हुंडा बळी गेल्याची, हुंड्यासाठी छळ होत असल्याची आणि हुंड्यासाठी अडून बसल्याची अनेक उदाहरणं पुरोगामी महाराष्ट्रासह देशभर ऐकायला किंवा वाचायला मिळतात. हुंड्याविरोधात मोठी चळवळही ठिकठिकाणी उभी राहते. कायदा तयार केला जातो, कारवाईही होते. पण एवढं सगळं होऊनही हुंडा प्रथेचं समूळ उच्चाटन काही होत नाही. अरेंज मॅरेजमध्ये हुंडा मागण्याची कुप्रथा असली तरी प्रेमविवाहात हा प्रकार कमी घडतो. पण, दहा वर्षे प्रेमसंबंधात असलेल्या जोडप्याचं लग्न हुंड्यासाठी अडून राहिलं तर? तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण स्वतःला पुढारलेलं समजणाऱ्या समाजात आजही अडून अडून हुंड्याची विचारणा होते आणि प्रेमविवाहातही हुंड्यासाठी अडकवणूक केली जाते. नितीन आणि काजलच्या लग्नातही तेच झालं.

नितीन आणि काजल गेल्या १० वर्षांपासून प्रेमसंबंधात आहेत. शाळा सोडून कॉलेजात प्रवेश केल्यानंतरच नितीनची काजलशी ओळख झाली. या ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं. त्यामुळे ओळखीनंतर सहा महिन्यांतच नितीनने तिला लग्नाची मागणी घातली. पण त्या वयात लग्न करणे योग्य नव्हतं. त्यामुळे तिने त्याचा प्रस्ताव स्वीकारला, पण लग्नाचं वचन ती देऊ शकली नाही. पुढे, यांचं प्रेम फुलत गेलं, उमलत गेलं. एकमेकांमध्ये प्रेम गुंफत गेलं. उमलत्या वयात झालेलं त्यांचं प्रेम अळवावरच्या पाण्यासारखंच राहील असं सर्वांना वाटलं होतं. पण, त्यांचं प्रेम कॉलेज संपल्यानंतरही टिकलं. कॉलेज, उच्च शिक्षण, करिअरसह एकमेकांच्या आयुष्यातील अनेक चढ-उतार या दोघांनी पाहिले आणि अनुभवले. त्यामुळे त्या दोघांचं प्रेम वयानुसार अधिक प्रगल्भ आणि दृढ होत गेलं.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
prarthana behere complete 7 year of marriage recalls her first meeting
पाच तास गप्पा, पॅनकेक अन् २ किलो बटर…; अरेंज मॅरेज पद्धतीने जमलेलं प्रार्थना बेहेरेचं लग्न; पहिल्या भेटीत नेमकं काय घडलेलं?
shatrughan sinha cheated on poonam sinha
“पत्नीने मला एकदा रंगेहात पकडलं होतं…”, शत्रुघ्न सिन्हांनी स्वतःच केलेला खुलासा, म्हणाले होते…
Isha Koppikar first reaction on divorce with Timmy Narang
१४ वर्षांचा संसार मोडण्याचं कारण काय? पहिल्यांदाच बोलली ‘खल्लास गर्ल’; म्हणाली, “त्याने अत्यंत बेजबाबदारपणे…”
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”

हेही वाचा >> नव्यानं स्वयंपाक शिकलायत?… मग या टिप्स वाचाच!

इयत्ता अकरावीपासून सुरू झालेलं त्यांचं प्रेमप्रकरण आता दोघांच्या घरात कळलं. दोघंही आपआपल्या करिअरमध्य सेट आहेत. करिअरमध्ये स्थिरस्थावर झाल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यामुळे दोघांनीही आप-आपल्या घरी त्याबाबत कल्पना दिली. दोघांच्या घरचे सुशिक्षित आणि पुढारलेल्या विचारांचे होते. त्यामुळे होकार मिळेलच अशी त्यांना खात्री होती. त्यांची खात्री खरीही ठरली. पहिल्याच भेटीत दोघांच्या आई-बाबांनी होकार दिला. गेली १० वर्षे एकत्र राहिलेले ते दोघे आता भविष्याकडे पाहत होते. भविष्यातील प्रवास एकत्र होणार असल्याने दोघांनाही आता लग्नाची ओढ लागली होती.

पण, कोणतंही प्रेम प्रकरण साध-सरळ-सोपं असतंच असं नाही. आई-बाबांनी होकार दिला खरा, पण पुढे पेच निर्माण झालाच. “आमचा एकुलता एक मुलगा, तुमची एकुलती मुलगी, मग जावयाला काहीतरी द्याल ना?” असा प्रश्न काजलच्या होणाऱ्या सासूबाईंनी भर बैठकीत विचारला. सासूबाईंचा हा प्रश्न ऐकताच काजलचा पारा चढला. दोघंही वेगवेगळ्या जिल्ह्यांतील. त्यामुळे दोघांच्या विचारसरणीत, राहणीमानात आणि प्रथा-परंपरांमध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. परंतु, नितीनच्या घरून हुंड्याची मागणी येईल, असं काजलला स्वप्नातही वाटलं नव्हतं. काजलच्या सासूबाईंचा प्रश्न ऐकताच काजलचे आई-वडिलही बुचकळ्यात पडले. त्यांच्या या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं ते कळेना. कारण, त्यांच्यात जावयासाठी खास असं काही करतच नाहीत. हुंडा तर नाहीच नाही. पण, काजलचं नितीनसोबत असं काही ठरलं असेल तर? असं काजलच्या आई-वडिलांना वाटून गेलं. त्यामुळे त्यांनी ती वेळ मारून नेली.

हेही वाचा >> जी-२० परिषद: परदेशी पाहुण्यांच्या संरक्षणाची जबाबदारी महिला कमांडोंकडेही!

पण, काजलच्या सासूबाईंनी विचारलेला प्रश्न अनुत्तरतीच होता. लग्नाची तयारी जोरात सुरू होती. त्यामुळे काजलला वाटलं, सासूबाई हुंड्याविषयी विसरल्या असतील, किंवा त्यांनी त्यावेळी चेष्टा केली असेल. परंतु, तिच्या होणाऱ्या सासूने पुन्हा तिला हुंड्याविषयी विचारलं. विचारतानाही हुंड्याची थेट मागणी केली नाही. पण, “जावयाला काहीतरी खास भेटवस्तू द्यालच ना”, असा प्रश्न त्यांनी विचारला. तेव्हा मात्र, काजलचा राग अनावर झाला. तिने थेट उत्तर दिलं, “आमच्यात खास भेट वगैरे देत नाहीत. त्यामुळे नितीनलाही माझ्या आई-बाबांकडून काही मिळणार नाही. त्यांची कमावती मुलगी तुम्हाला मिळतेय, हीच मोठी भेट समजा.”

काजलच्या या उद्धट उत्तरामुळे सासूबाईंनाही संताप आवरेना. त्यांनी नितीनजवळ तिची तक्रार केली. “ही मुलगी लग्न होऊन आली नाही तोवर तिचा आवाज वाढला, उद्या घरी आल्यावर रुबाब गाजवेल.” यावर नितीनने मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण, सासूबाई हुंड्यावर अडून होत्या. “आमच्यात जावयाला हुंडा देण्याची पद्धत आहेच. आम्ही आमच्या मुलाला एवढं शिकवलं, कमावतं केलं, त्याचं आम्हाला काही मिळायला नको? शिवाय आमची समाजात इज्जत आहे. आम्हाला चार लोकांना तोंड द्यायचं आहे. कोणी विचारलं मुलाला काय मिळालं? तर आम्ही काय उत्तर द्यायचं? समाजात किती हसू होईल आमचं!”

नितीनने आईला समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण आई ऐकायला तयार नव्हती. दुसरीकडे काजल हुंडा देणार नाही यावर ठाम होती. “कितीही काहीही झालं तरी समाजातील या अनिष्ठ प्रथा मी पाळणार नाही, माझ्या आई-बाबांना फुकटचा खर्च करू देणार नाही”, अशी तिने भूमिका घेतली. त्यामुळे या दोघांचंही लग्न मोडण्याच्या स्थितीत आलं होतं. दोघांनाही एकमेकांविषयी प्रेम आणि ओढ होती. पण, नितीनला आईविरोधात जाता येत नव्हतं, आणि काजलला आपल्या तत्वांविरोधात.

