प्रिया भिडे
वैराण, ओसाड प्रदेशात प्रवास करताना, रस्त्याच्या कडेला अचानक आकर्षक लालभडक फुले आपले लक्ष वेधून घेतात. जवळ जाताच लक्षात येते, अरे हा तर निवडुंग. ही फुलेच नाही तर निवडुंगाच्या झाडाचा आकारही आकर्षक असतो. उष्ण, रखरखीत, कोरड्या हवामानात, निकृष्ट जमिनीत, वाळवंटी प्रदेशात, महिनोन महिने पाण्याच्या थेंबाशिवाय तग धरू शकणारे निवडुंग हा निसर्गातल्या विविधतेचा चमत्कारच. पाण्याशिवाय जगणे हे यांचे वैशिष्ट्य वाळवंट हीच मातृभूमी. कॅक्टसी कुटुंबाच्या आकारामध्ये प्रचंड विविधता आहे. याच्या खोडाचे विविध आकार आपल्याला मोहात पाडतात.
महाकाय, उंच निवडुंगापासून अंगठ्या एवढ्या छोट्या आकाराचे निवडुंग बघायला मिळतात. कधी हाताच्या पंजासारखा आकार तर कधी उंच निमुळत्या काठीचा आकार, कधी गोल बॅरलसारखा तर कधी बाटलीसारखा आकार. वाळवंटी प्रदेशात अनुसरून खोडं जाड, मांसल झाली, तर पानांची जागा काट्यांनी घेतली. या काट्यांची विविधता म्हणजे निसर्गाचा आणखी एक चमत्कार. हे काटे कधी कापूस पिंजून टाकण्यासारखे, कधी बर्फ भुरभुरल्यासारखे, कधी मखमली सोनेरी ठिपक्यांसारखे तर कधी तीक्ष्ण सुयांसारखे. या काट्यांचे सौंदर्य आपल्याला मोहात पाडते, अन एखादे तरी कॅक्टस आपल्या बागेत असावे असे आपल्याला वाटते.
आणखी वाचा-गच्चीवरची बाग: परसबागेतील गाजर, मुळा
रोपवाटिकेतून याचे रोप आणल्यावर छोट्या कुंडीत वाळूचा चाळ, माती अथवा विटांचा चुरा, माती भरून रोप लावावे. पाणी अगदी कमी लागत असल्याने, पाण्याचा नीट निचरा होणे गरजेचे असते.एकदा कुंडीत लावल्यावर निवडुंगास अजिबात देखभाल लागत नाही. ऊन मात्र आवडते. शोभिवंत दगड व विविध प्रकारची कॅक्टस लावून बागेतला एखादा कोपरा छान सजवता येतो. कॅक्टस प्रजाती कुटुंबवत्सल आहे. त्यामुळे मूळ रोपास असंख्य पिल्ले येत राहतात. हे एकत्र कुटुंब सुंदर दिसते, पण कुंडीत फार गर्दी झाल्यास अथवा खूप उंच वाढल्यास तुकडा अलगद काढून दुसरे रोप करता येते. निवडुंग हाताळताना हातात मोजे घालावेत. काट्यांच्या एखाद्या ठिपक्यात असंख्य काटे असतात. ज्यामुळे हाताची आग होणे, खाज सुटणे असा त्रास होऊ शकतो.
आणखी वाचा-गच्चीवरची बाग: परसबागेतील गाजर
अगदी छोट्या बाल्कनीत कोनाड्यात, एखाद्या कोपऱ्यात अगदी टेबलावरसुद्धा कॅक्टस शोभून दिसते. मोठी जागा, फार्म हाऊस यासारख्या ठिकाणी फड्या निवडुंग फेरी कॅसल हे रानोमाळ दिसणारे निवडुंग कुंपणापाशी लावता येतात. तर झेब्रा कॅक्टस छोट्याशा कपातही छान रहाते.