय शिकवत असताना तिला एक गोष्ट प्रकर्षाने जाणविली की, इंग्रजी या विषयाची मुलांच्या मनात एकप्रकारची भीती आहे.

याबाबतीत शोध घेतल्यानंतर तिच्या असं लक्षात आलं की, ज्या काही खासगी शाळा आहेत त्यामध्ये एखादा विषय समजावून सांगण्यासाठी स्मार्ट बोर्ड, ऑडीओ-व्हिज्युअल्स, चित्रे अशा अनेक सोयी-सुविधा आहेत. त्यामुळे एखादी संकल्पना मुलांना पटकन आकलन होते. त्याचवेळी आपला देखील वर्ग असाच अद्ययावत सोयींनी युक्त करावा असं तिनं ठरविलं.

त्यासाठी तिनं स्वत:चे काही दागिने विकले आणि आपला वर्ग अद्ययावत सोयींनी युक्त असा करविला. यासंदर्भात एका मुलाखतीमध्ये स्पष्टीकरण देताना ती म्हणाली की, मला स्वत:ला माझा वर्ग अद्ययावत करावयाचा होता. त्यासाठी इतर कुणावर भार टाकावा, हे मला योग्य वाटलं नाही. म्हणून मीच पुढाकार घेऊन पैसे उभारले. दागिने पुढेही घेता येईल, पण ज्ञानचा दागिना मुलांच्या मनात रुजणं अधिक महत्त्वाचं आहे.

रोज शाळेत येताना दोन लॅपटॉप, चार टॅब,ॲबेकसचे सामान असे चार पिशव्या घेऊन रोज घर ते शाळा असा तीस किमी.चा प्रवास ती करीत असे. याशिवाय विषयाची प्रत्येक संकल्पना मुलांना नीट समजावी म्हणून स्वत:च्या हजाराहून अधिक सीडीज्देखील तयार केल्या. त्यात फोनिक्सचे तंत्र, उच्चारण,व्याकरण आणि वाक्याची रचना या गोष्टी सोप्या पद्धतीने आणि उदाहरणाच्या माध्यमातून स्पष्ट केल्या. तिच्या या डिजिटल मेहनतीचा योग्य तो परिणाम विद्यार्थ्यावर दिसू लागला. एरवी इंग्रजी विषयाला घाबरणारी मुले, आता संकल्पना सहज सोप्या पद्धतीने समजल्यामुळे आत्मविश्वासाने इंग्रजी बोलू लागली.

पुढे आपल्या वर्गातील शिकवणी तंत्राचे काही व्हिडीओ तिनं समाजमाध्यमावर प्रसारित केले, तेव्हा देशभरातूनच नव्हे तर सिंगापूर, कॅनडा यांसारख्या देशांतून तिला विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भरीव मदतीचा हातभार लाभू लागला. अद्ययावत शिक्षणाची गरज ही फक्त श्रीमंत मुलांची मक्तेदारी नसून ती सर्वच स्तरातील विद्यार्थ्यांची गरज आहे, हा संस्कार तिनं आपल्या कार्यातून जगासमोर मांडला.

Story img Loader