संदीप चव्हाण
फ्लॅट संस्कृतीत किचन/हॉलच्या भिंतींना मोठ्या खिडक्या असतात. या खिडक्यांना १८ इंच रुंदीची ग्रिल बनवता येते. खिडकीच्या रुंदीएवढी जागा मिळते. त्यातही आपण बाग फुलवू शकता… कुंड्या, पिशव्या, शीतपेयांच्या बाटल्यांत बाग फुलवता येते. अर्थात आपल्याकडे जागा किती आहे व त्याचा कल्पकतेने वापर केल्यास आपण त्याचा अधिकाधिक उपयोग करून घेऊ शकतो. खिडकीला संपूर्ण ग्रिल करणे शक्य नसेल तर कुंड्या, पिशव्या खाली पडू नये म्हणून कुंड्यांच्या उंचीचे व रुंदीचे बकेट टाइप रॅक तयार करता येते. बरेचदा कुंडी जड असल्यामुळे पडणार नाही या गैरसमजात असू नये. पक्ष्यांचे येणे-जाणे वाढले, आपले काही काम करताना अनवधानाने कुंडी सरकून पडू शकते किंवा पतंगाचा धागा, केबलची वायर यामुळे कुंड्या पडू शकतात व अपघाताची शक्यता असते.
आणखी वाचा : बॅक टू ‘ब्लाऊजलेस’ साडी!
मोजक्याच कुंड्या असतील तर फोडणीसाठी गरजेच्या किंवा ग्रीन टी म्हणून उपयुक्त वनस्पती लावता येतात. येथे हँगिंग कुंड्या लावूनही त्यात बाग फुलवता येते. ग्रीलप्रमाणे अपार्टमेंटमधील जिनाही बाग फुलवण्यासाठी उत्तम जागा ठरू शकते. बरेचदा अपार्टमेंटमध्ये वर्दळ नसेल किंवा टेरेसवर जाणाऱ्या रस्त्यात अडचण नसेल तर येथेही कुंड्यांमध्ये बाग फुलवता येते. अर्थात या पायऱ्यांचा अंदाज घेऊन आपणास कुंड्यांचा आकार ठरवावा लागतो. प्रत्येक पायरीवर एक कुंडी याप्रमाणे कुंड्यांची रचना करता येते.
आणखी वाचा : आहारवेद: महिलांसाठी उपयुक्त ऊर्जावर्धक पेरू
मात्र अशा बागेसाठी इमारतीची रचना ही खेळती हवा, भरपूर सूर्यप्रकाश येणारी अपेक्षित असते. अगदी कोंदट व अंधार असलेल्या पायरीवर बाग फुलवणे शक्य होत नाही. अपार्टमेंटमधील पॅसेजचाही वापर कुंड्या ठेवण्यासाठी करता येतो. अर्थात पॅसेजची लांबी रुंदी, इतर सदस्यांची हरकत नसेल तर ही जागा व्यापता येते. तसेच पॅसेजला असलेल्या सुरक्षा भिंतीच्या बाहेरील बाजूस सुरक्षित असा लोखंडी प्लॅटफार्म तयार करता येते. यामुळे एका निर्जीव वास्तूत फुला-झाडांमुळे सौंदर्यात भर तर पडतेच, पण तेथे जिवंतपणाही येतो.
आणखी वाचा : झोपू आनंदे : ‘गुडाकेश’ व्हायचंय?
माठाची कुंडी
आतापर्यंत आपण बाग फुलवण्यासाठी उपयुक्त जागा कोणत्या याची माहिती घेतली. आता बाल्कनी/गच्ची येथील बागेसाठी उपयुक्त ठरतील अशा कुंड्या वा तत्सम पर्यायांची माहिती घेऊ. मातीच्या पारंपरिक कुंड्यांबरोबरच जुने माठ, रांजण यांचाही झाडे लावण्यासाठी कल्पकतेने वापर करता येतो. यासह बाजारात चिनी मातीच्याही विविध आकारांच्या, आकर्षक कुंड्या उपलब्ध आहेत.
या रंगीबेरंगी, नक्षीदार कुंड्यांची हॉल किंवा प्रदर्शनी भागात मांडणी करता येते. मात्र त्यांना हाताळणे, रिपॉटिंग करणे थोडे अवघड असते. त्यातही फुलदाणीसारख्या वर निमुळत्या होणाऱ्या कुंड्यांत माती हलवणेही अवघड होते. तसेच अशा कुंड्यांना पाण्याच्या निचऱ्यासाठी छिद्रं असली तरी ती पुरेशी नसतात. म्हणूनच कमी पाण्यावर जगणाऱ्या कॅकट्स (निवडुंग) प्रजातीच्या वनस्पतीची लागवड आपण या कुंड्यांमध्ये करू शकता. तसेच ॲस्पारागससारखे हिरवे गवतही यात लावता येते.
दर उन्हाळ्यात नवा माठ घेतल्यानंतर गेल्या वर्षीच्या निरुपयोगी माठाचे काय करायचे, हा प्रश्न पडतो. या माठांचा बाग फुलवण्यासाठी छान वापर होऊ शकतो. फक्त मातीची वस्तू असल्यामुळे खूपदा उचल-ठेव करता येत नाही. तरी पाणी चांगले झिरपत असल्याने झाडे लवकर मुळे पकडतात. माठात कोरफड चांगली येते. माती हलवण्यास सोयीचे व्हावे म्हणून माठाचा अर्धाच्या वर भाग काळजीपूर्वक फोडून घेतला तर एका वेळेस अनेक भाज्यांची लागवड करता येते.
माठाप्रमाणे मोठाल्या निकामी झालेल्या रांजणाचा कायस्वरूपी रोपे लावण्यासाठी वापर करता येतो. त्यात पांढरा, गुलाबी चाफा चांगला बहरतो. माठ व रांजणास सर्वबाजूंनी विळ्याने काळजीपूर्वक भोकं पाडून घेतल्यास त्यात पालक व इतर काही बियाणे लावता येते. याशिवाय फुटलेल्या माठाचे तुकडे खापर म्हणून कुंड्यांच्या तळाशी वापरता येतात.
sandeepkchavan79@gmail.com