शेळ्या-मेढ्यांच्या लेंड्या या बागेसाठी खत म्हणून उत्तम पर्याय आहेत. वाळवलेल्या लेंड्या झाडांचे उत्तमप्रकारे पोषण करतात. साधारण एक फूट चौरस व तितकीच खोली असलेल्या कुंडीस एक मूठ बकरीचे लेंडी खत पुरेसे आहे. लेंड्या भरडून किंवा फोडून घेतल्यास त्याचा परिणाम लवकर दिसून येतो.
आणखी वाचा : गौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय?
गावरान गायीचे ओले किंवा सुकलेले शेण खत म्हणून वापरता येते. बरेचदा म्हैस व जर्सी गायींना अधिक दूध येण्यासाठी ऑक्सिटॉक्सिनचे इंजेक्शन दिले जाते. या औषधाच्या दुष्परिणामामुळे या खतात पिकवलेला भाजीपाला आकाराने मोठा होतो. त्यामुळे त्यांचे शेण टाळणेच उत्तम. गावरान गायीच्या शेणात सर्वाधिक मित्र जिवाणू व कीटक असतात. हे शेण पाण्यात मिसळून ताजे स्वरूपात दिल्यास उत्तम. निमओल्या खतात उष्णता फार असते. त्यामुळे झाडंही कोमजून सुकू शकतात. त्यामुळे ते सुकवून खडे स्वरूपात द्यावे.
आणखी वाचा : उर्वशीच्या गळ्यात २०० कोटींची मगर की पाल…तुम्हाला काय वाटतं?
कोंबडीची विष्ठा हेही झाडांसाठी उत्तम खत आहे. पण ते चांगले कुजलेले असावे. हे फार उष्ण स्वरूपाचे खत आहे. यात छान माती मिसळून त्यास आठवड्यातून एकदा याप्रमाणे कुंड्या किंवा रोपांच्या मुळापासून थोडे अंतर ठेवून वापरता येते. हे पर्यायी खत आहे.
बाजारात मासोळी खत उपलब्ध असते, पण बरेचदा पुरवठ्याअभावी ते उपलब्ध होत नाही. पण ज्यांना गच्चीवर पुरेशी जागा आहे ते मासोळी खत बनवून वापरू शकता. माशाच्या दुकानावर उरलेला टाकाऊ माशाच्या अवशेषांत एकास ३ भाग याप्रमाणे माती, निंबोळी पेंड टाकून त्याचे खत बनवता येते. ते वाळवून त्यास वापरता येते.
आणखी वाचा : गच्चीवरची बाग: घरी तयार होणारी संजीवके
घोडा, हत्तीची लीद माती चांगली बनवण्यासाठी विविध पालापाचोळ्याच्या वापराबरोबर वापरता येते. पण ते सहजपणे उपलब्ध झाले तरच… ते हवेच असे नाही. हे शेण छान वाळून घ्यावे व मातीमध्ये मिसळून कुंड्या भरण्यासाठी वापर करू शकता.
निंबोळीची पेंड
कडूलिंब किंवा निंबाला आपल्या आयुर्वेदात कल्पवृक्ष मानले गेले आहे. त्या झाडांच्या पंचघटकांचे (पान, फुलं, फळ, सालं, मुळ्या) मानवी आरोग्यास खूप फायदे आहेत. तसेच त्याचे शेतीला उपयोगी होईल असेही फायदे आहेत.
बाजारात निंबोळीची पेंड ४० ते ५० रुपये किलो प्रमाणे मिळते. ही पेंड कोरड्या स्वरूपात असते. त्यातून झाडांना नत्र मिळते. हे खत हे झाडाला सावकाश मिळत असल्यामुळे झाडांच्या हळूवार पण खात्रीच्या वाढीस पूरक ठरते. ही खते बरेचदा माती मिश्रित असतात. ती पारखून वापरावीत. शुद्ध निंबपेड ही तेलकट असते. तिला उग्र कडू वास असतो. ती वाळवून झाडांना आठवड्यातून एकदा चमचाभर दिली तरी उत्तम. निंबोळी खत व निंबोळी पेंड या दोन्हीत फरक आहे. निंबोळी खतात बरेचदा माती, युरिया मिसळलेला असतो.
sandeepkchavan79@gmail.com