प्रज्ञा तळेगावकर
पोबितोरा अभयारण्य… क्षेत्रफळ ३८.८१ चौरस किलोमीटर… गेंड्यांची संख्या १०७… रानडुक्कर, गवा यांसह इतर अनेक वन्य जीवांनी समृद्ध अशा या भागात रायफल घेऊन तैनात असलेल्या त्या दोघीजणी. जंगलरक्षक. फक्त त्या दोघीच नाही तर त्यांच्यासारख्या इतर आठ जणी. एकूण दहा वनरक्षक महिला.
पोबितोरा अभयारण्य आणि गेंडे पाहण्यासाठी केली जाणारी हत्ती सफारी. सफारीसाठी जाणाऱ्या गेटजवळच रायफल घेतलेली वनरक्षकाच्या गणवेशात उभी असणारी टिना प्रधानी लक्ष वेधून घेते. सफारीसाठी आलेल्यांची तपासणी झाल्यानंतर आवश्यक असल्यास त्यांना मार्गदर्शन करून पुन्हा आपल्या जागी तैनात.
जंगलात गस्त घालणे, टेहळणी करणे, शिकार रोखणे त्याबरोबर GPS मॅपिंग, संकटात असलेल्या वन्यजीवांची सुटका ही त्यांची महत्त्वाची कामे. सकाळी १० ते ४ गस्त घालणे, त्यानंतर रात्रपाळी करणे अशा दोन किंवा तीन टप्प्यांत त्यांचे काम चालते. गेल्या दोन वर्षांत पोबितोरा अभयारण्यात एकही शिकारीची घटना झाली नसली तरी सर्वच रक्षकांना डोळ्यात तेल घालून सतर्क राहावे लागते. टिना प्रधानी, निकूमोनी कामन, सरस्वती बोरूआ, मोनीप्रिया पातीर, नोबिनीता बोरा यांच्यासह दहा जणींची नियुक्ती ही गेल्या पाच महिन्यांतली. सगळ्याच जणी २२ ते २७ या वयोगटातल्या. यापूर्वी इथे २०१० मध्ये महिला वनरक्षकांंची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, मधल्या काळात या जागा पोबितोरा इथे रिक्तच होत्या.
हेही वाचा… ‘जस्ट लुकिंग लाइक अ वाव’ म्हणत फेमस झालेली महिला आहे तरी कोण, रणवीर-दीपिकाही तिच्या डायलॉगचे फॅन
टिना प्रधानी आसाम आणि पश्चिम बंगालच्या सीमेवर असलेल्या एका लहानशा खेड्यातून आलेली. पदवी घेतल्यानंतर वनरक्षक पदासाठी तिने अर्ज केला होता. तिथे निवड झाल्यानंतर शारीरिक क्षमतेचा कस लागेल असे प्रशिक्षण देण्यात आले. त्यात धावणे, चालणे याबरोबरच रायफल चालवणे यांचा समावेश होताच. शिवाय स्वसंरक्षणाचे धडेही त्यांना देण्यात आले. जंगल, वन्यप्राणी, GPS मॅपिंगमधील उच्च-तंत्रज्ञान प्रशिक्षण, प्राण्यांची सुटका यासाठीही खास शिक्षण देण्यात आले.
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आसाममधील नागरिकांना वन्यजीव, निसर्ग अत्यंत जवळचा. त्यातूनच जंगल जोपासण्याची, वन्य जीवांची आवड यातून या वेगळ्या अशा करिअरची निवड केल्याचे टिनानेे सांगितले. तिच्या बरोबर असणाऱ्या इतर सहकाऱ्यांचीही या करिअर निवडीमागे अशीच आवड असल्याचा उल्लेख तिने आवर्जून केला. काहींजणी गेंड्यांच्या शिकारींमुळे व्यथित झाल्यामुळेही त्यांनी या वनरक्षक होण्याचा मार्ग निवडल्याचे तिने सांगितले.
इथल्या सगळ्याच वनरक्षक महिला पुरुष वनरक्षकांप्रमाणेच जंगल गस्तीची ड्युटी तितक्याच निर्भयतेने करत असल्याचे उप वनसंरक्षक (प्रसिद्धी)सामाजिक वनीकरण मोनिका किशोर यांनी सांगितले.
गेंड्यांचा निवास असणाऱ्या अभयारण्यासाठी पूरस्थिती ही अत्यावश्यक असते. येथील गवत आणि त्याचबरोबर इतर वनस्पतींच्या वाढीसाठी पूरस्थितीचा फायदा होतो. पावसाळ्यात हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येते. असे असले तरी वनरक्षकांच्या कामकाजात फारसा फरक नसतो, असेही मोनिका किशोर यांनी सांगितले.
वन्य प्राणी अभयारण्यालगत असणाऱ्या गावांत, शेतात जातात, त्यांच्या शेताचे नुकसान करतात, तेव्हा संतप्त ग्रामस्थांना शांत करण्यासाठी संयमाची आवश्यक असल्याचे मोनिका किशोर म्हणतात.
एकंदरच घनदाट जंगतालही महिला आपल्या अभिमानास्पद कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत.