–रोहित पाटील
हल्ली तरुणाई पदवीनंतर लगेच राज्यसेवा व लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याच्या तयारीला लागतात. क्लास वन अधिकारी होण्याचं स्वप्नं उराशी बाळगून जीवतोड मेहनत घेतात. पण या परीक्षा उत्तीर्ण होणं हे प्रत्येकालाच शक्य होत नाही. यामध्ये यशस्वी होणाऱ्यांची यशोगाथा आपण इंटरनेटवर, वर्तमानपत्रांमधून वाचतच असतो. आज आपण अशाच एका आयपीएस अधिकारीबद्दल जाणून घेणार आहोत- जिने घरची परिस्थिती अतिशय उत्तम असतानादेखील घराचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी आयपीएस अधिकारी बनण्यासारखा खडतर मार्ग निवडला. आणि अखेर कठोर मेहनतीनंतर परीक्षा उत्तीर्ण होऊन अरुणाचल प्रदेशातील पहिली महिला आयपीएस अधिकारी बनण्याचा मान मिळवला. या महिला आयपीएस अधिकारीचं नाव आहे तेनझिंग यांगकी.
तेनझिंग यांगकी यूपीएससीमध्ये २०२२ ला ५४५ रँकने पास आऊट झाल्या. त्याआधी त्यांनी २०१७ मध्ये अरुणाचलप्रदेश लोकसेवा आयोगाच्या (एपीपीएससी) परीक्षेतसुद्धा घवघवीत यश मिळवलं आहे. पण तिला तिच्या कुटुंबाचा वारसा पुढे चालू ठेवायचा होता, कारण तिचे वडील आणि आजोबा दोघांनीही सिव्हिल सर्विसमध्ये आपलं मोलाचं योगदान दिलं आहे. वडील थुप्तेन टेम्पा हे अरुणाचल प्रदेशमधील नावाजलेले राजकारणी आहेत. राजकारणात येण्याआधी तेसुद्धा सिव्हिल सर्विसमध्ये कार्यरत होते. तर आजोबा न्येरपा खो हे देखील सिव्हिल सर्विसमध्ये कार्यरत होते. त्यांनी मेजर बॉब खथिंग यांच्यासोबत मिळून तवांग प्रदेशाला भारताच्या अखत्यारित आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
आणखी वाचा- नांदेडच्या युक्ताची गरुडझेप; देशातील सर्वात तरूण वैमानिकाचा मिळवला मान
तेनझिंग यांगकी अरुणाचल प्रदेशमधून पहिल्या महिला आयपीएस अधिकारी बनल्याने, तसेच घरची परिस्थिती सुखावह असताना त्याचा फायदा न घेता स्वबळावर मेहनत करून स्वप्न सत्यात उतरवल्याने तिच्यावर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आज अरुणाचल प्रदेशमधील महिलांसाठी त्या एक प्रेरणास्थान बनल्या आहेत. त्यांचा आदर्श ठेवून आपणही आयपीएस अधिकारी व्हायचं असं स्वप्न बाळगून अनेक महिला मेहनत घेत आहे. त्यांच्या आयपीएस अधिकारी बनण्याने अनेक महिलांच्या स्वप्नांना बळ मिळालं आहे.
rohit.patil@expressindia.com