प्रिया भिडे
सकस मातीत बीज अंकुरते. भरणपोषण होता रोप तरारते. मातीची महती काय सांगायची. सगळ्या सृष्टीचे पोषण करणाऱ्या मातीच्या एका कणात हवा, पाणी, खनिजद्रव्ये, सेंद्रिय पदार्थ सगळे काही सामावलेले असते. एक ग्रॅम मातीत दहावर सात शून्य (१० वर सात शून्य) इतके सूक्ष्मजीव असू शकतात. ही सजीव मातीच झाडांचे पोषण करते. झाडांना आवश्यक ती द्रव्ये झाडे मुळांमार्फत शोषून घेतात. परंतु ही द्रव्ये उपलब्ध करून देण्याचे काम मातीतील सूक्ष्म जीव करतात. तेव्हा आपण झाडांसाठी अशी सजीव मातीच वापरायला हवी.
आपण रोपवाटिकेतून माती विकत आणू शकतो. ही पोयटा माती असते. तिचा रंग लाल असतो. एक पोतं माती म्हणजे साधारणपणे २५ किलो माती आणली तर त्यात मध्यम आकाराच्या तीन कुंड्या भरतात. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जेव्हा आपण निसर्गातील उत्तम माती आपल्या हौसेसाठी घरी आणतो तेव्हा जेथून माती आणली तिथल्या निसर्गाची, पर्यावरणाची हानी करतो. तेव्हा माती विकत न आणता घरातच वाया गेलेल्या सेंद्रिय पदार्थापासून आणि आजूबाजूला पडणाऱ्या पालापाचोळ्यापासून सजीव माती तयार करावी. त्यासाठी थोडा कालावधी लागेल पण काळी, दळदार, सकस माती मिळेल.
आणखी वाचा-गच्चीवरची बाग : बहरलेल्या बागेचे तंत्र आणि मंत्र
पाहूया, माती तयार करण्याची कृती-
-प्रथम एक कुंडी घ्यावी. घेतलेल्या कुंडीच्या तळाशी भोके ठेवावीत. त्यावर दोन इंच पालापाचोळा घालावा.
-या कुंडीत रोज घरात निघालेला ओला कचरा (कोथिंबीर, पालक डेखं, भाज्यांच्या साली, चहापत्ती, कोबीपाला इ.) घालावा.
-या ओल्या कचऱ्याचा एक इंच थर झाला की त्यावर बाजारात मिळणारे कंपोस्टर अथवा कंपोस्ट करण्याचे विरजण भुरभुरावे. जेणेकरून सर्व ओल्या कचऱ्याला हे मिश्रण लागेल.
-या थरावर पालापाचोळा अथवा कोकोपिथचा थर द्यावा. तसेच मूठभर नीम पेंड भुरभुरावी.
असे एकावर एक थर घालून कुंडी भरावी. या कुंडीतील माती दीड महिन्याने तयार असेल. एकदम बऱ्याच कुंड्या भरायच्या असल्यास बाजारात सेंद्रिय पदार्थ वापरून अशाप्रकारे तयार केलेली मातीही उपलब्ध असते. ही माती भुसभुशीत असते. त्यामुळे हवा खेळती राहते. पाण्याचा निचरा चांगला होतो. तसेच सेंद्रिय पदार्थामध्ये ओल असल्याने मातीची ओल धरून ठेवण्याची क्षमता चांगली राहते.
आणखी वाचा-गच्चीवरची बाग: त्रयोदशगुणी विडा
या मातीच्या वापरामुळे झाडांची पाण्याची गरजही कमी होते. ही माती तयार करताना वेगवेगळ्या झाडांची पाने वापरल्यामुळे तसेच वेगवेगळे निसर्गनिर्मित पदार्थ वापरल्यामुळे झाडांना लागणाऱ्या वेगवेगळ्या द्रव्यांची आणि खनिजांची गरज भागते. थोडक्यात, निसर्गाचं देणं निसर्गालाच दिलं की वरून खते घालायची गरजही कमी होते. पण तुम्ही आधी माती विकत आणलेलीच असेल तर त्या मातीत सेंद्रिय पदार्थ व नीमपेंड घालून या मातीचा कसही आपण वाढवू शकतो. निसर्गनिर्मित मातीचे महत्त्व शेतकऱ्यांना अधिक आहे. त्यामुळे शेतातली माती आपल्या हौसेसाठी विकत आणण्यापेक्षा वरील सांगितलेल्या पद्धतीत माती तयार करून आपली आवडती झाडे लावा. माती भरून कुंडी तयार झाली.