काजलच्या होणाऱ्या सासूबाईंनी आयत्यावेळेला घेतलेल्या भूमिकेमुळे नितीन आणि काजल यांना त्यांचं दहा वर्षांचं प्रेम सोडावं लागतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. नितीनने पुन्हा त्याच्या आईला समजावण्याचा प्रयत्न केला. हुंडाबंदी कायद्याबद्दलही माहिती दिली. पण, त्याची आई आपल्या प्रथांचा दाखला देत नितीनलाच गळ घालू लागली.

हेही वाचा >> कामजिज्ञासा: मला इच्छाच होत नाही सेक्सची काय करू?

या सर्व प्रकारात काजलची कोंडी झाली. एकीकडे प्रेम आणि दुसरीकडे तत्व. आता लग्नापुरतं सासूबाईंची इच्छा पूर्ण करावी, असंही तिच्या एकदा मनात येऊन गेलं. पण, लग्नानंतर सासूबाईंच्या मागण्या वाढत गेल्या तर? प्रत्येकवेळी माहेरच्यांना किती खर्चात टाकायचं? या सर्व प्रकारामुळे लग्न लांबत गेलं. दोघांचं करिअर चांगलं सुरू असूनही दोघांनाही समाधान मिळत नव्हतं. दोघेही मानसिक तणावात होते. पळून जावून लग्न करावं की काय असाही विचार त्यांच्या मनात आला. पण, आई-वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करायचं नाही असं त्यांचं आधीच ठरलं होतं, त्यामुळे त्यांनी तो विचारही मागे सोडला.

पण शेवटी काजलने ठाम निर्धार केला. नात्यातील ही कोंडी फोडण्यासाठी तिने एक भूमिका घेतली. एकदा शेवटचं सासूबाईंशी बोलायचं आणि शेवटचा निर्णय घ्यायचा असं ठरवलं. त्यानुसार तिने सासूबाईंची भेट घेतली. पण सासूबाईही हुंडा द्यायला तयार असशील तरच भेट म्हणून अडून बसल्या. तरीही हट्टाने काजल नितीनच्या घरी गेलीच.

हेही वाचा >> Success Story : पत्रकार ते आयपीएस अधिकारी; जाणून घ्या ‘सिंघम लेडी’चा प्रवास…

“हुंडा मागण्याची प्रथा का आणि कशी तयार झाली मला माहीत नाही. पण, प्रथेच्या नावाखाली आपण आपल्या माणसालाच कमी लेखतो असं नाही का वाटत? तुमची इच्छा आहे की सोनं-नाणं किंवा गाडी वगैरे भेट द्यावी आम्ही. या गोष्टी तर नितीन सहज त्याच्या कष्टाने घेऊच शकतो. मग जी गोष्टी स्वकष्टाने घेण्यात मजा आहे, ती दुसऱ्यांकडून घेण्यात आहे का? राहता राहिला प्रश्न समाजाचा. तर समाज लग्न जुळवायला, लग्न लावायला, लग्न टिकवायला येतो का ? त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे किती लक्ष द्यायचं हे ज्याचं त्याने ठरवायला हवं. आपल्यात एक नवं नातं तयार होणार आहे, ते नातं अशा पैशांमुळे खराब व्हावं असं वाटतं का तुम्हाला? तुम्हाला एकही मुलगी नाही. त्यामुळे मला तुमची मुलगी व्हायचं आहे. पण, अशा वादातून आपल्या नात्याची सुरुवात झाली तर मी तुम्हाला आई कशी मानणार? त्यामुळे तुम्ही हा विचार इथंच सोडा. आपण छान नव्याने नातं सुरू करू”, असं बरंच काही काजल तिच्या होणाऱ्या सासूबाईंना बोलली.

काजलने सांगितलेल्या या गोष्टीचा सासूबाईंवर परिणाम झाला. त्यांनी आपल्या हुंड्याचा हट्ट मागे घेतला आणि दोघांचंही लग्न अखेर मार्गी लागलं. ठरवलं तर तत्वही पाळता येतात आणि प्रेमही स्वीकारता येतं.