‘इनडोअर प्लॅन्ट’ – घरातलं झाड लावलं तर घरात जिवंतपणा, ताजेपणा येतो. पानांच्या हिरव्या रंगामुळे डोळ्याला थंडावाही मिळतो. बागेतल्या झाडांपेक्षा ‘घरातली झाडं’ जरा जास्त काळजीपूर्वक वाढवावी लागतात; ती वाढवताना बऱ्याच मर्यादा येतात. ‘इनडोअर प्लॅन्ट्स’ ही नेहमीच कुंडीत किंवा हँगिंग बास्केटमध्ये लावावी लागतात. त्यामुळेच त्यांना लागणारं पाणी, भोवतालची आर्द्रता, खत, सूर्यप्रकाश या सगळ्याचं गणित गार्डन प्लॅन्ट्सपेक्षा वेगळंच असतं!
बाहेरगावी जायचं झालं तर जिवापाड जपलेली ही झाडं दुसऱ्यांकडे सोपवावी लागतात किंवा काही तरी वेगळी व्यवस्था करावी लागते. या सगळ्यासाठी काही ‘टीप्स’, त्या तुम्हाला ‘इनडोअर प्लॅन्ट्स’ वाढवताना नक्कीच उपयोगी पडतील. ‘इनडोअर प्लॅन्ट’ नर्सरीमधून खरेदी करण्याअगोदर आपल्या घरात ते कुठे ठेवायचे आहे, त्याच्या आजूबाजूला कोणते फर्निचर किंवा इतर कोणती वस्तू ठेवणार आहोत हे पक्कं करून घ्या.
हेही वाचा… नवऱ्याच्या हातचा मार की आत्मसन्मान?
नर्सरीत पूर्ण वाढलेल्या किंवा फुलं आलेल्या झाडाची कुंडी शक्यतो घेऊ नका. कारण नर्सरीतल्या हवामानात त्याची पूर्ण वाढ झालेली असते. आपल्या घरातलं हवामान पूर्ण वेगळं असतं, त्यामुळे झाडाला, मुळांना शॉक बसू शकतो, आणि आपल्या घरात ते झाड पूर्ण आणि तजेलदार वाढत नाही. त्यासाठी झाडाचं छोटं रोप असलेली कुंडी निवडा. छोटं रोप जर प्लॅस्टिकच्या पिशवीत लावलं असेल तर ते तसेच तीन – चार दिवस घरात ठेवा. त्याला थोडे थोडे पाणी घाला, त्याला खूप वारं किंवा त्यावर प्रखर सूर्यप्रकाश येणार नाही याची काळजी घ्या. झाडाचा आकार पूर्ण वाढल्यावर किती होणार आहे, याचा अंदाज बांधून नवीन कुंडीची निवड करा.
मातीची सच्छिद्र कुंडी वापरावी, त्यामुळे हवा खेळती राहून मुळं चांगली वाढतात. नर्सरीत आणलेलं रोप प्लॅस्टिकच्या पिशवीत असेल तर कुंडी खत मातीने अर्धी भरून घ्यावी. नंतर रोप असलेली प्लॅस्टिकची पिशवी ब्लेड वापरून काढून टाकावी. आणि मुळांसकट असलेलं रोप अलगद कुंडीत ठेवावं आणि कडेनी माती घालून कुंडी भरून घ्यावी. कुंडी मातीने पूर्ण भरू नये कारण पाणी घालताना माती बाहेर येऊ शकते. रोपांची मुळं कुंडीत पूर्ण झाकली गेली आहेत का, हे जरूर पाहा, ती उघडी राहिली तर झाड एक-दोन दिवसात वाळून जाईल.
हेही वाचा… नवऱ्याची निर्मिती असलेल्या चित्रपटांत काम करणं मी टाळते – विद्या बालन
रोप कुंडीत पूर्ण ‘सेट’ होईतोपर्यंत त्याची काळजी घ्या. घरातलं झाड असल्यामुळे कुंडीखाली खोल ताटली ठेवा. त्यात थोडे पाणी घाला, अती पाणी घातलं तर मुळं पाणी जास्त शोषून घेतील आणि कुजतील. हे टाळण्यासाठी लाकडी चौकोनी तुकडा ताटलीत ठेवून त्यावर कुंडी ठेवली तरी चालेल. लाकूड ओलं होऊन कुंडीला गारवा राहील, थोडी आर्द्रताही वाढेल. ज्या झाडांना वाढीसाठी जास्त आर्द्रता लागते, त्या झाडांवर पाणी ‘स्प्रे’ करा, पाण्याचा हलका फवारा एक-दोन दिवसाआड मारा.
‘हंसपदी’, नेफ्रोलेपीस’ यासारख्या नेच्यांना सतत गारवा लागतो. त्यासाठी रोप लावलेल्या कुंडीपेक्षा थोडी मोठी कुंडी घेऊन त्यात ओलं पीट मॉस टाका, ते सतत ओलपट ठेवा, त्यावर कुंडी ठेवा.
sandeepkchavan79@gmail.com